ठाण्याची रुपाली खैरनार ठरली यंदाची संक्रांत सोहळा क्वीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मीती क्रिएशन्स आणि व्रॅव्हॉनहलदी तुलसी ड्रॉप्स आयोजित संक्रांत सोहळा या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा मोठय़ा दिमाखात डिजिटली साजरा करण्यात आला. या स्पर्धेत संक्रांत सोहळा क्वीन ठरल्या ठाणे येथील रूपाली खैरनार. त्या मानाची पैठणी व लडाखच्या मोफत टूरच्या मानकरी ठरल्या. सलग 1 महिना सुरू असलेल्या या स्पर्धेला जगभरातील महिलांनी चांगला प्रतिसाद दिला.

स्पर्धेच्या उत्तेजनार्थ विजेत्या ठरल्या पुण्याच्या अश्विनी खळदकर, विरारच्या मानसी दिघे, सॅनफ्रान्सिस्कोच्या प्रियांका पागनीस–दीक्षित. तर क्रमांक तीनच्या विजेत्या ठरल्या कांदिवलीच्या डॉ. स्नेह तेंडुलकर, ठाण्याच्या प्रीती चोळकर यांनी दुसरा क्रमांक पटकावला. याचबरोबर ठाण्याच्या संगीता गायकवाड, रत्नागिरीच्या शामल शेठ आणि ठाण्याच्या मीनल संखे या स्पर्धकांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अमेरिकेच्या गौरी महाजन, ठाण्याच्या हर्षदा केतकर, भांडुपच्या ऋतुजा राणे, माहीमच्या प्रतीक्षा पाटील, ठाण्याच्या आरती मुसळे आणि सांताक्रुजच्या मनीषा विसपुते यांना जजेस चॉईस हा पुरस्कार देण्यात आला.

स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्यात स्टार प्रवाहवरील आपले लाडके कलाकार सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे आणि मधुराणी गोखले-प्रभुलकर हे मान्यवर उपस्थित होते. या कलाकारांनी सर्व स्पर्धकांचे मनोबल वाढवले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छादेखील दिल्या. या स्पर्धेत सहभागी महिलांना उत्तराताई तुम्ही हे प्रोत्साहन दिले आहे आणि आता या सर्व स्पर्धकांना आम्ही हेच सांगू की या पुढचा प्रवास असाच सुरू ठेवा. कुठेही थांबू नका, असे मत सिद्धार्थ चांदेकर आणि शिवानी रांगोळे यांनी व्यक्त केले. कलाकारांबरोबरच व्रॅव्हॉनच्या डॉ. स्मिता रास्ते, ईशा टूर्सचे आत्माराम परब, ठाण्याच्या नगरसेविका नंदिनी विचारे, कालनिर्णयच्या शक्ती साळगावकर, नयापन क्रिएशन्सच्या वनश्री पांडे या मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. मधुराणी गोखले-प्रभुलकर यांच्या हस्ते स्पर्धेच्या विजेत्या आणि उत्तेजनार्थ विजेत्यांचा व्हर्च्युअल सन्मान करण्यात आला.

गृहिणींबरोबरच विविध व्यवसाय करणाऱया आणि विविध कार्यक्षेत्रांत वावरणाऱ्या उदा. डॉक्टर, वैज्ञानिक, संशोधक, आर्किटेक्ट, इंजिनिअर अशा महिलांनी या स्पर्धेत भाग घेतला. म्हणजेच देश-विदेशातल्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या महिलांपर्यंत हा विषय पोहोचला.

ही स्पर्धा पोहोचली आणि या सर्व महिलांना त्याचा आनंद घेता आला याचे मला समाधान आहे, अशी भावना स्पर्धेच्या आयोजिका उत्तरा मोने यांनी व्यक्त केली. या संपूर्ण स्पर्धेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम प्रायोजक म्हणून ‘सामना’ वृत्तपत्राचीदेखील जोड स्पर्धेला मिळाली आहे.