सामना अग्रलेख – कोरोनाची दहशत !

3034

कोरोनाच्या हाहाकाराने माणसांचे बळी तर जात आहेतच, पण या विषाणूच्या दहशतीचा फटका जगातील प्रत्येक क्षेत्राला बसला आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीचे तीनतेरा वाजल्याने पर्यटन ठप्प झाले आहे. उद्योग, व्यापार मोडकळीस आला आहे. शेअर बाजाराबरोबरच गुंतवणूकदारही उद्ध्वस्त झाला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्याबरोबरच अर्थव्यवस्थेच्या मानगुटीवर बसलेली या विषाणूची दहशत कशी मोडून काढायची, या दोन्ही आघाडय़ांवर सरकारला शर्थ करावीच लागेल.

कोरोनाच्या प्राणघातक व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार उडविला आहे. चीनच्या वुहान प्रांतातून उत्पन्न झालेला हा संसर्ग आता रोज नवनवीन देशांना आपल्या मिठीत घेत आहे. जिकडे पहावे तिकडे फक्त कोरोनाचीच दहशत दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला ‘जागतिक महामारी’ म्हणून घोषित केले. मी मी म्हणणाऱ्या सामर्थ्यवान देशांना आणि अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेलाही कोरोनाच्या विषाणूने भयभीत केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटन वगळता संपूर्ण युरोपातील विमान वाहतूक थांबविण्याचाच निर्णय जाहीर केला. वास्तविक कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या एकूण संख्येच्या तुलनेत मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण 2 ते 3 टक्के इतकेच आहे. मात्र कोरोनाच्या साथीपेक्षा अफवांचाच बाजार अधिक गरम झाल्यामुळे साऱ्या जगालाच या विषाणूच्या भयाने पछाडले. अर्थात या व्हायरसचा मुकाबला करणारी लस अथवा प्रतिबंधात्मक उपाय करणारे औषधच उपलब्ध नसल्यामुळे कोरोनाची दहशत वाढली. हिंदुस्थानातही आता हा विषाणू हातपाय पसरतो आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय केंद्र. त्यामुळे महाराष्ट्र सरकार कोरोनाच्या आपत्तीला रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. गर्दीचे सर्व समारंभ, उत्सव रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या खबरदारीबरोबरच राज्याची आरोग्य यंत्रणा आणि केंद्रीय यंत्रणाही डोळ्यांत तेल घालून विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर

आरोग्य तपासणी

करत आहे. मुंबईच नव्हे, देशातील प्रत्येक आंतरराष्ट्रीय विमानतळांवर अशी तपासणी करून संशयित रुग्णांना तातडीने वेगळे केले जात आहे. असे असतानाही दुबईहून मुंबईत उतरलेल्या पर्यटकांच्या एका गटामुळे हा व्हायरस मुंबई व पुण्यात दाखल झालाच. काही पर्यटक मराठवाडय़ातही पोहचले. या प्रवासात संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्याने काही जणांना कोरोनाची लागण झाली. एकट्या पुण्यातच आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईतही दोन जणांना या विषाणूची लागण झाली आहे. जिथे रुग्ण आढळला त्याच्या तीन किलोमीटर परिसरातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्याचे काम आता महाराष्ट्र सरकारने हाती घेतले आहे. आपल्या एका चुकीमुळे आपले आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांचेही जीव आपण धोक्यात आणतो, याचे भान विदेश प्रवास करून आलेल्या व्यक्तींनी ठेवले असते तर कोरोनाने आपल्याकडे डोके वर काढलेच नसते. इटली, इराण, अमेरिका, कॅनडा या देशांतून आलेल्या प्रवाशांमुळे केरळ, दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यांतही कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. देशभरात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 75 च्या घरात गेली आहे. डिसेंबर महिन्यात सर्वप्रथम चीनमध्ये हा विषाणू आढळला. तथापि, चीनने तातडीने खबरदारीच्या उपाययोजना करून संपूर्ण जगाला सावधान करण्याऐवजी

सुरुवातीला लपवाछपवी

करण्याचाच प्रयत्न केला. संपूर्ण जगाला संकटात ढकलणाऱ्या चीनच्या या लपवाछपवीमागे कोणते रहस्य दडले होते, याचा जाब जागतिक समुदायाने चीनच्या राज्यकर्त्यांना विचारलाच पाहिजे. मात्र आज परिस्थितीच अशी भयंकर ओढवली आहे की, जगातील प्रत्येक देशाला कोरोनाचा फैलाव रोखायचा कसा, या चिंतेने ग्रासले आहे. जगभरात सवा लाखाहून अधिक लोकांना कोरोनाच्या घातक व्हायरसची लागण झाली आहे. एकट्या चीनमध्येच 3100 हून अधिक लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले. चीननंतर सर्वाधिक 827 बळींची नोंद झाली ती इटलीमध्ये. अमेरिकेत 31, दक्षिण कोरियात 70 लोक मरण पावले आहेत. इराणसह आखाती देशांतही कोरोनाच्या बळींची संख्या वाढते आहे. कोरोनाच्या हाहाकाराने माणसांचे बळी तर जात आहेतच, पण या विषाणूच्या दहशतीचा फटका जगातील प्रत्येक क्षेत्राला बसला आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीचे तीनतेरा वाजल्याने पर्यटन ठप्प झाले आहे. उद्योग, व्यापार मोडकळीस आला आहे. शेअर बाजाराबरोबरच गुंतवणूकदारही उद्ध्वस्त झाला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्याबरोबरच अर्थव्यवस्थेच्या मानगुटीवर बसलेली या विषाणूची दहशत कशी मोडून काढायची, या दोन्ही आघाडय़ांवर सरकारला शर्थ करावीच लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या