
नेतान्याहूंविरोधात इस्रायलची जनता रस्त्यावर उतरली आहे. त्यांनाही नेतान्याहूंची मनमानी नको आहे, तर अमेरिकेत एक प्रकारे जनतेने बंडच पुकारले आहे. रस्त्यावर उतरलेले आंदोलक घोषणा देत आहेत. ‘इराणमध्ये रेजिम चेंज नाही, तर अमेरिकेत रेजिम चेंज हवा!’ प्रे. ट्रम्प यांची दुसरी टर्म मध्यावरच अडचणीत आली आहे. अमेरिकेच्या रस्त्यावर लोकशाहीचा आवाज अधिक जोरात उसळला आहे. तेथील ‘नो किंग्ज’ आंदोलन सांगते, प्रे. ट्रम्प यांच्यासारखा भुरटा ‘अॅथॉरिटेरियन’ म्हणजे मनमानी, झुंडशाहीवाला राजा सत्तेवर असला तरी लोक रस्त्यावर उतरतात. अमेरिकेची लोकशाही रुळावर आहे व जनता भंपक राष्ट्रवादाच्या अमलाखाली नाही. भारतासाठी हा आरसा आहे.
अमेरिकेत साधारण एक कोटीच्या आसपास लोक रस्त्यावर उतरले आहेत. प्रे. ट्रम्प यांनी जी झुंडगिरी, हेकेखोरपणा चालवला आहे, ज्या पद्धतीने अमेरिकेचा ‘राजा’ असल्याच्या थाटात ते वागत आहेत, त्या राजेशाहीविरुद्ध तेथील जनतेने जणू बंड पुकारले आहे. इराणविरुद्ध ट्रम्प यांनी उगाच युद्ध पुकारले. लोकांच्या संतापाचा तोदेखील एक मुद्दा आहे. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसी, टेक्साससह 50 राज्यांत ट्रम्प यांच्या विरोधात लोकांनी रस्त्यावर उतरणे हे अमेरिकेतील सशक्त लोकशाहीचे लक्षण मानायला हवे. भारतात मोदींच्या भंपक धोरणांना, पांचट भूमिकांना विरोध करणे म्हणजे देशद्रोहाचा अपराध ठरवला जातो. असा विचार करणाऱ्यांनी अमेरिकेतील जनतेकडून व राज्यव्यवस्थेकडून धडे घ्यायला हवेत. अमेरिकेची जनता लोकशाही आणि नागरी अधिकारांच्या बाबत कमालीची जागरूक आहे व त्या अधिकारांसाठी ती प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचे साहस दाखवते. भारतात यावेळी ‘धुरंधर-2’ या प्रचारकी चित्रपटासाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत व मोदी हेच कसे धुरंधर आहेत, असा प्रचार सुरू आहे. तिकडे मोदींचे मालक व जागतिक धुरंधर प्रे. ट्रम्प यांची कढी तेथील जनतेने पातळ केली आहे. ट्रम्प विरोधाचे हे लोण युरोपातील काही देशांतही पसरताना दिसत आहे. अमेरिकेतील जनतेच्या संतापाचा स्पह्ट झाला आहे त्यास युद्ध हे एक कारण आहेच, पण ट्रम्प महाशयांनी जी ‘अॅथॉरिटेरियन’ शासनशैली लादली आहे, त्याबाबत हा स्फोट आहे. कठोर इमिग्रेशन धोरण ट्रम्प यांनी राष्ट्रवाद वगैरेच्या नावाखाली आणले. अमेरिका अधिक वैभवशाली घडवू किंवा मूळ अमेरिकन लोकांसाठी ‘अच्छे दिन’ आणू या त्यांच्या
घोषणा त्यांच्यावरच उलटल्या
