सामना अग्रलेख – नवे टेरर मॉड्युल!

देशावरील संकट समयी मोदी केवळ वल्गनाच करतात एरवी फक्त निवडणूक प्रचार सभांत बोलतात. आताही लाल किल्ला बॉम्बस्फोटावर मोदी यांनी तेच केले. पुन्हा या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाची सूत्रे देशाचे अपयशी गृहमंत्री हाताळत आहेत. त्यांच्याच काळात गृहखात्याची यंत्रणा राजकारणग्रस्त झाली आहे. त्यामुळेच देशात दहशतवादी हल्ले होतच आहेत. तरीही मोदी म्हणतात, ‘‘सोडणार नाही.’’ साहेब, दिल्लीत दहशतवादाचे नवेव्हाईट कॉलरटेरर मॉड्युल निर्माण झाले. ते गाव जाळून निघून गेले, त्यांच्या आत्मघातकी पथकाने दिल्लीत हाहाकार माजवला आणि तुम्ही मात्र अजूनही ‘‘सोडणार नाही’’वरच अडकून पडलाय. मुळात देशाला सगळ्यात मोठा धोका आहे तो धर्मांध आणि सुस्तावलेल्याभाजपमॉड्युलपासून!

जेव्हा देशावर दहशतवादी हल्ले होतात, त्या त्या वेळी पंतप्रधान मोदी हे अज्ञात ठिकाणी किंवा दूरदेशी असतात. पुलवामा हल्ल्याच्या वेळी पंतप्रधान जिम कार्बेटच्या जंगलात सफारी आणि शूटिंगची मौज घेत होते, तर काल दिल्लीत हल्ला झाला तेव्हा मोदी हे भूतान देशी होते. भूतानच्या चांगली मेथांग उत्सव मैदानातून त्यांनी इशारा दिला की, ‘‘दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना सोडणार नाही.’’ मुळात ‘‘सोडणार नाही’’ ही अत्यंत बुळबुळीत भाषा आहे. त्यामुळे असे शाब्दिक बाण सोडून काय होणार? दहशतवाद्यांनी तिकडे कारस्थान रचले व ते अमलात आणले. त्या हल्ल्यात लोक मारले गेले आणि तेथे रक्ताचे सडे पडल्यावर तुम्ही इशारे देताय की, ‘‘त्यांना सोडणार नाही.’’ दिल्लीतील बॉम्बस्फोटाचा संबंध कश्मीर प्रश्नाशी जोडला जातोय. प्रश्न इतकाच आहे की, देशाच्या गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे की नाही? गृहमंत्र्यांनी संसदेत दोन विधाने छातीठोकपणे केली होती व नंतर त्यावर मतेही मागितली. श्री. शहा म्हणाले होते की, ‘‘कश्मीरातून 370 कलम हटवण्याची हिंमत आमच्या सरकारने दाखवली. आधीचे सरकार बोटचेपे होते. आम्ही 370 कलम हटवून कश्मीरचा प्रश्न सोडवला आहे. आता कश्मीरातून दहशतवादाचे समूळ उच्चाटन होईल.’’ प्रत्यक्षात उलटेच घडताना दिसत आहे. तेच नोटाबंदीचेही झाले. पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदी अचानक जाहीर केली तेव्हा मोदींनी नोटाबंदी ही राष्ट्रीय सुरक्षेसाठी असल्याचे सांगितले होते. शिवाय नोटाबंदीमुळे कश्मीरातील दहशतवादाचे कंबरडे मोडून पडेल, दहशतवाद्यांचा आर्थिक पुरवठा बंद पडेल, अशाही वल्गना केल्या होत्या, पण त्या सर्व हवेतल्या बाताच निघाल्या. कश्मीरातला दहशतवाद तर संपलेला नाहीच. उलट दहशतवादाचे नवे स्लीपर्स सेल आणि मॉड्यूल भारतात निर्माण झाले आहेत आणि त्यांचा शोध घेण्यात

