
देशाच्या मंत्रिमंडळात अनेकांची प्रकृती बरी नाही. तरी यापैकी अनेक मंडळी सरकारमध्ये आहेत. अनेक प्रकारची ‘कांडे’ करून प्रत्येकजण आपापल्या पदांना चिकटून आहे, परंतु उपराष्ट्रपतीपदाचा डाव अर्ध्यावर मोडून धनखड यांना मात्र अज्ञातवासात पाठवले गेले. सरकारने त्यासाठी प्रकृतीचे कारण आता दिले. पण स्वतः धनखड यांनी ते कारण फेटाळले. मोदी-शहांनी ठरवले की, आपल्या उपराष्ट्रपतींची प्रकृती बरी नाही. त्यानुसार धनखडांच्या प्रकृतीबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून ते राजीनामा पत्रास जोडण्यात आले व धनखड पुढचे सहा महिने पुढील उपचारासाठी अज्ञातवासात गेले. आता ते स्वयंउपचारांनी बरे झाले व प्रकटले. धनखड प्रकटले ते बरे झाले. त्यांनी आता त्यांच्या प्रकृतीविषयी व सहा महिन्यांतील उपचारांविषयी देशाला माहिती दिलीच पाहिजे!
उपराष्ट्रपतीपदाचा अचानक त्याग करावा लागल्यानंतर अज्ञातवासात गेलेले जगदीप धनखड गेल्या आठवड्यात अचानक प्रकट झाले. फक्त प्रकटलेच नाहीत तर आपल्या राजीनाम्याच्या कारणाविषयी त्यांनी मोठा गौप्यस्फोटदेखील केला. राजस्थानातील चुरू येथील कार्यक्रमात अनेकांनी धनखड यांना ‘याचि देही याचि डोळा’ सुखरूप पाहिले. त्यामुळे गेल्या सहा-सात महिन्यांपासून धनखड यांच्याविषयी अनेकांना असलेली काळजीही दूर झाली असेल. पुन्हा स्वभावानुसार धनखड यांनी ‘उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा मी आजारपणामुळे दिलाच नव्हता’ असा खळबळजनक खुलासा केला. धनखड यांचा खुलासा हा एक प्रकारे स्फोटच आहे. धनखड यांनी आता जे स्पष्टीकरण दिले ते अनेकांना गोंधळात टाकणारे आहे. 25 जुलै, 2025 रोजी उपराष्ट्रपती पदावरील धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. प्रकृतीच्या कारणास्तव आपण पदत्याग करीत असल्याचे राजीनामा पत्र उपराष्ट्रपतींनी दिले, पण त्यांनी आता जो खुलासा केला आहे त्यावरून वेगवेगळे अर्थ निघतात. धनखड यांनी त्यांचे राजीनामा पत्र स्वतः लिहिले नव्हते. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे पत्र गृहमंत्री किंवा पंतप्रधानांच्या संसदेतील दालनात तयार झाले व त्यावर जोरजबरदस्तीने उपराष्ट्रपती धनखड यांची सही घेतली असे जनतेने समजायचे का? पुन्हा त्यानंतर तब्बल सहा महिने उपराष्ट्रपती पदावरील ही व्यक्ती गायब झाली. जगदीप धनखड कोठे आहेत? त्यांचे काय झाले? हे प्रश्न अनेकांनी विचारले. आता सहा महिन्यांनंतर धनखड प्रकट झाले व राजीनामा पत्रातील तब्येतीचा मुद्दा खोडून काढला. धनखड यांनी राजीनामा स्वखुषीने दिला यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. राजीनामा देऊन धनखड अज्ञातवासात गेले. त्यांचे ‘तोंड’ शिवून त्यांना जणू
अज्ञातवासात ढकलले गेले
होते. धनखड काय करतात? कोठे राहतात याची माहिती सहा महिने कुणालाच नव्हती. उपराष्ट्रपतींना निवृत्तीनंतर नवी दिल्लीत कायमस्वरूपी निवासस्थान दिले जाते. धनखड यांना अद्यापि घर मिळालेले नाही. धनखड आता राजीनाम्याच्या धक्क्यातून व अज्ञातवासातून बाहेर पडलेले दिसतात व ते फिरू आणि बोलू लागले आहेत. धनखड यांना बोलण्याचा शौक तर होताच, त्यामुळे राज्यसभेत ते आपल्या प्रवचनातून खासदारांचा बराच वेळ खात होते, अशी तक्रार होती. त्यांच्या प्रवचनातून मुख्यतः पंतप्रधान मोदी व भाजप सरकारचीच भलामण होती. आपण सदैव संवैधानिक पदावर राहू असे