सामना अग्रलेख – जग हे बंदिशाला.. पण जीव वाचवण्यासाठीच!

6056

‘जग हे बंदिशाला…’ या गीतातील शब्दांप्रमाणे आज साऱया जगाचे रुपांतर तुरुंगात झाले हे खरे असले तरी काही दिवसांचे हे बंदीस्त जीवन जनतेचे जीव वाचवण्यासाठीच आहे हे सर्वानीच नीट समजून घेतले पाहिजे. या परिस्थितीत आपले जीव धोक्यात घालून जनतेच्या हितासाठी सेवा देणाऱ्या पोलीस आणि डॉक्टरांशी हमरीतुमरी करणे, हुज्जत घालणे, हाणामारी करणे हा नादानपणा आहे. मूठभर लोकांची बेशिस्त संपूर्ण समाजालाच त्रासदायक ठरू शकते.

कोरोनाच्या दहशतीमुळे सारे जग चिंताक्रांत झाले आहे. जगभरातील पावणे दोनशे देशांमध्ये कोरोनाच्या विषाणुने आपले हातपाय पसरले आहेत. प्रत्येक देश कोरोनापासून बचाव करण्यासाठी युद्धपातळीवर संघर्ष करत आहे. मात्र हा घातक विषाणु नवनवीन देशांत, नवनवीन शहरांत आणि रोज काही हजार नव्या लोकांमध्ये संक्रमीत होऊन आपला विळखा आणखी घट्ट करत आहे. मृत्यूची मगरमिठीच मारणाऱ्या या विषाणुला समुळ कसे उखडून फेकायचे यासाठी जगभरातील मातब्बर देश आणि शास्त्रज्ञ मंडळी आपली सगळी शक्ती पणाला लावत आहेत. मात्र कोरोनाचा खात्मा करण्याचे अक्सीर औषध अजून तरी सापडलेले नाही. चिंता आहे ती एकाच गोष्टीची की, कोरोनावर औषध नाही! त्यामुळे या विषाणुची बाधाच न होऊ देणे हाच त्यावर एकमेव उपाय आहे. आजवर कोणीही कधीही पाहिले नव्हते, अनुभवले नव्हते असे हे संकट आहे. महाभारतातल्या अभिमन्यूसारखी साऱया जगाची अवस्था झाली आहे. कोरोनाचे संकट तर कोसळले आहे, पण या चक्रव्युहातून बाहेर कसे पडायचे याचे रहस्य मात्र कोणालाच ठाऊक नाही. हा रहस्यभेद ठाऊक नाही म्हणून हातपाय गाळून बसणे हा काही मार्ग असू शकत नाही. त्यामुळेच विद्यमान परिस्थितीतील बचावाचा सर्वात सुरक्षित मार्ग जगभरातील देशांनी स्विकारला आणि लॉकडाऊन जाहीर केले. आपापल्या देशातील जनतेला बंदीस्त राहण्यास सांगितले. जगभरातले दीड-दोनशे कोटीहून अधिक लोक आपापल्या घरात बंद आहेत. कुठलाही गुन्हा न करता एक प्रकारचा हा

तुरुंगवासच

आपण भोगतोय असे कुणाला वाटत असले तरी जनतेचे प्राण वाचवणे हाच एकमेव आणि स्वच्छ हेतू यामागे आहे हे सर्वांनीच समजून घेतले पाहिजे. जनतेला कैद्यासारखे डांबून ठेवणे कुठल्या राज्यकर्त्याला आवडेल? उद्योग, व्यापार, वाहतूक, दळणवळण सारे काही ठप्प करून अर्थव्यवस्थेला चूड लावणारा लॉकडाऊनचा निर्णय कुठल्याही देशाने अथवा राज्याने काही हौसेने घेतलेला नाही. आपल्या राज्यातील आणि देशातील जनतेच्या प्राणांचे रक्षण करणे, कोरोनाच्या जीवघेण्या विषाणुपासून दूर ठेवणे यासाठीच हा सगळा खटाटोप सुरू आहे. सरकारच्या या प्रयत्नांना जनतेनेदेखील सकारात्मक प्रतिसाद देऊन कोरोनाचा आणखी गुणाकार होणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर राज्यभरातील बहुतांश जनता सरकारच्या सुचनांचे पालन करताना दिसत आहे. सरकारची सज्जता आणि डॉक्टरांचे प्रयत्न यामुळे राज्यातील 15 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अवघे जग कोरोनाच्या सावटाखाली असताना राज्यातील ही बातमी नक्कीच दिलासादायक आहे. डॉक्टर्स आणि एकूणच आरोग्य यंत्रणेचे यासाठी कौतुक केले पाहिजे. अर्थात, संपूर्ण सरकारी यंत्रणा जनतेचे जीव वाचवण्यासाठी झगडत असताना काही ठिकाणी मात्र पोलीस आणि आरोग्य प्रशासनाशी तंटाबखेडा करण्याचे जे प्रकार घडत आहेत, ते दुर्दैवीच म्हणायला हवेत. बीड जिह्यातील सिरसाळा येथे संचारबंदी झुगारून घराबाहेर पडणाऱया नागरिकांना पोलिसांनी मज्जाव केला म्हणून जमावाने पोलिसांवरच हल्ला चढवला. नागरिक आणि पोलीस यांच्यात तब्बल 10 मिनिटे चाललेल्या या धुमश्चक्रीत अनेक जण जखमी झाले. आपल्या

जीविताचे रक्षण

करण्यासाठीच कोरोनाच्या साथीतही घरदार सोडून बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर अशा प्रकारचा हल्ला चढवणे हे सभ्य समाजाचे लक्षण नाही. नाशिक जिह्याच्या मालेगावात तर एमआयएमच्या एका आमदारानेच वैद्यकीय अधिकाऱयांना मारहाण केली. महाराष्ट्र आणि सारा देश डॉक्टरांच्या सेवाकार्याचा सन्मान करत असताना एका लोकप्रतिनिधीने डॉक्टरवर हात उचलणे हे आमदारकीची आब घालवणारे लक्षण आहे. तेव्हा सर्वांनीच परस्परांना समजून घेत या कठीण काळावर मात करायला हवी. `जग हे बंदिशाला…’ या गीतातील शब्दांप्रमाणे आज साऱया जगाचे रुपांतर तुरुंगात झाले हे खरे असले तरी काही दिवसांचे हे बंदीस्त जीवन जनतेचे जीव वाचवण्यासाठीच आहे हे सर्वानीच नीट समजून घेतले पाहिजे. या परिस्थितीत आपले जीव धोक्यात घालून जनतेच्या हितासाठी सेवा देणाऱ्या पोलीस आणि डॉक्टरांशी हमरीतुमरी करणे, हुज्जत घालणे, हाणामारी करणे हा नादानपणा आहे. मूठभर लोकांची बेशिस्त संपूर्ण समाजालाच त्रासदायक ठरू शकते.

आपली प्रतिक्रिया द्या