सामना अग्रलेख – फडणवीस, कटुता संपवाच! लागा कामाला!!

Maharashtra chief minister Devendra Fadnavis

शिवसेना राहता कामा नये व शिवसेनेतून जे विष बाहेर पडलेय त्या विषाला ‘बासुंदी’चा दर्जा देण्याचा सध्या जो अचाट प्रयत्न सुरू आहे त्यामुळे कटुतेची धार कशी कमी होणार? शिवसेनेतले काही लोक लाचार किंवा मिंधे केल्याने सत्ता मिळाली; पण महाराष्ट्राचे राजकीय वातावरण साफ नसल्याची जाणीव श्री. फडणवीस यांना झाली हे काय कमी झाले? असो. उद्या काय होईल असे जर-तर वगैरे राजकारणात चालत नाही. पण महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम-कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपविण्याचा विडा उचलाच! लागा कामाला!!

महाराष्ट्राचे (उप) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐन दिवाळीत सामोपचाराच्या, शहाणपणाच्या गोष्टी केल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. फडणवीस यांचा मूळ स्वभाव हा सामोपचाराने मिळून मिसळून वागण्याचाच होता. पण सत्ता गेल्यामुळे ते बिघडले. सत्ता येते व जाते. माणसाने मूळ स्वभाव बदलण्याची गरज नाही. विजयानंतर आनंद होत असला तरी उन्माद चढणे हे प्रौढत्वाचे लक्षण मानले जात नाही. श्री. फडणवीस यांच्यात नव्या सत्तांतरापासून प्रौढपणा आला असल्याचे जाणवू लागले आहे. दिवाळीनिमित्त फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला व काही विषयांवर ते मोकळेपणाने बोलल्याचे प्रसिद्ध झाले. फडणवीस यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यावर महाराष्ट्राने विचार करायला हवा. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढी कटुता आली आहे, हे नाकारता येणार नाही, असे फडणवीस यांनी कबूल केले. महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त कटुता नव्हे तर सूडाच्या राजकारणाचे विषारी प्रवाह उसळत आहेत व या प्रवाहाचे मूळ भाजपच्या अलीकडच्या राजकारणात आहे. पण त्याबाबत फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना आता खंत वाटू लागली असेल तर त्या विषाचे अमृत करण्याचे कामही त्यांनाच करावे लागेल. श्री. फडणवीस यांनी त्यांच्या मनातील वेदना उघड केली आहे. ते पुढे सांगतात, ‘महाराष्ट्राच्या राजकारणातील कटुता आता राजकीय वैमनस्यापर्यंत गेली आहे. महाराष्ट्राची अशी राजकीय संस्कृती नाही. राजकीय मतभेद असले तरी सर्व पक्षांचे नेते एकमेकांशी बोलू शकतात. त्यामुळे ही कटुता कशी कमी करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे.’ श्री. फडणवीस यांनी हे सांगावे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आज फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या राजकारणातच कटुता आली आहे. लोकशाहीचे संकेत काय आहेत? सत्ताधारी पक्ष कोणताही असो, त्याने विरोधी पक्षीय हे एकजात देशाचे शत्रू असल्याचे मानू नये. लोकशाहीत मतभिन्नतेला वाव असल्याने, भिन्न मत म्हणजे देशविरोधी मत असे ठरत नाही. म्हणून सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी एकमेकांच्या

