‘सामना’ने बनवला पहिला मराठी ‘एआय’ न्यूज अँकर… तेजस्वी देणार बातम्या, नेटकऱ्यांनी केलं स्वागत

सध्याचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे आहे. जगभरात ‘एआय’ म्हणजेच आर्टीफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर सामनाने देखील ‘एआय’ च्या माध्यमातून बातम्या देण्यास सुरुवात केली आहे.

प्रसारमाध्यमांच्या इतिहासात पहिल्यांचादाच ‘एआय’चा वापर करून सामनाने पहिला मराठी अधिकृत न्यूज अँकर बनवला आहे. ‘एआय’ तेजस्वी असे त्या अँकरचे नाव असून तो सामनाच्या फॉलोअर्सला तंत्रज्ञान, मनोरंजन तसेच दैनंदिन जीवनातील घडामोडी या विषयाचे काही विशेष बातम्या देणार आहे. ‘एआय’ तेजस्वी या सामनाच्या प्रयोगाचे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर जोरदार स्वागत केले आहेत. सध्या सोशल मीडियावर या प्रयोगाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

‘एआय’ तंत्रज्ञानाची सर्वच क्षेत्रांमध्ये झपाट्याने प्रगती होत आहे. यात आता मीडिया क्षेत्रही मागे राहिलेले नाही. मीडियामध्येही ‘एआय’ तंत्रज्ञानाने शिरकाव केला आहे. सामनाने यात एक पाऊल पुढे जात अँकर निर्मिती केली आहे. त्यामुळे आता ‘एआय’ अँकरच्या माध्यमातून सामना आता नेटकऱ्यांपर्यंत बातम्या पोहचवणार आहे.