सामना अग्रलेख – एकदाच घुसा ना!

पुढच्या दहा-बारा दिवसांत ‘एलओसी’च्या बऱ्याच भागात बर्फवृष्टी सुरू होईल. घुसखोरीचे मार्ग बंद होतील. त्याआधीच हिंदुस्थानात  अतिरेकी घुसवण्याचा पाकिस्तानी कट आहे. नियंत्रण रेषेवरून गोळीबार, तोफांचा मारा करण्यामागे ते कारण आहे. हिंदुस्थानी लष्कराने त्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत. महाराष्ट्र, हरयाणा विधानसभा निवडणुकांना सामोरे जात असताना पाकव्याप्त कश्मीरात घुसून मारल्याच्या बातम्या झळकल्या. हिंदुस्थानी लष्कराचे करावे तेवढे अभिनंदन थोडेच. फक्त पुनः पुन्हा घुसण्यापेक्षा एकदाच काय ते घुसा! हीच देशवासीयांची इच्छा!

महाराष्ट्र आणि हरयाणातील मतदानाच्या आधी हिंदुस्थानी लष्कराने मोठी कारवाई केली. गेले काही दिवस सीमेवर होणाऱ्या घडामोडी पाहता ही कारवाई अपेक्षित होती. लष्कराने रविवारी पाकव्याप्त कश्मीरमधील नीलम खोऱ्यात तोफांचा मारा केला. तेथील दहशतवादी तळ, पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाईत पाच-दहा पाकिस्तानी सैनिक व काही दहशतवादी ठार झाल्याची माहिती स्वतः लष्करप्रमुख जनरल रावत यांनी दिली आहे. याचा अर्थ असा की, लोकसभेच्या निवडणुकीआधी जो सर्जिकल स्ट्राइक झाला व त्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये पाकचे कंबरडे साफ मोडले असे जे वाटत होते, तसे काही झाले नाही. कंबरडे मोडले आहे, पेकाटात लाथ बसली आहे. तरीही पाकड्यांच्या कुरापती सुरूच आहेत. ‘कलम 370’ रद्द केल्यापासून हिंदुस्थानात अशांतता निर्माण व्हावी व त्यासाठी दहशतवाद्यांना मुंबई-दिल्लीत घुसवावे हे पाकिस्तानचे मनसुबे आहेत. हिंदुस्थानात एखादी महत्त्वाची निवडणूक आली की, पाकड्यांच्या या कुरापती वाढतात. लोकसभेआधी पाकड्यांनी ‘पुलवामा’ घडवून हिंदुस्थानला आव्हान दिले. ते आव्हान आमच्या लष्कराने स्वीकारले. आता महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेच्या निवडणुकांच्या आदल्या दिवशी पाकडे आमच्या हद्दीत घुसू लागले. ती घुसखोरी आम्ही मोडून काढली. पाकिस्तानच्या कुरापतीवर आमचे लष्कर मूंहतोड जवाब देत आहे, पण या सवाल-जवाबात आमचे

जवान शहीद

होत आहेत. कालच्या पाकी हल्ल्यात आमचे दोन जवान शहीद झाले. एका नागरिकाचाही पाकड्यांच्या गोळीबारात मृत्यू झाला. गेल्या तीन महिन्यांत कश्मीर खोऱ्यात नक्की किती जवान शहीद झाले याबाबत सत्य कळणे गरजेचे आहे व इतकी कठोर कारवाई करूनही आमचे जवान प्राण गमावत आहेत, हे कसले लक्षण आहे? हिंदुस्थानच्या हवाई दलाने 26 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानच्या खैबर प्रांतातील बालाकोट येथे लढाऊ विमानांद्वारे हवाई हल्ला केला. त्यात दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. तीनशेपेक्षा जास्त दहशतवादी त्यात ठार झाले. म्हणजे एक मोठी फौज मारली गेली. तरीही पुढच्या तीन महिन्यांत पाचशेपेक्षा जास्त दहशतवादी निर्माण होतात. हिंदुस्थानात घुसण्याची योजना आखतात. सीमेपलीकडून पुनः पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून आमच्या भागातील नागरी वस्त्यांवर गोळीबार होतो. तोफांचा मारा केला जातो. कश्मीर खोऱ्यात बॉम्बस्फोट घडवून वातावरण तंग केले जाते. याचाच अर्थ पाकड्यांचे वाकडे शेपूट वळवळतच आहे. पाकिस्तानने अद्याप गुडघे टेकलेले नाहीत. तेव्हा पुढच्या एखाद्या निवडणुकीची वाट न पाहता हे गुडघे फोडून त्यांना गर्भगळित केले पाहिजे. आमचे लष्कर सज्ज आहेच. त्यासाठी वेगळे आदेश देण्याची गरज नाही. ‘370 कलम’ हटवणे हे ऐतिहासिक कार्य केंद्रातील मोदी-शहांच्या सरकारने केले आहे. पाकिस्तानला हा

मोठा धक्का

आहे. कश्मीरातील सर्व निर्बंध हटवले आहेत व तेथील इंटरनेट सेवा, फोन सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या पोटात दुखणे व त्या वैफल्यातून असे हल्ले होणे स्वाभाविक आहे. जम्मू-कश्मीरमधून ‘370 कलम’ हटवले व त्यानंतरही कश्मीर खोरे तसे शांत राहिले. पाकिस्तानच्या मनात होता तसा येथे फार मोठा उद्रेक वगैरे झाला नाही. हुरियत, इसिस वगैरे भयंकर संघटनांचे लोक खोऱ्यात असले तरी आमच्या लष्कराने त्यांना बंदुका छाताडावर रोखून बिळात कोंडून ठेवले या धक्क्यातून पाकडे सावरलेले दिसत नाहीत. त्याच वैफल्यातून पाकड्यांनी ‘पाकव्याप्त’ कश्मीरात पन्नासच्या आसपास ‘लाँचिंग पॅड’वर पाचशेपेक्षा जास्त अतिरेकी गोळा करून ठेवले. पुढच्या दहा-बारा दिवसांत ‘एलओसी’च्या बऱ्याच भागात बर्फवृष्टी सुरू होईल. घुसखोरीचे मार्ग बंद होतील. त्यामुळे बर्फ जमण्याआधीच हिंदुस्थानात जास्तीत जास्त अतिरेकी घुसवण्याचा पाकिस्तानी कट आहे. नियंत्रण रेषेवरून गोळीबार, तोफांचा मारा करण्यामागे ते एक कारण आहे. हिंदुस्थानी लष्कराने त्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत. महाराष्ट्र, हरयाणा विधानसभा निवडणुकांना सामोरे जात असताना पाकव्याप्त कश्मीरात घुसून मारल्याच्या बातम्या झळकल्या. हिंदुस्थानी लष्कराचे करावे तेवढे अभिनंदन थोडेच. फक्त पुनः पुन्हा घुसण्यापेक्षा एकदाच काय ते घुसा! हीच देशवासीयांची इच्छा!

आपली प्रतिक्रिया द्या