त्यांचे मन त्यांना सांगत असावे. पण एके दिवशी सरकारी फर्मान सुटले. धनखड यांना रातोरात कायमचे घरी जावे लागले. राजीनामा दिला त्या दिवशी राज्यसभेत त्यांची प्रकृती ठणठणीत होती. मात्र सरकारने ठरवले की, आपल्या उपराष्ट्रपतींची प्रकृती बरी नाही व त्यांनी ‘मौन’ स्वीकारून विश्रांती घेतली पाहिजे. त्यानुसार सरकारने त्यांना सक्तीच्या विश्रांतीवर पाठवले. ही विश्रांती त्यांना नकोशी झाली व ते घराबाहेर पडले. धनखड यांनी अलीकडे राजस्थानातील चुरू येथे जे भाषण केले त्यातून तेच स्पष्ट होते. राजस्थानातील भाषणात धनखड म्हणतात, ‘निरोगी शरीर हा आनंदाचा पहिला स्रोत आहे असे म्हटले जाते. मी कधीही माझ्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले नाही. राजीनामा देताना मी कधीही म्हटले नव्हते की, मी आजारी आहे.’ माजी उपराष्ट्रपतींनी अशाप्रकारे त्यांच्या राजीनाम्यामागचे रहस्य लोकांसमोर आणले. मात्र तेवढ्यावर न थांबता श्री. धनखड यांनी त्या दिवशी पडद्यामागे व त्यांच्या संसदेतील दालनात काय घडले यावरही प्रकाश टाकला पाहिजे. देशातील संवैधानिक पदांचा सन्मान राखायचा नाही, संवैधानिक पदावर आपल्या मार्जीतील बुळबुळीत माणसे नेमायची व त्या व्यक्तीने ‘ताठ’ कणा दाखवला की त्याला उचलून फेकायचे. अशा प्रकारचे काम
दहा वर्षांपासून
भारतीय लोकशाहीत सुरू आहे. देशाच्या मंत्रिमंडळात अनेकांची प्रकृती बरी नाही, अनेकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. तरी यापैकी अनेक मंडळी सरकारमध्ये आहेत. केजरीवाल व त्यांच्या लोकांना बेकायदेशीरपणे अटक करणाऱ्या ‘सीबीआय’सारख्या संस्थांचे मानसिक आरोग्य चांगले नाही, हे न्यायालयाच्या निकालावरून दिसते. पण तरीही सीबीआयला टाळे लागलेले दिसत नाही. ‘एपस्टिन फाईल्स’मध्ये केंद्रीय मंत्री पुरी यांचे नाव आले, पण सरकारने पुरी यांचा राजीनामा घेऊन त्यांना अद्याप तरी घरी पाठवले नाही. पण उपराष्ट्रपती धनखड यांना रातोरात घरी पाठवण्याचा कार्यक्रम मोदी-शहांनी केला. पुलवामा, पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान व गृहमंत्री यांनादेखील त्यांच्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नव्हता, पण ते त्यांच्या पदावर आहेत. अनेक प्रकारची ‘कांडे’ करून प्रत्येकजण आपापल्या पदांना चिकटून आहे, परंतु उपराष्ट्रपतीपदाचा डाव अर्ध्यावर मोडून धनखड यांना मात्र अज्ञातवासात पाठवले गेले. सरकारने त्यासाठी प्रकृतीचे कारण आता दिले. पण स्वतः धनखड यांनी ते कारण फेटाळले. जगदीप धनखड यांनी सरकारविरोधी राजकीय पक्षांशी चांगले संबंध प्रस्थापित केले होते आणि त्या खासगी बैठकांमधून काही स्फोटक विचारांचे आदानप्रदान त्यात झाले. त्याचा वृत्तांत मोदी-शहांच्या कानापर्यंत पोहोचला. त्यानंतर मोदी-शहांनी ठरवले की, आपल्या उपराष्ट्रपतींची प्रकृती बरी नाही, त्यांना उपचार आणि विश्रांतीची गरज आहे. त्यानुसार धनखडांच्या प्रकृतीबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून ते राजीनामा पत्रास जोडण्यात आले व धनखड पुढचे सहा महिने पुढील उपचारासाठी अज्ञातवासात गेले. आता ते स्वयंउपचारांनी बरे झाले व प्रकटले. धनखड प्रकटले ते बरे झाले. त्यांनी आता त्यांच्या प्रकृतीविषयी व सहा महिन्यांतील उपचारांविषयी देशाला माहिती दिलीच पाहिजे!





























