गृह मंत्रालय कमजोर

पडले आहे. दहशतवादाचे नवे ‘मॉड्यूल’ किंवा ‘स्लीपर्स सेल’ आम्ही म्हणतो. कारण दिल्ली बॉम्बस्फोटानंतर ज्यांना अटका झाल्या, त्यात सुशिक्षित तरुण-तरुणी, डॉक्टर आहेत. मुख्य संशयित डॉ. उमर नबी हा उच्चशिक्षित आहे. संपूर्ण देशात हे ‘टेरर मॉड्युल’ पसरले आहे व त्यांच्याकडे शस्त्रे, स्फोटके पोहोचली असतील तर देशाचे गृह मंत्रालय दिल्लीत बसून काय करत आहे? वास्तव हे आहे की, ते देशाच्या सुरक्षेऐवजी विरोधकांच्या विरोधातील कारस्थानांत दंग आहे. भारतीय जनता पक्षाच्या काळात सर्वाधिक दहशतवादी हल्ले झाले. या प्रत्येक हल्ल्याची जबाबदारी आधीच्या सरकारांवर टाकून भाजपवाले मोकळे झाले. आज देशात सर्वाधिक सुरक्षा भाजप नेते, मंत्री, भाजप व संघाच्या मुख्यालयांना आहे. सरसंघचालक भागवत यांना तर शेकडो कमांडोजनी घेरून ठेवले आहे. दिल्लीतदेखील जागोजागी सुरक्षेचे पिंजरे उभे करण्यात आले आहेत. अशा वेळी सामान्यांच्या सुरक्षेकडे कोणी पाहायचे? संसदेवर हल्ला झाला तेव्हाही केंद्रात भाजपचेच सरकार होते व आज लाल किल्ल्यावर हल्ला झाला तेव्हाही सत्तेत भाजपच आहे. राष्ट्रीय सुरक्षेबाबत भाजप नेहमी बेफिकीर राहिला. भाजपच्या काळात पहलगाम, पुलवामा, उरी, पठाणकोट, अक्षरधाम, अमरनाथसारखे भयंकर हल्ले झाले. त्यातील बहुतेक हल्ले आमच्या सैन्य ठिकाणांवर झाले. हे भारताच्या गृह मंत्रालयाचे प्रचंड अपयश असताना गृहमंत्री शहा स्वतः सरदार पटेलांच्या तोऱ्यात वावरतात ते कशाच्या जोरावर? दिल्लीत सकाळी 2500 किलो स्फोटके सापडतात व संध्याकाळी लाल किल्ला परिसरात हल्ला होतो. या काळात तपास यंत्रणा काय करीत होत्या? भारतात असे दहशतवादी हल्ले सतत घडत राहावेत, त्यातून हिंदू-मुसलमानांत विभाजन होऊन त्याचा लाभ एकगठ्ठा हिंदू मतदान आपल्याला मिळण्यात व्हावा अशा प्रकारचे मनोरथ घेऊन देशातील एक मोठा वर्ग सध्या राजकारणात वावरत आहे. त्यांनी भारताची

सामाजिक आणि धार्मिक वीण

उसवली आहे. त्यामुळे देशात राष्ट्रीय प्रश्नांवर, अन्न, वस्त्र, निवाऱ्यावर कोठेच चर्चा होऊ दिली जात नाही. हिंदू-मुसलमान हाच राष्ट्रीय चर्चेचा विषय बनवण्याचे कारस्थान रचले व अमलात आणले जात आहे. भारतातील हा मोठा वर्ग आपल्या अस्तित्वासाठी गुदमरला आहे. त्यातून हे ‘धर्मयुद्ध’ छेडले जात असेल तर देशाला विभाजनाचा धोका मोठा आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चे राजकारण फार चालले नाही. उलट प्रे. ट्रम्प यांनी जेव्हा पाकिस्तानचा जनरल मुनीर याला ‘व्हाईट हाऊस’मध्ये भोजनाला आमंत्रित केले तेव्हाच पंतप्रधान मोदी यांनी उसळून उठायला हवे होते. ‘‘26 भारतीय महिलांचे कुंकू ज्याने पुसले, ज्याचे हात निरपराध भारतीयांच्या रक्ताने रंगले आहेत  त्याला ‘व्हाईट हाऊस’ भोजनाचे निमंत्रण देत असाल तर प्रे. ट्रम्प, तुम्हाला सोडणार नाही,’’ असा ‘आवाज’ आपल्या पंतप्रधानांनी द्यायला हवा होता, पण आजपर्यंत ते त्यावर एक शब्दही बोललेले नाहीत. जनरल मुनीरला असा सन्मान देणे म्हणजे भारतातील दहशतवाद्यांच्या पोशिंद्यांना पाठिंबा देण्यासारखेच आहे. प्रे. ट्रम्प यांनी ते केले व पंतप्रधान मोदी गप्प बसले. देशावरील संकट समयी मोदी केवळ वल्गनाच करतात व एरवी फक्त निवडणूक प्रचार सभांत बोलतात. आताही लाल किल्ला बॉम्बस्फोटावर मोदी यांनी तेच केले. पुन्हा या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाची सूत्रे देशाचे अपयशी गृहमंत्री हाताळत आहेत. त्यांच्याच काळात गृहखात्याची यंत्रणा राजकारणग्रस्त झाली आहे. त्यामुळेच देशात दहशतवादी हल्ले होतच आहेत. तरीही मोदी म्हणतात, ‘‘सोडणार नाही.’’ साहेब, दिल्लीत दहशतवादाचे नवे ‘व्हाईट कॉलर’ टेरर मॉड्युल निर्माण झाले. ते गाव जाळून निघून गेले, त्यांच्या आत्मघातकी पथकाने दिल्लीत हाहाकार माजवला आणि तुम्ही मात्र अजूनही ‘‘सोडणार नाही’’वरच अडकून पडलाय. मुळात देशाला सगळ्यात मोठा धोका आहे तो धर्मांध आणि सुस्तावलेल्या ‘भाजप’ मॉड्युलपासून!