सामना अग्रलेख – पळता भुई थोडी!

5953
प्रातिनिधिक फोटो

महासत्ता वगैरे म्हणून मिरवणाऱ्यांचा माज एका विषाणूने उतरवला आहे. अमेरिकेत राष्ट्रीय आपत्ती जाहीर झाली. कोरोनाच्या निमित्ताने स्पेनमध्ये 120 वर्षांनी आणीबाणी जाहीर झाली आहे. जगभरात हेच भयंकर चित्र दिसू लागले आहे. सगळय़ांना पळता भुई थोडी झाली आहे. नाना पाटेकर यांच्या एका ‘डायलॉग’ची आठवण यानिमित्ताने सगळय़ांनाच येत असेल तो म्हणजे, ‘‘एक मच्छर साला आदमी को हिजडा बना देता है!’’ कोरोना विषाणू म्हणजे मच्छर नाही, पण त्या विषाणूने सगळ्यांनाच असहाय, हतबल करून सोडले आहे. ट्रम्पपासून मोदींपर्यंत सगळेच बेचैन आणि अस्थिर झाले आहेत. ही अस्थिरता जगाला कुठे घेऊन जाणार आहे?

कोरोनाने लोकांची पळता भुई थोडी केली आहे. इटलीतील कहाणी धक्कादायक आहे. एका अभिनेत्याने समाजमाध्यमांवर जाहीर केले की, ‘‘कोरोनामुळे त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला असून तो बहिणीच्या मृतदेहासोबत एका खोलीत आहे. बहिणीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणी त्याला मदत करील काय?’’ जगभरात अनेक ठिकाणी हेच प्रकार घडताना दिसत आहेत. बंगळुरूत एक नवविवाहित महिला पतीला कोरोनाची लागण झाल्याचे कळताच आपला जीव वाचवण्यासाठी त्याला सोडून आपल्या माहेरी पळाली आहे. ही महिला आपल्या पतीसोबत इटलीला हनीमूनसाठी गेली होती. तिथून परत आल्यावर पतीस कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर या महिलेस विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले, पण पतीला सोडून तिने पलायन केले. कोरोनाची दहशत ही अशी जगभरात पसरली आहे. हे संकट महामारीचेच आहे. ‘महामारी’ हा शब्द आम्हाला जड अंतःकरणाने वापरावा लागत आहे. ‘कोरोना’ ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी Epidemic Act, 1897 म्हणजे महामारी कायद्याचाच वापर करावा लागतोय. हा कायदा ब्रिटिशांचा होता. प्लेगशी मुकाबला करण्यासाठी याच कायद्याचा वापर झाला व रॅण्ड या अधिकाऱयाने अत्यंत निर्घृणपणे या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली तेव्हा त्याचा खून करण्यात आला. तो

काळ ब्रिटिशांचा

होता, पण आता याच कायद्याची अंमलबजावणी करताना आपल्यातलाच एखादा ‘रॅण्ड’ निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी लागेल. राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून 31 मार्चपर्यंत राज्यातील शाळा, कॉलेज, मॉल, थिएटर बंद केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचे आवाहन केले आहे. देशभरात कोरोनाची प्रचंड दहशत पसरली आहे. लोकांना त्यांचा जीव प्यारा आहे, पण शेवटी हे असेच ‘बंद’ वगैरे बरेच काळ चालत राहिले तर लोकांनी कमवायचे कसे? खायचे कसे? हा प्रश्न आहे. कोरोनापासून बचाव होईल पण भूकबळी होतील. हिंदुस्थानात आतापर्यंत 95 कोरोना रुग्ण सापडले. त्यातले 31 रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. पुण्यात सगळय़ात जास्त आहेत. चीनमधील वुहान प्रांताप्रमाणे पुण्याची संपूर्ण नाकाबंदी करावी काय यावर निर्णय घेणे गरजेचे आहे, पण सध्या हिंदुस्थानातील कोरोना व्हायरस हा दुसऱया टप्प्यात आहे. यामध्ये केवळ कोरोनाग्रस्त देशांतून आलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कात आल्याने कोरोना झालेल्या लोकांचा समावेश आहे. कोरोनाचा फैलाव याच टप्प्यात रोखणे गरजेचे आहे. यापुढचे 30 दिवस कोरोनाला रोखून धरणे महत्त्वाचे आहे. एकदा ‘कोरोना’ साथीच्या रोगाप्रमाणे पसरू लागला तर मात्र स्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे शासनाने कठोरात कठोर उपाय करणे गरजेचे आहे. सध्या इटली व चीनमध्ये कोरोना व्हायरस

सहाव्या टप्प्यात

पोहोचला आहे. चीनमध्ये पाच हजारांवर, तर इटलीमध्ये दोन हजारांवर लोक मेले. कोरोना विषाणू मारणारी लस निघेल तेव्हा निघेल, पण सध्या कोरोनाचा फैलाव रोखणे हेच महत्त्वाचे ठरते. कोरोनाचा विषाणू शरीरातून विलग करण्यात आपल्या शास्त्रज्ञांना यश आले असल्याची बातमी आहे. लस शोधण्यासाठी कोणताही विषाणू मानवी शरीराबाहेर असणे आवश्यक आहे. त्यामुळे विषाणूंवर वेगवेगळे प्रयोग करणे सोपे जाते. हिंदुस्थानात हा प्रयोग सुरू झाला आहे. पुण्यातच कोरोनाचा फैलाव जास्त झाला आहे. त्याच पुण्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) संस्थेने हा विषाणू मानवी शरीराबाहेर ठेवण्यात यश मिळविले आहे. आता त्यावर काय व कसे प्रयोग केले जातात ते पाहावे लागेल. सध्या तरी देश हवालदिल अवस्थेत जगत आहे. एकंदरीत जगाचीच अवस्था गर्भगळीत झाली आहे. महासत्ता वगैरे म्हणून मिरवणाऱयांचा माज एका विषाणूने उतरवला आहे. अमेरिकेत राष्ट्रीय आपत्ती जाहीर झाली. कोरोनाच्या निमित्ताने स्पेनमध्ये 120 वर्षांनी आणीबाणी जाहीर झाली आहे. जगभरात हेच भयंकर चित्र दिसू लागले आहे. सगळय़ांना पळता भुई थोडी झाली आहे. नाना पाटेकर यांच्या एका ‘डायलॉग’ची आठवण यानिमित्ताने सगळय़ांनाच येत असेल तो म्हणजे, ‘‘एक मच्छर साला आदमी को हिजडा बना देता है!’’ कोरोना विषाणू म्हणजे मच्छर नाही, पण त्या विषाणूने सगळय़ांनाच असहाय, हतबल करून सोडले आहे. ट्रम्पपासून मोदींपर्यंत सगळेच बेचैन आणि अस्थिर झाले आहेत. ही अस्थिरता जगाला कुठे घेऊन जाणार आहे?

आपली प्रतिक्रिया द्या