सामना अग्रलेख – सह्याद्रीचा कडा! हिमालयाकडे कूच करा

फक्त सहा महिन्यांच्या काळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून नुसते लोकप्रिय ठरले नाहीत तर देशात अव्वल नंबर पटकावून पुढे आले. गंभीर विषयाचा, शत्रूचा अभ्यास करायचा व मगच घाव घालायचा या पक्क्या तयारीनेच ते मैदानात उतरतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले सर्व राजकीय विषाणू उडून धुळीतून वाहत गेले. उद्धव ठाकरे यांना कुटुंबाची महान परंपरा लाभली आहे. त्या परंपरेचा वारसा हा राजकीय तितकाच प्रबोधनाचा आहे, सामाजिक परिवर्तनाचा आहे. सह्याद्रीच्या टोकदार अभेद्य कडय़ाप्रमाणे त्यांचे नेतृत्व आज देशाचे शक्तिस्थान ठरले आहे. सह्याद्रीच्या कडय़ाने आता हिमालयाचे नेतृत्व करण्यासाठी पुढची चाल करावी. ‘साठी’ ही सुरुवात आहे, मोठ्या राजकारणाचा आरंभ आहे. महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे. आपणांस उदंड, निरोगी, शक्तिवान दीर्घायुष्य लाभो!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज साठाव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. वाढत्या वयाबरोबर शहाणपण येते असे म्हणतात. ते पूर्ण सत्य नाही. ते शहाणे होतेच. वय हे फक्त निमित्त ठरले. मुख्यमंत्री ठाकरे यांची एक प्रदीर्घ मुलाखत ‘सामना’त दोन भागांत प्रसिद्ध झाली. अत्यंत संयमाने आपली मते मांडूनही ही मुलाखत वादळी ठरली यातच उद्धव यांचा स्वभावविशेष दिसून येतो. आम्ही उद्धव ठाकरे यांना अनेक वर्षे ओळखतो. त्यांच्या स्वभावाचे, कार्यपद्धतीचे अनेक कंगोरे आम्हाला माहीत आहेत. मोठय़ा पदावर विराजमान झाला म्हणून फालतू बडेजाव मिरवणाऱ्यांपैकी हा माणूस नाही याची आता महाराष्ट्राला खात्री पटली असेल. संकटकाळात त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व स्वीकारले, पण त्यांचा स्वभाव संयमी वगैरे असला तरी ‘युद्धप्रसंगी’ खंबीर, राजकीय पराभवात बेदरकार, विजयात उदार आणि शांततेत स्नेहभाव असा साधारण खाक्या आहे. उद्धव ठाकरे यांनी राजकारणात तडफदार युवानेते म्हणून प्रवेश केला व आज ‘साठी’ होत असताना त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम सुरू केले. याचा अर्थ असा की, ठाकरे यांना राजकारणात प्रवेश केल्यावर सतत संघर्ष करावा लागला, चढ-उतार पाहावे लागले, अपमान आणि टीका सहन करावी लागली. ‘सामना’तील मुलाखतीत उद्धव ठाकरे म्हणतात ते खरेच आहे. ते सांगतात, ‘‘मला वाटतं, जगात माझंच असं एकमेव उदाहरण असेल की, ज्याची कुवत सगळ्यात कमी लेखली गेली, तोच पक्षाचा सर्वोच्च नेता झाला आणि याची कुवत नाही, याला काही कळत नाही असं अनेक जण बोलायचे, पण तोच राज्याचा मुख्यमंत्री झाला!’’ उद्धव ठाकरे यांनी गेल्या सहा महिन्यांत राज्याची

