दखल – इतिहासासाठी मौलिक कार्य

>>एस. के. पवार

हिंदुस्थान हा जगाच्या पाठीवरील बहुधा एकमेव देश असेल ज्याचा प्राचीन वैभवशाली इतिहास नेहमीच मोडतोड करून, मोठय़ा प्रमाणात दिशाभूल करून सादर करण्यात आला आहे. वेगवेगळय़ा कालखंडात, वेगवेगळय़ा शक्तींनी, वेगवेगळय़ा कारणांसाठी हे कार्य केलेलं असलं तरी त्यांचे स्वार्थ एकमेकांशी जुळत असल्यामुळे गेली 150-200 वर्षे ही दिशाभूल अविरत सुरूच आहे. मात्र गेल्या काही वर्षांत काही विद्वान संशोधकांनी मूलभूत संशोधनाच्या आधारे हिंदुस्थानचा खरा इतिहास सप्रमाण आणण्याचे मौलिक कार्य सुरू केले आहे.

या पार्श्वभूमीवर लेखक अभिजित जोग यांचे ‘असत्यमेव जयते…? भारताच्या इतिहासातील दिशाभूल’ हे पुस्तक हिंदुस्थानचा खरा इतिहास सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरते. भीष्म प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले असून स्वामी गोविंददेव गिरी यांचे आशीर्वाद तसेच आयसीसीआरचे अध्यक्ष, खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे. एखाद्या राष्ट्राचा समूळ नाश करण्यासाठी केवळ शस्त्रबलाने जिंकणे पुरेसे नसते, तर त्या राष्ट्राच्या जनतेची बौद्धिक धारणाच संपवून टाकणे आवश्यक असते असे आर्य चाणक्याने म्हटले आहे. हिंदुस्थानचा खरा इतिहास भ्रामक संशोधन व गुलामगिरीचे शिक्षण यांच्या माध्यमातून डागाळण्याचे व सपशेल डावलण्याचे षडयंत्र गेली दोन शतके अत्यंत चलाखीने व बिनबोभाट चालू असून त्यामुळे अनेक पिढय़ा न्यूनगंडाने पछाडून गेल्या हे या देशाचे वास्तव आहे. अभिजित जोग यांनी या पुस्तकाद्वारे चुकीच्या इतिहासावर बोट ठेवून वास्तविकता काय आहे याकडे लक्ष वेधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. रूढ इतिहासापेक्षा वेगळी, समांतर अथवा पर्यायी भूमिका घेऊन पुस्तकाची मांडणी केली असून ती सांगोवांगी स्वरूपाची नाही. सध्याच्या काळात शक्य त्या सर्व उपलब्ध साधनांचा, लिखित, पुरातत्त्वशास्त्राrय आणि आनुवंशिक अशा सर्व शक्य स्रोतांचा आणि पुराव्यांचा वापर करून अत्यंत अभ्यासू पद्धतीने खऱया हिंदुस्थानी  इतिहासाचे सुंदर संश्लेषण केले आहे.

आर्यांच्या आक्रमणाच्या खोटय़ा सिद्धांतापासून ते स्वातंत्र्य लढय़ापर्यंतच्या इतिहासाचा विस्तृत पट लेखकाने मांडला असून हिंदुस्थानचा इतिहास हा पराभवाचा इतिहास नसून संघर्षाचा इतिहास असल्याचे ठाम प्रतिपादन लेखकाने केले आहे. पुस्तकात एकूण आठ प्रकरणे असून पुस्तकाच्या अखेरीस दीर्घ संदर्भ सूचीदेखील जोडली आहे. पारंपरिक इतिहास लेखनापासून फारकत घेऊन अत्यंत सुलभ भाषेत वाचकांसमोर नवीन दृष्टिकोन निर्भीडपणे ठेवणारे हे पुस्तक वाचकांना हिंदुस्थानच्या गौरवशाली इतिहासाची जाणीव करून देईल आणि खऱया इतिहासाच्या शोधाची प्रेरणा देईल हे मात्र निश्चित!

असत्यमेव जयते…?

लेखक: अभिजित जोग

प्रकाशक: भीष्म प्रकाशन

पृष्ठे: 440, मूल्य: रुपये 599/-