किमान प्रामाणिकपणावर विश्वास

ठेवून काम केले पाहिजे. पण आज हे वातावरण महाराष्ट्रात व देशातही राहिलेले नाही. महाराष्ट्रात कटुता का व कोणी निर्माण केली? महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात तीन सत्तांत्तरे झाली. त्यातील दोन सत्तांतरे थेट श्री. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाली आहेत. श्री. अजित पवार यांच्या मदतीने फडणवीस व त्यांच्या पक्षाने सत्तांतर करण्याचा प्रयत्न केला. तो फसला. त्या वेळीही केंद्रीय सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला गेला. हा प्रयोग यशस्वी झाला असता तर तो लोकमताचा कौल किंवा जनतेची किंवा परमेश्वराची इच्छा ठरली असती. पण महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होताच हे घटनाबाहय़, लोकांचा पाठिंबा नसलेले सरकार असल्याचे सांगितले गेले. हा दुटप्पीपणा चांगला नाही. प्रामाणिकपणाने बोलत आहात तर त्यात गल्लत का करता? महाराष्ट्रातील राजकारणात कटुता राहू नये व राज्याच्या कल्याणासाठी सगळय़ांनी एकत्र बसले पाहिजे हीच राज्याची परंपरा आहे. बेरजेचे राजकारण हीच महाराष्ट्राची परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार अशा नेत्यांनी हे बेरजेचे राजकारण केले, ते मोडले कोणी? राजकारणात व्यक्तिगत चिखलफेक करताना कोणतेही धरबंध आता बाळगले जात नाहीत व त्यासाठी भाजपने काही भुंकणाऱ्या कुत्र्यांना प्रशिक्षण दिले आहे. ते शरद पवारांपासून, ठाकऱ्यांपर्यंत ज्या भाषेचा वापर करतात त्यामुळे राज्याच्या राजकारणातील कटुता कशी कमी होईल? तुम्ही केंद्रीय सत्तेचा गैरवापर करून सरकार पाडले. शिवसेना फोडलीत. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले जावे यासाठी पडद्यामागून राजकीय सूत्रे हलवली गेली, हे सर्व महाराष्ट्राने आणि देशाने पाहिले. शिवसेना राहता कामा नये व शिवसेनेतून जे विष बाहेर पडलेय त्या विषाला ‘बासुंदी’चा दर्जा देण्याचा सध्या जो अचाट प्रयत्न सुरू आहे त्यामुळे कटुतेची धार कशी कमी होणार? शिवसेनेतले काही लोक लाचार किंवा मिंधे केल्याने सत्ता मिळाली; पण महाराष्ट्राचे राजकीय वातावरण साफ नसल्याची जाणीव श्री. फडणवीस यांना झाली हे काय कमी झाले? मुंबई महानगरपालिकेतून शिवसेना नष्ट करणे हा विचार

महाराष्ट्रहिताचा नाही

शिवसेना नष्ट करण्यासाठी सर्व येरागबाळय़ांची मोट बांधणे हा काही प्रामाणिकपणा नाही. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास विरोध करणे ही भूमिका इतर कोणी घेतली तर त्यास मान्यता असूच शकत नाही, पण फडणवीस यांच्यासारख्या शहाण्याने तशी भूमिका घेणे महाराष्ट्राच्या परंपरेस शोभणारे नव्हते. खरी शिवसेना कोणती? हे फडणवीसांना पक्के माहीत आहे व त्यांनी गळय़ात जो ‘खरी शिवसेना’ म्हणून धोंडा बांधून घेतला आहे तो महाराष्ट्राला घेऊन बुडणार आहे, हे समजण्याइतके फडणवीस सुज्ञ आहेत. पण त्यांचे शहाणपण कोठेतरी भरकटल्यासारखे झाले आहे. श्री. फडणवीस यांनी फराळाची चकली तोडताना आणखी एक काडी टाकली. ते त्यांच्या प्रगल्भतेवर शंका घेणारे आहे. फडणवीस म्हणतात, ‘उद्धव ठाकरे यांचा युती तोडण्याचा निर्णय पूर्वनियोजित होता.’ फडणवीस यांनी हे विधान कशाच्या आधारावर केले? शिवसेनेस शब्द देऊन अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद नाकारले येथेच कटुतेची ठिणगी पडली. प्रश्न असा आहे की, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचा शब्दच नव्हता हे पक्के ठरले होते ना? मग आता फुटलेल्या ‘मिंधे’ गटास मुख्यमंत्रीपद देऊन ‘‘आम्ही मुख्यमंत्रीपदाचा शब्द पाळला बरं का?’’ अशा चिपळय़ा वाजवायचे कारण काय? हेच मुख्यमंत्रीपद आधी दिले असते तर राज्यात कटुता निर्माण झाली नसती व फडणवीस यांनाही खंत वगैरे वाटण्याचा प्रश्नच नव्हता. अर्थात राज्यात कटुता आहे व ती दूर केली पाहिजे हा विचार देवेंद्र फडणवीस यांच्या मनात येणे हे महत्त्वाचे. फडणवीस हे ‘सागर’ बंगल्यावर खूश आहेत. गेल्यावेळी भाजपने शब्द पाळला असता तर तेच आज ‘वर्षा’वर असते व आम्ही एका नात्याने त्यांच्याकडे फराळास गेलो असतो. असो. उद्या काय होईल असे जर-तर वगैरे राजकारणात चालत नाही. पण महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम-कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपविण्याचा विडा उचलाच! लागा कामाला!!