सामना अग्रलेख – आसाम-मेघालय हिंसाचार, ईशान्येतील ‘ज्वालामुखी’

ईशान्य हिंदुस्थान आधीच वेगवेगळय़ा कारणांमुळे अशांत आहे. त्यात तेथील सीमावादांचे ज्वालामुखीधगधगत राहिले तर ते देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिकच घातक ठरेल. ईशान्येचा विकास आपल्याच राजवटीत झाला, तेथील शांततेसाठी जेवढे प्रयत्न मागील सातआठ वर्षांत झाले तेवढे पूर्वी झाले नाहीत, असा दावा केंद्रातील विद्यमान सरकार नेहमीच करीत असते. आसाम आणि मेघालय सीमेवर मंगळवारी झालेल्या हिंसाचाराने या फुग्याला टाचणी लावली आहे.

आसाम आणि मेघालय या दोन राज्यांत पुन्हा एकदा सीमावादाची ठिणगी पडली आहे. आसाममधील पश्चिम काब्री अंगलोंग जिल्हय़ात मंगळवारी रात्री लाकडाची वाहतूक करणारा ट्रक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अडविण्याचे निमित्त या हिंसाचाराला पुरेसे ठरले. आसाम आणि मेघालय या दोन राज्यांच्या सीमा भागात अशा प्रकारचा रक्तरंजित हिंसाचार जुनाच आहे. मंगळवारी मध्यरात्री अवैधरीत्या लाकूड वाहतूक करणारा एक ट्रक आसाम वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. तो न थांबता पुढे गेला. त्यामुळे वनरक्षकांनी ट्रकच्या चाकांवर गोळीबार केला. आसाम वनविभागाने जास्तीचा पोलीस बंदोबस्त मागविला. त्यांच्यात आणि निदर्शकांमध्ये वाद वाढत गेला. त्यातूनच गोळीबार झाला आणि सहा जणांचा हकनाक बळी गेला. ‘परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार करण्याशिवाय पर्याय नव्हता,’ असे आसाम पोलिसांचे म्हणणे आहे. तर ‘हा गोळीबार अनावश्यक होता,’ असा आरोप मेघालयाचे मुख्यमंत्री कोर्नाड संगमा यांनी केला आहे. हे आरोप-प्रत्यारोप पुढेही सुरूच राहतील. हा रक्तरंजित सीमावाद थांबणार कधी हा खरा प्रश्न आहे. आसाम आणि मेघालय यांच्यातील सीमावाद देशातील इतर सीमावादांप्रमाणेच जुना आहे. 1972 मध्ये आसामचे विभाजन करीत मेघालय हे

स्वतंत्र राज्य

निर्माण करण्यात आले. त्यांच्या सीमेवरील 12 ठिकाणे वादग्रस्त होती. त्यावरून दोन्ही राज्यांत संघर्ष सुरू आहे. यंदा मार्च महिन्यात केंद्र सरकारच्या पुढाकाराने दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यामुळे बारापैकी सहा वादग्रस्त ठिकाणांचा तिढा सुटला होता आणि उर्वरित जागांवरील वाद संपविण्यासाठी दोन्ही राज्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्यांचे गुऱहाळ सुरू आहे. त्यातील एक बैठक नजीकच्या भविष्यात होणार होती. मात्र त्याच्या तोंडावरच हिंसाचार, सहा बळी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी असे सगळे घडल्याने पुढील बैठकीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. राज्याराज्यांमधील सीमावाद, त्यातून उफाळून येणारा हिंसाचार, सीमाप्रश्नांचा राजकीय फायद्यासाठी होणारा गैरवापर हे आपल्या देशात वर्षानुवर्षांचे त्रांगडे झाले आहे. वास्तविक हे सगळे सीमावाद संपवून राज्याराज्यांत शांतता आणि मैत्रिभाव निर्माण करणे हे केंद्रातील राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. मात्र हे कर्तव्य निभाविण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरूनही सध्या वातावरण पेटलेलेच आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आगलावेपणा आणि महाराष्ट्रातील मिंधे सरकारची बोटचेपी भूमिका यामुळे मराठी सीमाबांधव आणि महाराष्ट्रातील मराठीप्रेमी जनतेत

तीव्र संतापाची भावना

आहे. हेच तिकडे आसाम आणि मेघालयासह संपूर्ण ईशान्य हिंदुस्थानातही घडत आहे. मागील काही वर्षांतील आसाम राज्याचे आक्रमक धोरण ईशान्येतील सीमावादासंदर्भात वादग्रस्त ठरले आहे. त्यामुळे त्या राज्यांत सीमावादाचे हिंसक उद्रेक वाढल्याचे आरोप होत आहेत. गेल्या वर्षी आसाम-मिझोराम सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांमध्ये चकमक झाली होती. त्यात आसाम पोलिसांचे सहा जवान ठार झाले होते. आता आसाम-मेघालय सीमावादाचा हिंसक उद्रेक झाला आणि आसामच्या एका वन कर्मचाऱ्यासह सहा नागरिकांचा बळी गेला. आसाम आणि मेघालय यांच्यातील 12 पैकी 6 वादग्रस्त मुद्दय़ांवर परस्पर समझोता होऊनही आणि उर्वरित मुद्दय़ांबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू असूनही मंगळवारचा रक्तरंजित हिंसाचार कसा घडला? तो घडला की घडवला गेला? गोळीबार आवश्यक होता की अनावश्यक? ईशान्य हिंदुस्थान आधीच वेगवेगळय़ा कारणांमुळे अशांत आहे. त्यात तेथील सीमावादांचे ‘ज्वालामुखी’ धगधगत राहिले तर ते देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिकच घातक ठरेल. ईशान्येचा विकास आपल्याच राजवटीत झाला, तेथील शांततेसाठी जेवढे प्रयत्न मागील सात-आठ वर्षांत झाले तेवढे पूर्वी झाले नाहीत, असा दावा केंद्रातील विद्यमान सरकार नेहमीच करीत असते. आसाम आणि मेघालय सीमेवर मंगळवारी झालेल्या हिंसाचाराने या फुग्याला टाचणी लावली आहे.