लग्नाच्या सात वर्षांत 11 मुलं! जोडप्याला करायचीये सेंच्युरी

मूल हे जगातल्या अनेक जोडप्यांसाठी वरदान असतं. आपला अंश जन्म घेताना, वाढताना बघणं ही अनेकांसाठी आनंदाची बाब असते. पण, एका जोडप्याने मात्र या वरदानाचा कहर केला आहे. लग्नाच्या सात वर्षांत त्यांना 11 मुलं असून कमीत कमी 105 तरी मुलं जन्माला घालण्याची त्यांची इच्छा आहे.

गलिप ओझुर्क (56) आणि क्रिस्टीना (23) असं या रशियन जोडप्याचं नाव आहे. सात वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. गलिप हे अतिश्रीमंत आर्थिक गटात येतात. या जोडप्याला तब्बल 11 मुलं आहेत. त्यांची सर्वात मोठी मुलगी व्हिका ही सहा वर्षांची आहे.

व्हिका ही क्रिस्टीना हिची जैविक मुलगी आहे. मात्र, तिच्या जन्मानंतर या जोडप्याने सरोगसीच्या माध्यमातून तब्बल 10 मुलांना जन्म दिला आहे. तिच्या कुटुंबात सामील झालेल्या तिच्या 11व्या बाळाचा जन्म देखील गेल्या महिन्यातच झाला, असं क्रिस्टीन म्हणते.

क्रिस्टीना हिच्या म्हणण्यानुसार तिला आईपणाचं व्यसन लागल्यासारखं वाटतं. त्यामुळे इतर कुणालाही नसतील इतकी मुलं मला हवीत असं वाटतं, अशी कबुली देखील तिने दिली आहे.

या कामी त्यांना बाटुमी येथील एक क्लिनिक मदत करतं. सरोगेट आई शोधणं, तिची निवड आणि पुढील प्रक्रिया हे सर्व त्या क्लिनिकच्या माध्यमातून होतं. आता 10 मुलं होऊनही तिची मातृत्वाची ओढ कमी झालेली नाही. उलट कमीत कमी 105 मुलं तरी जन्माला घालायची आहेत, असं तिचं म्हणणं आहे.

या सगळ्यात तिचे पती गलिप यांचीही तिला साथ मिळत असल्याचं तिचं म्हणणं आहे. 105 मुलं जन्माला घालून तिला या जगातल्या सगळ्यात मोठ्या कुटुंबाचा विक्रम करायचा आहे, असंही क्रिस्टीना सांगते.

आपली प्रतिक्रिया द्या