आहेत. ट्रम्प यांच्या ‘मास डिपोर्टेशन’ मोहिमेत लाखो लोक भरडले जात आहेत. असंख्य भारतीयांना तर दहशतवाद्यांप्रमाणे हातापायांत बेड्या अडकवून भारतात पाठवण्यात आले व त्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी साधा निषेध केला नाही. लॅटिन अमेरिकन तसेच आशियाई लोकांना फरफटत देशाबाहेर काढले जात आहे. या मोहिमेतले अत्यंत निर्घृण चित्र जगाने पाहिले आहे. मानवी मूल्य व मानवी अधिकारांचे उल्लंघन या मोहिमेत झाले. अनेक कुटुंबांची या मोहिमेत ताटातूट झाली. पोलीस कधीही कोठेही धाडी घालतात व घुसखोर ठरवून लोकांना तुरुंगात टाकतात याचाही संताप अमेरिकेच्या लोकांत आहे. ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यापासून त्यांनी ताळतंत्रच सोडले आहे व ते बेफामपणे वागू लागले आहेत. भारतात ज्याप्रमाणे केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय दुरुपयोग सुरू आहे त्याच पद्धतीने विरोधकांवर दबाव आणण्यासाठी तेथील फेडरल एजन्सींचा गैरवापर सुरू आहे. मीडिया मालकांना धमकावले जात आहे. त्यातून प्रसिद्धी यंत्रणा मुठीत आणल्या आहेत. अनेक राज्यांत ‘शूटिंग्ज’च्या घटना वाढल्या. मिनेसोटामध्ये पोलिसांनी दोन अमेरिकन नागरिकांनाच गोळ्या घातल्याची घटनाही लोकांच्या संतापास कारणीभूत ठरली. त्यात ट्रम्प यांनी राष्ट्रवाद म्हणजे अमेरिकेला सुरक्षित करण्याच्या नावाखाली इराणबरोबर युद्ध पुकारले ते अमेरिकेच्या अंगलट येताना दिसत आहे. एफ-16 सारखी अमेरिकेची विमाने पाडली गेली. आता एक लाख अमेरिकन सैन्य इराणच्या भूमीवर उतरवण्याची तयारी ट्रम्प करीत आहेत. त्यामुळे
अमेरिकन सैनिकांच्या
शवपेट्यांची रांग अमेरिकेत लागेल हे भयंकर चित्र तेथील जनतेला भेडसावू लागले आहे. इस्रायल-अमेरिकेची हातमिळवणी जगाला नुकसानकारक ठरत आहे. सुप्रीम लीडरला मारल्यावर इराणची जनता आनंदाने रस्त्यावर उतरेल व सत्ता परिवर्तन घडेल हा ट्रम्प-नेतान्याहूंचा भ्रम होता. तसे घडले नाही व एक महिना उलटून गेला तरी इराण अत्यंत चिवटपणे झुंज देत आहे. इराणची जनता रस्त्यावर उतरली ती अमेरिकेच्या विरोधात शेवटच्या श्वासापर्यंत लढण्यासाठी. उलट अमेरिकेची जनताच लाखोंच्या संख्येने प्रे. ट्रम्प यांना जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरली. युद्धाने अमेरिकेत महागाई वाढली. असंख्य सैनिकांचे प्राण गेले. अमेरिकेचे डोके फिरल्याची भावना जगभरात निर्माण झाली. इराणला चीन, रशिया, उत्तर कोरिया, ओमान, लेबेनॉनसारखी राष्ट्रे व तेथील लढाऊ संघटना मदत करीत असल्याने इस्रायलसुद्धा मेटाकुटीस आलाय. नेतान्याहूंविरोधात इस्रायलची जनता रस्त्यावर उतरली आहे. त्यांनाही नेतान्याहूंची मनमानी नको आहे, तर अमेरिकेत एक प्रकारे जनतेने बंडच पुकारले आहे. रस्त्यावर उतरलेले आंदोलक घोषणा देत आहेत. ‘इराणमध्ये रेजिम चेंज नाही, तर अमेरिकेत रेजिम चेंज हवा!’ प्रे. ट्रम्प यांची दुसरी टर्म मध्यावरच अडचणीत आली आहे. अमेरिकेच्या रस्त्यावर लोकशाहीचा आवाज अधिक जोरात उसळला आहे. तेथील ‘नो किंग्ज’ आंदोलन सांगते, प्रे. ट्रम्प यांच्यासारखा भुरटा ‘अॅथॉरिटेरियन’ म्हणजे मनमानी, झुंडशाहीवाला राजा सत्तेवर असला तरी लोक रस्त्यावर उतरतात. अमेरिकेची लोकशाही रुळावर आहे व जनता भंपक राष्ट्रवादाच्या अमलाखाली नाही. भारतासाठी हा आरसा आहे.

































































