गुड न्यूज – मानवी चाचण्या यशस्वी झाल्यानंतर रशिया ‘या’ तारखेला कोरोनावरील पहिली लस करणार लॉन्च

कोरोना महामारीच्या विळख्यात सापडलेल्या जगाला दिलासा देणारी बातमी रशियन संशोधकांनी दिली. कोरोनाला रोखणाऱ्या प्रभावी लसीच्या सर्व मानवी चाचण्या यशस्वी झाल्यानंतर रशियाने आता ही लस बाजारात आणण्याचे जाहीर केले असून तारखेची घोषणा केली आहे. रशियाच्या सेचेनोव्ह विश्वविद्यालयाने बनवलेली ही लस ऑगस्ट महिन्यात बाजारात येणार असून यामुळे कोरोनाच्या दहशतीखाली जगणाऱ्या समस्त मानव जातीला दिलासा मिळणार आहे.

रशिया प्रायोगिक तत्वावर 3 कोटी कोरोना लसीची निर्मिती करणार आहे. यातील जवळपास 1 कोटी 70 लाख लस विदेशात निर्माण केल्या जाऊ शकतात. याआधी रशियाच्या इंस्टीटय़ूट फॉर ट्रांसलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नोलॉजीचे निदेशक वदिम तरासोक यांनी सांगितले की, सेचेनोव्ह विश्वविद्यालयाने 18 जूनलाच रशियातील गेमली इंस्टीटय़ूट ऑफ एपिडेमियोलॉजी अँड माइक्रोबायोलॉजीद्वारा निर्मित लसीच्या चाचण्या सुरु केल्या होत्या. जगातील पहिल्या कोरोनाप्रतिबंधक लसीचे मानवी स्वयंसेवकांवर चाचण्या यशस्वी आणि उत्साहवर्धक झाल्याचे तारासोक म्हणाले.

सर्वात पहिली लस
सेचनोक युनिव्हर्सिटीच्या इंस्टीटय़ूट ऑफ मेडिकल पैरासिटोलॉजी, ट्रॉपिकल अँड वेक्टर-बॉर्न डिसीजचे निदेशक अलेक्जेंडर लुवाशेक यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनावरील नव्या लसीच्या सर्व मानवी चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. शिवाय लसीच्या सुरक्षिततेबाबतही आम्ही पूर्ण पडताळणी केली आहे. ऑगस्ट महिन्यात ही लस बाजारात आणली जाणार आहे. 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान ही लस लॉन्च केली जाईल आणि रुग्णांना देण्यात येईल असेही त्यांनी सांगितलं. तसेच खासगी कंपन्यांच्या मदतीद्वारे सप्टेंबर पर्यंत याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येईल, असे ‘मॉस्को टाइम्स’ने म्हटले आहे.

औषध निर्मिती आणि वैद्यकीय उत्पादनात सेचेनोव्ह नामांकित
रशियाचे सेचेनोव्ह विश्वविद्यालय हे उच्च शिक्षणासोबतच वैद्यकीय क्षेत्रासाठीच्या मॉडर्न औषध निर्मितीतही अग्रेसर आहे. कोरोनावरील त्यांची लस निश्चितच मानवासाठी वरदान ठरेल, असा विश्वासही तारासो व्ह यांनी बोलून दाखवला. या लसीच्या चाचण्या ज्यांच्यावर झाल्या त्या स्वयंसेवकांना आम्ही 20 जुलैला त्यांच्या घरी परतण्याची परवानगी देऊ असेही तारासोव्ह यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीची mRNA-1273 ही कोरोना लसही मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात असून ती लवकरच रुग्णांसाठी उपलब्ध होईल असे अमेरिकन संशोधकांनी सांगितले आहे. तसेच हिंदुस्थानमध्येही दोन लसीची मानवावरील चाचणी सुरू करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या