
धनंजय
वाचकांना काही नेमक्या अंकांची कायम प्रतीक्षा असते. त्यात धनंजय दिवाळी अंकाचा प्रमांक कायम वर राहिला आहे. कथा या साहित्यप्रकाराला वाहिलेला दिवाळी अंक ही धनंजय दिवाळी अंकाची विशेष ओळख. या वर्षी त्याहीपलीकडे जात त्यांनी समस्त वाचकांना वेगळी पर्वणी दिली आहे ती म्हणजे यंदा ‘रहस्यकथांचा बादशाह’ नारायण धारप यांच्या रहस्यकथांवर आधारित विशेष विभाग अंकात आहे. यालाच अनुसरून हेरकथा, भयगूढ कथा, रहस्यकथा असे इतर विभागही यात आहेत. नामांकित लेखक, कथाकार यांची वर्णी असलेल्या अंकात गणेश मतकरी, हृषिकेश गुप्ते, प्रणव सुखदेव यांचे नारायण धारपांच्या साहित्यावर आधारित लेख तसेच श्रीनिवास शारंगपाणी, अरुण मनोहर, श्रीकांत बोजेवार, डॉ. बाळ फोंडके, निखिलेश चित्रे यांच्या कथा आवर्जून वाचण्याजोग्या आहेत. वैशिष्टय़पूर्ण मुखपृष्ठासह संपूर्ण अंक संग्राह्य आणि वाचनीय आहे.
संपादिका : नीलिमा कुलकर्णी
पृष्ठs : 360 मूल्य : रु. 450/-
साहित्य संस्कृती
साहित्य संस्कृती दिवाळी अंक नावाप्रमाणेच महाराष्ट्रातील विविध संस्कृतींचा वेध घेणारा असतो. यंदा या दिवाळी अंकाचे 10 वे वर्ष असून या वर्षी बोलीभाषांचे वैभव उलगडणारे वैविध्यपूर्ण लेख अंकात वाचावयास मिळतील. विविधतेने नटलेल्या महाराष्ट्राचे खरे दर्शन घडते ते इथल्या बोलीभाषांमधून. याच बोलीभाषेची विविध वैशिष्टय़े, त्यातील सहजाविष्कार मांडणारे हे लेख वाचकांना निश्चित आवडतील. कोकणी, मालवणी, वऱहाडी, अहिराणी अशा परिचित बोलींसोबत सामवेदी, लेवा गणबोली, वाडवळी अशा फारशा माहीत नसणाऱ्या बोलीभाषांचा इतिहास, त्यातील शब्द, उच्चार आणि त्यातील गोडवा यासह हे लेख परिपूर्ण आहेत. महेश केळुसकर, पंढरीनाथ तामोरे, जेलसिंग पवार, मेरी तुस्कानो, मनोहर राठोड अशा बोली अभ्यासकांचे हे लेख आवर्जून वाचावेत असे आहेत.
संपादिका : वंदना नाईक
पृष्ठs : 90 मूल्य : रु. 200/-
सागरलाटा
गेल्या 23 वर्षांपासून प्रकाशित होणारा ‘सागरलाटा’ हा दिवाळी अंक या वर्षी ‘स्त्रियांचे विविध पैलू आणि प्रश्न’ या संवेदनशील विषयाला वाहिलेला आहे. स्त्रियांमध्ये सजगता वाढत आहे – डॉ. इब्राहीम अफगाण, स्त्राrची भावनिक गरज आणि समाज – शिल्पा गंजी, हिंदू स्त्रियांचे धार्मिक स्वातंत्र्य – प्रवीण दामले, स्त्राrकडे बघण्याचा दृष्टिकोन – मुग्धा फाटक असे मुख्य विषयांची मांडणी करणारे लेख वाचनीय झाले आहेत. याशिवाय नलिनी पुजारी, तृप्ती पारसनीस, साधना पाटील, अपर्णा कुलकर्णी, डॉ. श्रुती देऊलकर यांच्यासह अन्य लेखकांचे लेख, कथा, कविता यांची साहित्यिक मेजवानी यात आहे. सोबत इतरही कथा, लेख, कविता असे बहुरंगी वाचनीय साहित्य यात आहे.
संपादक : अजीव पाटील पृष्ठे : 140 मूल्य : 250/- रुपये.
कमांडर
दरवर्षी एखादा विशिष्ट विषय घेऊन त्यावर विशेषांक प्रकाशित करणे हे कमांडरचे वैशिष्टय़. यंदा 29 व्या वर्षात पदार्पण करताना युद्धपट व देशभक्तीपर चित्रपट असा अनोख्या विषयाला वाहिलेला ‘कमांडर’चा अंक रोचक आहे. 48 हिंदी, मराठी, इंग्रजी युद्धाधारित /देशभक्तीपर चित्रपट, युद्धपटांशी संबंधित माहितीपूर्ण लेख यात आहेत. डॉ. वि. ल. धारुरकर, प्रफुल्ल फडके, दिलीप ठाकूर, श्रीनिवास बेलसरे, शरद कोरडे, रवींद्र देवधर, सना पंडित, अपर्णा कुलकर्णी, राम खेडकर, अजितेम जोशी, मल्हार दामले, धनंजय कुलकर्णी, मिलिंद कल्याणकर, बंडा यज्ञोपवित, श्रीकांत सराफ, रमेश धनावडे, देवेंद्र प्रभुणे अशा अनेक मान्यवरांचे लेख आहेत. ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’, ‘द डर्टी डझन’सारखे हॉलीवूड क्लासिक युद्धपट, ‘हकिकत’, ‘बॉर्डर’सारखे हिंदी युद्धपट, मराठी युद्धपट व देशभक्तीपर चित्रपटांवर आधारित लेख अंकात आहेत. वेगळं काहीतरी देण्याचा शिरस्ता कायम ठेवत ‘क्या दिल्ली क्या लाहौर’ आणि ‘द गाझी अॅटॅक’, लेफ्टनंट कर्नल अनंत काटकरांचा जीवनपट उलगडणारा लेख यांचा उल्लेख करायलाच हवा!
संपादक : डॉ. राजू पाटोदकर, प्रा. डॉ संजय पाटील-देवळाणकर
पृष्ठे : 192 मूल्य : 300 रुपये


























