धुरा उत्तम प्रकारे

सांभाळली आहे. जनतेला विचारात घेऊन ते राजशकट हाकीत आहेत. ‘कोविड-19’सारखे संकट साधे नाही. जग गिळायला निघालेले हे संकट. त्याच कोविडच्या जबड्यात हात घालून ते लढत आहेत, कठोरपणे निर्णय घेत आहेत. निर्णय एकदा घेतला की, माघार नाही हे त्यांचे धोरण. मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठरवले आहे, लोकांचे जीव महत्त्वाचे. आधी मनुष्यहानी टाळा, मग लॉकडाऊन वगैरे उठवायचे. फालतू लाड करणार नाही. सर्व राजकीय दबाव झुगारून ठाकरे यांनी मुंबईचा कोरोना नियंत्रणात आणला, धारावीतील संकटाची तीक्रता कमी केली. आता उर्वरित महाराष्ट्राच्या लढाईत त्यांनी लक्ष घातले. महाराष्ट्रात तीन पक्षांचे आघाडी सरकार सुरू आहे. सहा महिन्यांपूर्वी हे तीन पक्ष एकमेकांचे कडवट विरोधक होते. काँगेस, राष्ट्रवादी टोकाचे धर्मनिरपेक्ष तर शिवसेना ज्वलज्जहाल हिंदुत्ववादी, पण भारतीय जनता पक्षाच्या ‘फेकू’ व ‘खंजीर’छाप राजकारणास धडा शिकवायचा या हेतूने भिन्न विचारांचे तीन पक्ष एक झाले व राज्यात महाविकास आघाडीचा पाळणा हलवला. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचे सरकार पंधरा दिवसही चालणार नाही व उद्धव ठाकरे यांना सरकार चालवणे जमणार नाही, असे दावे ठोकणारे आता थंड पडले. कारण संकटांशी लढा देत सरकारने सहा महिन्यांचा टप्पा पूर्ण केला व अडथळे पार करीत ते पुढे चालले. याचे श्रेय ठाकरे नावाचे वलय व सर्वसमावेशक स्वभावाला द्यावे लागेल. ते एक कलावंत आहेत. जंगलातील हिंस्र प्राण्यांचे फोटो ते काढतात, पण त्या हिंस्र श्वापदांच्या जीवाची काळजी घेण्यासाठी जंगलात औषधे, ऍम्ब्युलन्स व इतर सुविधा मुख्यमंत्री नसताना पुरवत होते. जंगलातील वन खात्याच्या कर्मचाऱयांची त्यांनी काळजी घेतली. छायाचित्रणातून जमवलेले कोटय़वधी रुपये त्यांनी महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना वाटले. बाळासाहेब ठाकरे हे देणारे होते. ते सहस्र हातांनी महाराष्ट्राला देत राहिले. उद्धव ठाकरे आपल्या

महान पित्याचाच वारसा

पुढे चालवत आहेत. जे उद्धव यांच्या सहवासात येतात, परिचित होतात त्यांनाच उद्धव यांच्या मार्मिक, मिष्कील स्वभावाचे गमक कळेल. सुरुवातीला त्यांना भाषण करता येत नव्हते, पण त्यांचे ‘भाषण’ हे व्यासपीठावरील संवाद ठरला व लोकांनी तो संवाद स्वीकारला. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक निराळेच हृदयस्पर्शी आकर्षण निर्माण झालेले आहे आणि म्हणूनच त्यांच्याशी बोलण्यात, वाद करण्यात वा त्यांच्या सहवासात काही काळ घालवण्यात कोणालाही समाधान वाटल्यावाचून राहणार नाही. ‘कोविड-19’चे संकट हे साधे नाही. या संकटाचा आणि विषाणूचा खोलवर अभ्यास त्यांनी केला. तो इतका की, अनेक नामवंत डॉक्टरांचे ज्ञान त्यापुढे तोकडे पडले. ‘कोविड-19’ हा विषाणू मानवाचा शत्रू आहे. त्यामुळे शत्रूचे बारकावे काय याचा अभ्यास करून लढाईत उतरायचे हा त्यांचा स्वभाव असल्यानेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी जी ‘War Against Virus’ म्हणजे विषाणूविरुद्ध लढाई पुकारली, ती रोमांचक आहे. या युद्धाचे व ठाकरे यांच्या नेतृत्वकौशल्याचे जगाने कौतुक केले. फक्त सहा महिन्यांच्या काळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून नुसते लोकप्रिय ठरले नाहीत, तर देशात अव्वल नंबर पटकावून पुढे आले. गंभीर विषयाचा, शत्रूचा अभ्यास करायचा व मगच घाव घालायचा या पक्क्या तयारीनेच ते मैदानात उतरतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले सर्व राजकीय विषाणू उडून धुळीतून वाहत गेले. उद्धव ठाकरे यांना कुटुंबाची महान परंपरा लाभली आहे. त्या परंपरेचा वारसा हा राजकीय तितकाच प्रबोधनाचा आहे, सामाजिक परिवर्तनाचा आहे. सह्याद्रीच्या टोकदार अभेद्य कडय़ाप्रमाणे त्यांचे नेतृत्व आज देशाचे शक्तिस्थान ठरले आहे. सह्याद्रीच्या कड्याने आता हिमालयाचे नेतृत्व करण्यासाठी पुढची चाल करावी. ‘साठी’ ही सुरुवात आहे, मोठ्या राजकारणाचा आरंभ आहे. महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे. आपणांस उदंड, निरोगी, शक्तिवान दीर्घायुष्य लाभो!

आपली प्रतिक्रिया द्या