आजचा अग्रलेख : स्वातंत्र्याच्या डोक्यावरचे ‘ओझे’ उतरले, लाल किल्ला ते लाल चौक

2480

देश नव्याने उभा राहात आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय, याचा अनुभव कश्मिरी जनतेने आता घ्यावा. कलम 370 हटवल्यानंतर त्यांना आझादी म्हणजे स्वातंत्र्य काय असते त्याचा अनुभव घेता येईल. लाखो पंडितांना कश्मीरात परतण्याचे स्वातंत्र्यही आता मिळू शकेल. कलम 370 पासून सुरुवात झाली. तिहेरी तलाक हा थांबा आहे. समान नागरी कायदा आणि पाकव्याप्त कश्मीरवर तिरंगा फडकणे हे अंतिम ध्येय आहे. आज लाल किल्ल्याबरोबर श्रीनगरच्या लाल चौकातही तिरंगा फडकत आहे! आमचे स्वातंत्र्य चिरायू आहे! स्वातंत्र्याच्या डोक्यावरचे ओझे उतरले आहे!

आजच्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदी हे लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतील. गेल्या सत्तर वर्षांपासून हा सोहळा पार पडत आला आहे, पण या वेळचा स्वातंत्र्य दिन वेगळा आहे. पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतील त्याच वेळी गृहमंत्री अमित शहा श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवतील असे चित्र आहे. या स्वातंत्र्य दिनाचे वैशिष्टय़ असे की, या वेळी कश्मीरचे 370 कलमाचे ओझे फेपून देऊन देश एका स्वाभिमानाने उभा राहिला आहे. त्यामुळे हा स्वातंत्र्य दिन 1947 च्या स्वातंत्र्य दिवसाइतकाच तेजस्वी आहे. संपूर्ण देशात आनंद आहे. उत्साह आहे. आता जम्मू-कश्मीर हा अधिपृतपणे हिंदुस्थानचा भाग बनला. जम्मू-कश्मीरात आता दोन झेंडे फडकणार नाहीत तर अखंड हिंदुस्थानचा एकच तिरंगा फडकेल. स्वातंत्र्य दिनी लाल चौकात तिरंगा फडकविण्याची तयारी झाली आहे व गृहमंत्री अमित शहा लाल चौकात तिरंगा फडकवून कश्मीरसाठी हौतात्म्य पत्करणाऱया हजारो हुतात्म्यांना मानवंदना देणार आहेत. 370 कलम हटवून केंद्र सरकारने धाडसी पाऊल उचलले याचा हिंदुस्थानात आनंदी आनंद असला तरी बाजूच्या पाकिस्तानात ‘मातम’ सुरू आहे. अर्थात हिंदुस्थानातही काही लोकांची ऊर बडवेगिरी सुरू असली तरी सर्वोच्च न्यायालयानेही या ऊर बडव्या मंडळींचे थोबाड पह्डले आहे. 370 विरोधात दाखल केलेली याचिका इतक्या

तातडीने ऐकण्याची

गरज नाही, असे ठणकावल्याने ‘370’च्या वकिलांची पंचाईत झाली. कश्मीरची स्थिती सुरळीत व्हायला वेळ द्यायला हवा असे न्यायालय म्हणत असेल तर ते चुकीचे नाही. देशाच्या स्वातंत्र्य दिनास या वेळी एक वेगळे तेज निर्माण झाले आहे व सर्व दुःखे बाजूला ठेवून जनता स्वातंत्र्य दिनाच्या सोहळय़ात सहभागी होईल. जे मागच्या सत्तर वर्षांत घडले नाही ते गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी फक्त चार महिन्यांत घडवून आणले. देश नव्याने उभा राहात आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय, याचा अनुभव कश्मिरी जनतेने आता घ्यावा. त्यांना ‘आझादी’ पाहिजे म्हणजे नेमके काय पाहिजे? कलम 370 हटवल्यानंतर त्यांना आझादी म्हणजे स्वातंत्र्य काय असते त्याचा अनुभव घेता येईल. प्रश्न फक्त कश्मीरचा नाही; तर देशाचे स्वातंत्र्य, स्वातंत्र्याची तटबंदी मजबूत करण्याचा आहे. ती तटबंदी मजबूत होताना दिसू लागली आहे. तिहेरी तलाक पद्धतीचा खात्मा करून सरकारने लाखो मुस्लिम महिलांना स्वातंत्र्य मिळवून दिले. हे सत्तर वर्षांत घडले नव्हते. हिंदू आणि मुसलमान अशी फाळणी स्वतंत्र हिंदुस्थानातच करण्यात आली. हे फक्त मतांचे राजकारण होते. स्वतंत्र हिंदुस्थानात हिंदूंना पुणी वालीच नव्हता. बहुसंख्य हिंदूंना कस्पटासमान लेखणाऱया राजकारणाचाही आता अंत होऊ लागला व

स्वतंत्र हिंदुस्थानात प्रथमच

बहुसंख्य हिंदूंनाही हे स्वातंत्र्य आपले वाटू लागले. आजच्या स्वातंत्र्य दिनाचे हेसुद्धा महत्त्व आहे. एकसंध भारत, अखंड हिंदुस्थान हे आपले स्वप्न होते. त्या स्वप्नास इतके तडे गेले की ‘हा महाभारत’ कोलमडून पडतोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र केंद्रीय मंत्र्यांनीच आता जाहीरपणे सांगितले आहे की, पुढचे लक्ष्य पाकच्या ताब्यातील कश्मीर स्वतंत्र करणे हे आहे. आम्हाला युद्ध नको आहे, रक्तपात, हिंसाचारही नको, पण आम्ही अहिंसेचे भक्त नाही. रक्ताचे पाट वाहून व रणात उतरूनच हे स्वातंत्र्य आम्हाला मिळाले. ते टिकविण्यासाठीही गेल्या सत्तर वर्षांतदेखील रक्तच द्यावे लागले. कश्मीरातून हिंदू पंडितांना सर्वस्व गमावून बाहेर पडावे लागले. हासुद्धा त्यागच म्हणावा लागेल. या लाखो पंडितांना कश्मीरात परतण्याचे स्वातंत्र्यही आता मिळू शकेल. कलम 370 पासून सुरुवात झाली. तिहेरी तलाक हा थांबा आहे. समान नागरी कायदा आणि पाकव्याप्त कश्मीरवर तिरंगा फडकणे हे अंतिम ध्येय आहे. आज लाल किल्ल्याबरोबर श्रीनगरच्या लाल चौकातही तिरंगा फडकत आहे! आमचे स्वातंत्र्य चिरायू आहे! स्वातंत्र्याच्या डोक्यावरचे ओझे उतरले आहे!

आपली प्रतिक्रिया द्या