रशियात कोरोना लसवरून उच्चपदस्थ डॉक्टरांचा राजीनामा, तर सरकारकडून लशीची मोठ्या प्रमाणात निर्मिती सुरू

1210

संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असताना रशियाने कोरोनावर लस शोधल्याचा दावा केला होता. पण इंग्लंड, अमेरिका सारख्या पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या या लशीवर संशय व्यक्त केला आहे. आता रशियामध्येच या लशीवरून मतभेद दिसून येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील एका उच्चपदस्थ डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. असे असले तरी रशियाने या लशीची मोठ्या प्रमाणात निर्मिती सुरू केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने रशियाच्या कोरोनावरी लशीचे वाभाडे काढले होते. आता रशियाच्या आरोग्य मंत्रालयातील उच्चपदस्थ डॉक्टर आलेक्झांडर कुशलीनने या लशीवर टीका केला आहे. ही लस बनवताना वैद्यकीय नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचे कुशलीन यांनी सांगितले आहे. तसेच ही लस बनवल्यानंतर त्याची योग्य प्रकारे चाचणी करण्यात आली नाही, कुठल्याही मेडिकल जर्नलमध्ये त्याचा माहिती प्रकाशित करण्यात आली नसल्याचे डॉ. कुशलीन यांनी सांगितले. ही लस बनवताना दोन डॉक्टरांचा समावेश होता. या दोन्ही डॉक्टरांनी कायद्याचे उल्लंघन करून या लशीला मंजूरी दिली आहे. या कारणांमुळे डॉ. कुशलीन यांनी राजीनामा दिला आहे.

असे असले तरी रशियाने या लशीचे उत्पादन करण्यास सुरूवात केली आहे. संपूर्ण जगात या लशीवर टीका होत असताना रशियाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या लशीवर टीका केली आहे. असे असले तरी गमलेया या संस्थेने या लशीच्या निर्मितीस सुरूवात केली आहे. रशियन अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 12 महिन्यांमध्ये या लशीचे 50 कोटी डोस तयार केले जातील

ही लस सर्व आवश्यक चाचण्या केल्यानंतर बाजारात आण्ल्याचा  दावा रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. ही लस कोरोनाविरोधात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात यशस्वी झाल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे. ही लस एका व्यक्तीला दोन वेळा टोचली जाते. त्यामुळे किमान दोन वर्ष व्यक्तीच्या शरीरात कोरोनाविरोधात रोगप्रतिकारक शक्ती विकसित होत राहील. 76 लोकांवर या लशीची यशस्वी चाचणी केल्याचा दावाही रशियाने केला आहे.

या लशीची निर्मिती इतर देशातही सुरू होईल असे रशियन अधिकार्‍यांनी सांगितले आहे. युएई, सौदी अरेबिया आणि फिलिपाईन्स या देशात लवकरच या लशीची चाचणी सुरू होणार आहे. तर दुसरीकडे ही लस किती सुरक्षित आणि किती प्रभावी आहे याचा तपास झाला नसल्याचे ब्रिटीश वृत्तपत्र डेली मेलने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या