सामना अग्रलेख – पुन्हा लॉक डाऊन? लोक बेपर्वा का आहेत?

लग्न, सार्वजनिक कार्यक्रम, सभा-संमेलने या ठिकाणच्या गर्दीवर नियंत्रण हवेच, मास्कची सक्ती तर असायलाच हवी. नियम मोडणाऱयांना कठोर शासन होणे गरजेचे आहे. शिवजयंतीच्या निमित्तानेसुद्धा राजकारण झालेच. छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा कोरोनाचे संकट पाहता रयतेच्या रक्षणासाठी कठोर निर्बंध लावलेच असते हे विरोधकांनी समजून घेतले पाहिजे. राजकीय मेळावे, लग्न समारंभ तसेच बहुतेक सर्वत्र लोक मास्क लावत नाहीत की सुरक्षित अंतर ठेवताना दिसत नाहीत. लोक बेपर्वा का आहेत? परिस्थिती अशीच राहिली तर कोरोनाची लाट नव्हे, तर लाटा येतील असा इशारा कोरोनासंदर्भातील राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी दिला आहे. निदान डॉक्टरांचे तरी ऐका!

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉक डाऊनच्या दिशेने आपण निघालो आहोत काय? अशी भीती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार स्पष्ट केले आहे, पुन्हा लॉक डाऊन नको असेल तर नियमांचे काटेकोर पालन करा! पण लोक बेपर्वा होऊन गर्दी करीत आहेत, मास्क न लावता वावरत आहेत, उत्सव साजरे करीत आहेत. मुंबईच्या जुहू चौपाटीवर 14 तारखेस तरुणाई ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यासाठी अशी उसळली की, मास्क न लावता, शारीरिक अंतराचे भान न राखता गर्दीने उच्चांक मोडला. त्या प्रेमी जिवांच्या चेंगराचेंगरीत कोरोना विषाणूही जणू स्वर्गवासी झाले. हे असे ठिकठिकाणी सुरूच आहे. या सगळय़ा पायमल्लीमुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गर्दीत विदर्भयात्रा सुरू केली. सांगलीतही मिरवणूक निघाली. आता जयंतराव कोरोनाग्रस्त होऊन तळमळत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या प्रेमातही कोरोना पडला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन, अक्षय कुमारविरोधात ‘शूटिंग रोको’ आंदोलन करण्याची घोषणा करताच कोरोनाने त्यांच्या कार्यालयात प्रवेश केला व नाना यांना विलगीकरणात जावे लागले. एकनाथ खडसे यांना सलग तिसऱयांदा कोरोना झाला आहे. हे जरा विचित्रच आहे. गृहमंत्री अनिल देशमुख हे आता कोरोनाच्या मिठीतून सुटत आहेत. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, प्रशासन अशा प्रकारे कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी वारंवार

जे धोक्याचे इशारे दिले

ते खरे ठरले आहेत. ‘हे उघडा आणि ते उघडा, नाहीतर आंदोलने करू,’ अशा धमक्या विरोधक देत राहिले, कोरोना नियमांचेही राजकारण केले गेले. त्याचा फटका जनतेला व राज्याला बसत आहे. मध्यंतरी कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत होती. मात्र त्यामुळे नागरिकांना कोरोनाचा विसर पडला. नागरिकांचा बेजबाबदारपणा पुन्हा सुरू झाला. त्या बेजबाबदारपणास विरोधकांनी इतके खतपाणी घातले की, सरकारलाच जणू खलनायक केले. आता जो कोरोना वाढत आहे, त्याची जबाबदारी राज्यातील विरोधक घेणार आहेत काय? अमरावती, यवतमाळ, अकोल्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे तेथे सध्या तरी जमावबंदी लागू केली, पण काही जिल्हय़ांत पुन्हा लॉक डाऊन करावे लागेल असे वातावरण आहे. सरकारने एकदा निर्णय घेतला की, त्याबाबत सारासार विचार न करता विरोधकांनी फक्त थयथयाट करायचा, हे लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बरे नाही. देवळे उघडली, लोकल ट्रेन्स सुरू झाल्या, बाजार उघडले; पण लोक नियमांचे पालन करायला तयार नाहीत, हे कसे चालेल? सार्वजनिक ठिकाणी परस्परांतील अंतर राखणे, तोंडाला मास्क लावणे ही बंधने पाळली गेलीच पाहिजेत. मात्र अनेकदा ती एका बेफिकिरीने झुगारून देताना लोक दिसतात. दोनच दिवसांपूर्वी ‘सैराट’मुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरू हिने नांदेड येथील एका उत्सवात हजेरी लावली. तेव्हा तिला पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. त्यावेळी कोरोना नियमांचा सपशेल फज्जा उडालेला दिसला. सांगलीतील विटा येथे देखील असेच घडले. हेच होणार असेल तर कोरोना विषाणूला अटकाव बसणार कसा? आम्ही अनेकदा पाहिले, राज्याचे विरोधी पक्षनेतेही ‘मास्क’ न लावता सार्वजनिक कार्यक्रमात वावरतात. हे त्यांच्या आरोग्यासाठी तर चांगले नाहीच, पण नेते म्हणून जनतेला

कोणती दिशा

देत आहात? प. बंगालात भाजपला विजय मिळवायचा आहे हे ठीक, पण अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत. बंगालातील जाहीर कार्यक्रमांत गृहमंत्री व त्यांचे सहकारी ‘मास्क’ न लावता किंवा ‘मास्क’ नाकाखाली ओढून ममतादीदींवर हल्ला करताहेत. अशात कोरोनाच्या विषाणूने त्यांना दगाफटका केला तर कसे व्हायचे? आम्हाला त्यांच्या तब्येतीची चिंता वाटते म्हणून हे सांगायचे. ‘मास्क’ हीच लस आहे याचा विसर लोकांना पडला आहे. बाजारात कोरोनाची ‘लस’ आली आहे, पण लस घेऊनही लोकांना कोरोनाने पकडले आहे. दक्षिण आफ्रिकेतील देशांनी कोरोना लसीची 10 लाखांची खेप हिंदुस्थानला परत पाठविल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. बहुदा तिकडला कोरोना जरा आडदांड आहे, लसीने तो मरणार नाही असेच एकंदरीत दिसते. महाराष्ट्रातही आता सरकारने आडदांडपणे वागावे, नाहीतर कोरोना पुन्हा हाहाकार माजवेल. विरोधकांनी स्वतः नियम पाळावेत. लग्न, सार्वजनिक कार्यक्रम, सभा-संमेलने या ठिकाणच्या गर्दीवर नियंत्रण हवेच, मास्कची सक्ती तर असायलाच हवी. नियम मोडणाऱयांना कठोर शासन होणे गरजेचे आहे. 19 तारखेस शिवजयंतीच्या निमित्तानेसुद्धा राजकारण झालेच. छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा कोरोनाचे संकट पाहता रयतेच्या रक्षणासाठी कठोर निर्बंध लावलेच असते हे विरोधकांनी समजून घेतले पाहिजे. राजकीय मेळावे, लग्न समारंभ तसेच बहुतेक सर्वत्र लोक मास्क लावत नाहीत की सुरक्षित अंतर ठेवताना दिसत नाहीत. लोक बेपर्वा का आहेत? परिस्थिती अशीच राहिली तर कोरोनाची लाट नव्हे, तर लाटा येतील असा इशारा कोरोनासंदर्भातील राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी दिला आहे. निदान डॉक्टरांचे तरी ऐका!

आपली प्रतिक्रिया द्या