सामना अग्रलेख – पेच आणि चक्रव्यूह  आम्हाला पर्वा नाही!

16026

मुख्यमंत्रीपदाचा म्हणा किंवा समसमान पदवाटपाचा ‘पेच’ पडला आहे हे नक्की. जर सर्वकाही आधीच ठरले असेल तर ‘पेच’ का पडावा? आम्ही दिलेल्या शब्दाला जागतो व मानतो. महाराष्ट्राचा वैचारिक पाया ‘धर्म’ आणि ‘नीती’ यावर टिकून आहे. पाया विचारांचा असतो. त्यावर शिखरे उभारली जातात. आम्ही शिवरायांच्या विचाराने व शिवसेनाप्रमुखांच्या प्रेरणेचा वसा घेऊन पुढे जात आहोत, मग ‘पेच’ पडोत नाही तर ‘चक्रव्यूह’ निर्माण होवोत. लढणार्‍यांना संकटांची पर्वा ती काय!  

महाराष्ट्राच्या राजकारणास चार दिशा आणि चार पाय फुटले आहेत. राज्याच्या हितासाठी हे बरे नाही. 24 तारखेस विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले, पण 30-31 तारीख उलटून गेली तरी सरकार स्थापनेच्या हालचाली नाहीत. ‘युती’स जनादेश मिळूनही हे अधांतरी वातावरण निर्माण झाले. या काळात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी पक्षांनी आपापल्या पक्षाचा विधिमंडळ नेता निवडला आहे, पण अखिल हिंदुस्थानचे लक्ष लागले आहे ते शिवसेना-भाजप युतीचे नक्की काय होते? सत्तापदांचे समान वाटप हा दोन पक्षांतील कळीचा मुद्दा आहे. कळ लावण्याचे तसे कारण नव्हते, पण कळ लागली आहे. युती किंवा आघाड्यांमध्ये कोणी किती जागा जिंकल्या यापेक्षाही जास्त महत्त्वाचा असतो तो परस्परांत झालेला सत्तावाटपाचा करार. निवडणूक लढवताना तो पाळला पाहिजेच, पण निकालानंतरही हा करार दोन्ही बाजूंनी पाळणे तितकेच महत्त्वाचे आणि विश्वासार्हतेचे असते. लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘युती’च्या विझलेल्या वाती पेटवताना जे ठरले होते ते सर्व अमलात आणावे. शिवसेनेची मागणी आहे ती एवढीच. युतीच्या वाती पेटवताना विश्वासाचे तेल समईत ओतले. ते तेल नव्हते तर गढूळ पाणी होते काय? तर अजिबात नाही. सत्तापदांचे समान वाटप हा शब्द मुख्यमंत्र्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत वापरला व तो सहमतीने वापरला. आता एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री पद हे ‘सत्तापदा’त येत नाही असे कुणाचे म्हणणे असेल तर राज्यशास्त्राचे धडे नव्याने लिहावे लागतील.

समान वाटपात सगळेच

आले. 2014 साली देशात मोदी यांच्या नेतृत्वाखाली भव्य यश मिळताच भाजपने शिवसेनेबरोबरची ‘युती’ तोडली व 2019 साली तसेच ‘यश’ मिळाल्याप्रमाणे गरज सरो वैद्य मरोचा दुसरा अंक सुरू झाला आहे, पण इथे ‘वैद्य’ मरणार नाही. त्याच्या जिभेखाली संजीवनी गुटिका आहे व ही संजीवनी महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद आहे. ‘मुख्यमंत्री’ हे सत्तापद नाही व त्याचे समान वाटप करता येणे शक्य नसेल असे कुणाला वाटत असेल तर त्या बिन ‘सत्ते’च्या पदासाठी देशभरात इतका आटापिटा कशासाठी? मुख्यमंत्रीपदाचा म्हणा किंवा समसमान पदवाटपाचा ‘पेच’ पडला आहे हे नक्की. जर सर्वकाही आधीच ठरले असेल तर ‘पेच’ का पडावा? जे ठरले आहे त्यासाठी साक्षीपुराव्यांची गरज नाही, पण सध्या धर्मग्रंथांवर हात ठेवून लोक शपथेवर खोटे बोलतात असा जमाना आहे. आम्ही दिलेल्या शब्दाला जागतो व मानतो. शिवसेनाप्रमुखांकडून हा संस्कार आम्ही घेतला आहे. ‘‘उद्धव, विचार केल्याशिवाय कुणाला शब्द देऊ नकोस आणि एकदा शब्द दिल्यावर माघार घेऊ नकोस.’’ ही बाळासाहेबांची शिकवण आम्ही सदैव आचरणात आणली. भारतीय जनता पक्ष म्हणजे आमचे जन्मजात वैरी नव्हतं. सध्याच्या राजकारणाचा एकंदरीत सारीपाट पाहिला तर कोणीही कुणाचा शत्रू नाही. निवडणुकीच्या निकालानंतर शत्रुत्व संपले, मग उरतात ते वैचारिक मतभेद. असे मतभेदही भाजपसोबत असण्याचे कारण नाही. विचार दोघांचाही एकच आहे, तो म्हणजे हिंदुत्वाचा. त्यात कोठे

तडे जाण्याचा

प्रश्नच येत नाही. भारतीय जनता पक्षाने शंभरावर जागा जिंकण्यासाठी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक लोक स्वपक्षात आणले. तरीही कालच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हे सर्व लोक डोक्यावर भगवे फेटे बांधून गेले. आम्ही मानतो ते त्या भगव्या रंगाला. शिवसेनेच्या अंतरंगात भगव्याचे तुफान सदैव उसळतच आले आहे. हा रंग तेजाचा, त्यागाचा आणि स्वाभिमानाचा आहेच. त्यापेक्षा सचोटीचा आहे. म्हणूनच शिवरायांच्या राज्यात प्रत्येकाने भगव्याची शान राखून राजकारण करावे. नाही तर ‘उपरे’ छातीवर बसतील, हा विचार महाराष्ट्रात रुजवला तो शिवसेनाप्रमुखांनी. विचार हाच जीवनाचा पाया आहे. विचारामुळेच चळवळी होतात. जोश निर्माण होतो. राज्ये घडवली जातात. हिंदवी स्वराज्य निर्माण झाले तेसुद्धा शिवरायांनी टाकलेल्या एका विचाराच्या ठिणगीने. संयुक्त महाराष्ट्राचा वणवा पेटला तोसुद्धा ‘स्वाभिमान’ या विचाराने. शिवसेनेची स्थापना आणि वादळ उठत राहिले त्यामागेही एका विचाराची मशाल होती आणि आहे. भगवा रंग हीच प्रेरणा आहे. उसने अवसान आणून प्रेरणा घेता येत नाही. निर्माणही होत नाही. शिवराय आणि छत्रपती संभाजीराजांनंतर शिवरायांच्याच विचाराने महाराष्ट्र संघर्ष करीत राहिला, लढत राहिला. हा लढाऊ बाणाच महाराष्ट्राला शक्ती देत आला आहे. महाराष्ट्राचा वैचारिक पाया ‘धर्म’ आणि ‘नीती’ यावर टिकून आहे. पाया विचारांचा असतो. त्यावर शिखरे उभारली जातात. आम्ही शिवरायांच्या विचाराने व शिवसेनाप्रमुखांच्या प्रेरणेचा वसा घेऊन पुढे जात आहोत. मग ‘पेच’ पडोत नाही तर ‘चक्रव्यूह’ निर्माण होवोत. लढणाऱयांना संकटांची पर्वा ती काय?

आपली प्रतिक्रिया द्या