
रशियाच्या बाशकोर्तोस्तान प्रजासत्ताकातील एका विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात शनिवारी चाकू हल्ला झाला. या चाकू हल्ल्यात चार हिंदुस्थानी विद्यार्थ्यांसह अनेक जण जखमी झाले, अशी माहिती मॉस्कोमधील हिंदुस्थानी दूतावासाने दिली. या घटनेत दोन पोलीसही जखमी झाले.
बाशकोर्तोस्तानची राजधानी उफा येथील स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात हा हल्ला झाला. रशियाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चाकू घेऊन सज्ज असलेल्या एका 15 वर्षीय मुलाने वैद्यकीय विद्यापीठाच्या वसतिगृहात प्रवेश केला आणि तेथे राहणाऱया विद्यार्थ्यांवर हल्ला केला, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले.
हिंदुस्थानी अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि रशियन अधिकाऱयांच्या संपका&त आहेत.
आरोपीने स्वतःलाही जखमी केले
‘हल्लेखोराने दोन पोलीस अधिकाऱयांवर चाकूने वार केले. शिवाय, स्वतःलाही शारीरिक इजा केली’, असे गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या मेजर जनरल इरिना वोल्क यांनी सांगितले. अधिकाऱयांनी सांगितले की, संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. तपास समितीने घटनेची चौकशी सुरू केली आहे.

























































