हिंदुस्थानी फलंदाज फिरकीपुढे पूर्वीसारखे खेळतच नाहीत; सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांचे निरीक्षण

परदेशातील उसळत्या खेळपट्टयांवर चांगली कामगिरी करण्याच्या नादात हिंदुस्थानी फलंदाज फिरकी गोलंदाजांना पूर्वीसारखे मैदानाबाहेर भिरकावताना दिसत नाहीये. ती कला ते आता विसरलेले दिसताहेत, असे धक्कादायक निरीक्षण टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी नोंदविले. त्यांच्या या विधानात तथ्य वाटत असल्याने हिंदुस्थानी फलंदाजांसाठी ही नक्कीच चिंतेची बाब म्हणावी लागेल.

याआधी जगातील पुठल्याही फिरकी गोलंदाजांवर दादागिरी गाजविण्यात हिंदुस्थानी फलंदाज माहीत होते. आता हिंदुस्थानी फलंदाज वेगवान गोलंदाजीचा समर्थपणे सामना करताना दिसताहेत, मात्र परदेशी खेळपट्टय़ांवरील सरावाच्या नादात फिरकी गोलंदाजांना सहजपणे खेळण्याची कला आता हिंदुस्थानी फलंदाज विसरत चालले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थानी फलंदाजांनी फिरकीसमोर शरणागती पत्करल्याचे दिसून आले. या मालिकेत श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी हिंदुस्थानचे 27 फलंदाज बाद केले. त्यामुळे हिंदुस्थानला ही मालिका गमवावी लागली. श्रीलंकेने फिरकी गोलंदाजीच्या जिवावर तब्बल 27 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच हिंदुस्थानविरुद्ध द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केलाय. त्यामुळे घरच्या मैदानावर पाच कसोटी सामन्यांच्या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी हिंदुस्थानी फलंदाजांना पुन्हा फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी पारंगत करण्यावर भर द्यावा लागेल, असे प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करण्यावरच लक्ष्य केंद्रित केलेले दिसले. यातच फिरकीचा सामना करण्यात फलंदाज अपयशी ठरले. आता मला फिरकीचा सामना करण्यात हिंदुस्थानी फलंदाज सर्वोत्तम आहेत, ही ओळख पुन्हा हिंदुस्थानला मिळवून द्यायची आहे. त्यासाठी फलंदाजांकडून कसून सराव करून घेणार आहे.

‘फिरकीचा सामना कसा करायचा याचे तांत्रिक ज्ञान आम्ही काही फलंदाजांना देणार नाही. ते त्यांच्याकडे आहेच, मात्र आमचा भर त्यांची मानसिकता, परिस्थितीनुसार जागरूकता आणि लढतीत ठरावीक टप्प्यांवर कसे नियंत्रण राखावे यावर असणार आहे. त्यांच्यासमोर आम्ही काही कल्पना मांडणार आहोत. त्यांच्या चुका दाखवून देणार आहोत. त्यांना मानसिकदृष्टय़ा कणखर करणार आहोत,’ असे रायन यांचे नियोजन आहे.