रशियाचं 50 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता, चीनच्या सीमेजवळ अचानक रडारवरून झालं गायब

रशियामध्ये 50 प्रवाशांना घेऊन जाणारे एक प्रवासी विमान बेपत्ता झाले आहे. सायबेरियाच्या एंगारा एअरलाईन्सद्वारे चालवले जाणारे हे विमान होते. हे विमान अमूर प्रांतातील टिंडा शहराकडे जात असताना अचानक रडारवरून गायब झाले. चीनच्या सीमेजवळ हा प्रकार घडला.

सायबेरियाच्या एंगारा एअरलाईन्सकडून चालवल्या जाणाऱ्या एएन-24 या प्रवासी विमानाचा रशियन हवाई वाहतूक विभागाचा संपर्क तुटला आहे. या विमानामध्ये 43 प्रवासी आणि 6 क्रू सदस्य होते. प्रवाशांमध्ये 5 लहान मुलांचाही समावेश आहे, अशी माहिती गव्हर्नर वसिली ऑर्लोव्ह यांनी दिली.

आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सदर विमान चीनच्या सीमेजवळील अमूर प्रांतातील टिंडा या शहराकडे जात असताना रडारच्या स्क्रीनवरून बेपत्ता झाले. विमानाचा संपर्क तुटला तेव्हा ते गंतव्य स्थानापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर होते. विमानाच शोध घेण्यासाठी आवश्यक सैन्य तसेच मदत आणि बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. मात्र विमान जिथे बेपत्ता झाले तो भाग डोंगराळ असून खराब हवामानामुळे बचाव पथकाला तिथपर्यंत पोहोचण्यात अडचण येत आहे.