ऑलिम्पिक खेळांसाठी ‘साई’चा पुढाकार, चार वर्षांमध्ये एक हजार क्रीडा सेंटर्स उभारणार

229

हिंदुस्थानातील युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखविण्यासाठी भक्कम व्यासपीठ मिळावे, यासाठी हिंदुस्थानी क्रीडा प्राधिकरण (साई) पुढील चार वर्षांमध्ये एक हजार ‘खेलो इंडिया’ क्रीडा सेंटर्स उभारणार आहे. ऑलिम्पिक खेळांनाच प्राधान्य देण्यात येणार्‍या या योजनेअंतर्गत सुरुवातीला एक हजार जिल्ह्यांमध्ये ही सेंटर्स बनविली जातील. त्यानंतर प्रत्येक वर्षी 300 सेंटर्स उघडली जाणार आहेत. या सेंटर्सच्या संचालनाची जबाबदारी माजी चॅम्पियन खेळाडू किंवा ‘एनआयएस’ कोच यांच्याकडे असणार आहे. तसेच स्वतःच्या जिल्ह्यामध्ये सेंटर उघडण्याचा प्रस्तावही माजी खेळाडू व एनआयएस कोचकडून यावेळी ठेवण्यात येऊ शकतो.

दहा लाखांचा निधी मिळणार

क्रीडा सेंटर उभारण्यासाठी ‘साई’कडून माजी चॅम्पियन खेळाडू किंवा एनआयएस कोचला 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत. यावेळी पाच लाख रुपये सेंटर उभारण्यासाठी देण्यात येणार असून, उर्वरित पाच लाख रुपये पुढील चार वर्षांसाठी देण्यात येणार आहेत. यामधील तीन लाखांची रक्कम प्रशिक्षकांना देता येऊ शकते. उर्वरित दोन लाख रुपये सेंटरमधील इतर कामांसाठी वापरण्यात येऊ शकतात.

या 15 खेळांनाच प्राधान्य

या सेंटरमध्ये ऑलिम्पिक खेळांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये क्रीडाक्षेत्रासाठी उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या संस्थांनाच तीन खेळांसाठी सेंटर उघडण्याची परवानगी देण्यात येणार आहे. अन्यथा प्रत्येक सेंटरमध्ये एकाच खेळाचा सराव करता येणार आहे. सेंटरमध्ये तिरंदाजी, ऍथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, सायकलिंग, तलवारबाजी, हॉकी, ज्युडो, रोइंग, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती, फुटबॉल या खेळांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे.

 20 जुलैपर्यंत प्रस्ताव पाठवू शकतो

आपआपल्या राज्यांतील जिल्ह्यांमध्ये सेंटर उभे राहावे, यासाठी येत्या 20 जुलैपर्यंत प्रस्ताव पाठविण्याची मुभा ‘साई’कडून देशातील प्रत्येक राज्याला देण्यात आली आहे. या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर सर्वोत्तम प्रस्ताव असलेल्या राज्याचे निवेदन ‘साई’मधील क्षेत्रीय कार्यालयात पाठविण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या