सामना अग्रलेख – ठसका आणि ठेचा!

फडणवीस व त्यांच्या सरकारला नैतिकतेचे कितीही प्रवचन झोडू द्या, खरे काय ते लोकांना माहीत आहे. ‘ठाकरे-राऊत’ मुलाखतीचा भूकंप म्हणजे मॅच फिक्सिंग असा आरोप करणारे श्री. फडणवीस हे काही ‘श्रीमान सत्यवादी’ नाहीत. आम्ही फडणवीसांच्या वक्तव्याची दखल घेतली. कारण ज्यांच्यावर किमान बोलावे व लिहावे असे ते व्यक्तिमत्त्व आहे. बाकी सगळे पादरे पावटेच आहेत. श्री. फडणवीस म्हणतात, ठाकऱ्यांची मुलाखत वाचनीय नाही. याचा सरळ अर्थ असा की, अस्सल मराठमोळा ठेचा असलेल्या या मुलाखतीने त्यांना ठसका लागला, जळजळ झाली. त्याला कोणी काय करायचे?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे आहे की, ‘आपण उद्धव ठाकरे यांची मुलाखत वाचली नाही, पाहिली नाही. ठाकरे यांची मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग आहे.’ यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. जर त्यांनी ती वाचली नसेल म्हणजे ते राजकीय पुरुष नाहीत. कारण उद्धव ठाकरे हे काय बोलतात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. फडणवीस यांची मानसिक स्थिती समजून घेतली तर त्यांचे बोलणे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. भाजपच्या हायकमांडने त्यांना जो धक्का दिला आहे, त्यातून ते अद्यापि सावरलेले नाहीत. मागची अडीच वर्षे ते मुख्यमंत्रीपदासाठी झगडले, पण त्यांना शेवटी त्यांच्यापेक्षा कनिष्ठ माणसाच्या हाताखाली काम करावे लागत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर ही वेदना एक महिन्यानंतरही स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या पोटात जळजळ व मनात खदखद असल्याने उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीबाबत त्यांनी केलेल्या विधानांकडे वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहायला हवे. श्री. फडणवीस हे ‘ठाकरे-राऊत’ यांच्या मुलाखतीस मॅच फिक्सिंग म्हणत आहेत, पण राऊत यांनी ठाकरे यांना जनतेच्या मनातील सर्वच प्रश्न विचारले व त्यांची उत्तरे महाराष्ट्राला मिळाली. अभिनेता अक्षय कुमार यांनी मागच्या काळात पंतप्रधान मोदी यांची एक मुलाखत घेतली होती. त्यात श्रीमान अक्षय कुमार मोदींना विचारतात, ‘‘आदरणीय पंतप्रधानजी, आपण आंबे कापून खाता की चोखून खाता?’’ असे प्रश्न तरी ठाकरे-राऊत मुलाखतीत दिसत नाहीत. ठाकरे यांची मुलाखत चोखून खाण्याची चीज नाहीच. तो अस्सल मऱ्हाठमोळा ठेचा आहे. त्यामुळे ठसका लागणारच! विरोधकांचे तसेच झाले आहे. मुळात आपले पंतप्रधान गेल्या सात-आठ वर्षांत पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे गेले नाहीत. एका

