‘संक्रांत सोहळा’ – संधीचं सोनं करा… नटा, सजा… फोटो पाठवा,

महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी नवीन वर्षातील पहिलीच डिजिटल स्पर्धा ‘संक्रांत सोहळा’ व्रॅव्हॉन आणि मिती क्रिएशन्सने आयोजित केली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांमधील अनेक कलाकारांनी या स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धक महिलांशी संवाद साधला. महिलांना आपल्या कोशातून बाहेर पडून स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही स्पर्धा म्हणजे नक्कीच एक उत्तम व्यासपीठ ठरेल, असे मत या कलाकारांनी व्यक्त केले.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील गौरी म्हणजेच गिरिजा प्रभू आणि शालिनी म्हणजेच माधवी निमकर या कलाकारांनी याप्रसंगी संक्रांतीविषयीच्या आपल्या गोड आठवणी प्रेक्षकांना सांगितल्या. त्याचबरोबर ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील दीपा म्हणजेच रेश्मा शिंदे, राधा म्हणजेच पूर्णिमा तळवलकर आणि सौंदर्या म्हणजेच हर्षदा खानविलकर या कलाकारांनीदेखील प्रेक्षकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात महिलांना मनासारखे नटता, सजता आलेच नाही. त्यामुळे घरबसल्या छान सजण्याची ही संधी महिलांना या स्पर्धेमुळे मिळते आहे ही खरेच आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा सर्व महिलांनी या संधीचे सोने करा आणि लगेचच फोटो पाठवा. आम्ही तुमच्या पह्टोंची वाट बघत आहोत असे हर्षदा खानविलकर म्हणाल्या.

रॅम्पवॉक, कलागुण, प्रश्न उत्तरे असे या स्पर्धेचे स्वरूप असून दैनिक ‘सामना’ या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहे. प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या महिलांना पुढील फेरीत सहभागी होता येईल. एक-एक फेरी जिंपून पुढे येणारी महिला यंदाची संक्रांत सोहळा क्वीन ठरणार असून तिला इशा टुर्सतर्फे लडाखची मोफत टूर करता येणार आहे, असे मिती ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि संस्थापिका उत्तरा मोने यांनी सांगितले. स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी महिलांनी काळ्या रंगाची साडी नेसून त्यावर साजेसे दागिने घालून आपले फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवायचे आहेत. फोटो पाठविण्यासाठी 28 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आपले फोटो 9930115759 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करायचे आहेत. तसेच या पुढील स्पर्धेच्या वेळी मधुराणी प्रभुलकर, मिलिंद गवई, सिद्धार्थ चांदेकर असे अनेक कलाकार सहभागी होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या