विशिष्ट वृत्त एजन्सीलाच

ते मुलाखत देतात हे श्री. फडणवीस यांना माहीत असायला हवे, पण पंतप्रधानांची मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग आहे असे आम्ही म्हणणार नाही. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकीय वादळानंतर एक मुलाखत काय दिली, राज्यात जणू भूकंपाचे हादरेच बसले. ठाकरे यांच्या मुलाखतीवर क्रिया-प्रतिक्रिया सुरू झाल्या. समस्त शिवसेना विरोधक एकजुटीची वज्रमूठ आवळून बेताल वक्तव्ये करताना दिसत आहेत. एका मुलाखतीत इतकी ताकद असते हे यानिमित्ताने महाराष्ट्राला कळले. दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत खास पत्रकार परिषद घेऊन ‘ठाकरे-राऊत’ मुलाखतीवर खुलासे व हल्ले केले जात आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘ठाकरे’ नामाचे महत्त्व अधोरेखित करणारे हे दृश्य आहे. ठाकरे यांनी मुलाखतीत त्यांची भूमिका व बाजू मांडली. घरातल्याच लोकांनी आपल्याबाबतीत कशी दगाबाजी केली याबद्दल मन मोकळे केले. इस्पितळातील अतिदक्षता विभागात झुंज सुरू असताना बाहेर सरकार उलथवून टाकण्यासाठी कसे ‘अघोरी’ प्रकार सुरू होते, त्यावर ठाकरे बोलले व तेच खरे फडणवीसांच्या संतापाचे कारण आहे. ‘ठाकरे-राऊत’ मॅच फिक्सिंग होती तर मग ठाकरे इस्पितळात असताना बाहेर सरकार पाडण्याच्या निर्घृण हालचाली सुरू होत्या, त्या फिक्सिंगला कोणते नाव द्यायचे? हे सर्व पाहिले की वाटते, प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकार महाराष्ट्रात अवतरले आहे व महाराष्ट्राची अवस्था हे भकास करणार आहेत. महाराष्ट्राला महापूर-प्रलयाने वेढले आहे, पाणी उतरले असले तरी घरेदारे, पिके नष्ट झाली, पण लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारचे अस्तित्वच नाही.

मंत्रिमंडळाचा अतापता

एक महिन्यानंतरही नाही. इतके फिक्सिंग करून सरकार जन्माला घातले, पण ते रडत नाही की हात-पाय हलवत नाही, हा चिंतेचा विषय आहे. सरकारचा जन्म अनैसर्गिक परिस्थितीत झाला की दुसरे काय व्हायचे? डॉ. सुब्रमण्यम स्वामी हे एक शहाणे गृहस्थ आहेत. ‘आयपीएल’ सामन्याचे जेतेपद गुजरात संघाकडे गेले तेव्हा त्यांनी हा सगळय़ात मोठा घोटाळा असल्याचा बोभाटा केला. गुजरात संघ जिंकणे म्हणजे पद्धतशीर मॅच फिक्सिंग असल्याचे डॉ. स्वामी म्हणाले. यामागे मोठी सट्टेबाजी व आर्थिक व्यवहार असावेत असेही सांगितले गेले. नेमक्या त्याच ‘फिक्सिंग’ पद्धतीने महाराष्ट्रात फडणवीस-शिंदे सरकारने सत्ता स्थापन केली. ज्या त्वेषाने फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोरचा माईक खेचून घेतला, त्याच खेचाखेचीतून त्यांनी धाक दाखवून आमदारांना खेचले. पंचांच्या जागेवर केंद्रीय तपास यंत्रणांचे लोक उभे करून लोकांना एकतर बाद केले, नाही तर चौकार-षटकारांची खैरात केली. हे महाराष्ट्रातील सरकारचे चित्र आहे. फडणवीस व त्यांच्या सरकारला नैतिकतेचे कितीही प्रवचन झोडू द्या, खरे काय ते लोकांना माहीत आहे. ‘ठाकरे-राऊत’ मुलाखतीचा भूकंप म्हणजे मॅच फिक्सिंग असा आरोप करणारे श्री. फडणवीस हे काही ‘श्रीमान सत्यवादी’ नाहीत. आम्ही फडणवीसांच्या वक्तव्याची दखल घेतली. कारण ज्यांच्यावर किमान बोलावे व लिहावे असे ते व्यक्तिमत्त्व आहे. बाकी सगळे पादरे पावटेच आहेत. श्री. फडणवीस म्हणतात, ठाकऱ्यांची मुलाखत वाचनीय नाही. याचा सरळ अर्थ असा की, अस्सल मराठमोळा ठेचा असलेल्या या मुलाखतीने त्यांना ठसका लागला, जळजळ झाली. त्याला कोणी काय करायचे?