सामना अग्रलेख – सतर्क रहा, सावध रहा!

2341

महाराष्ट्रात सध्या मराठवाड्यासारखा भाग संततधार पावसासाठी ‘तहानलेला’ तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा ‘ओव्हरडोस’ असे चित्र दिसत आहे. एकीकडे महापुरामुळे ‘सतर्क’ राहण्याचे नगारे वाजवले जात आहेत तर दुसरीकडे तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळाचे इशारे दिले जात आहेत. वरुणराजाची अतिकृपा आणि अवकृपा अशी ही कोंडी आहे. महापूर आज ना उद्या ओसरेल, पावसाचा जोरही कमी होईल, पण मराठवाड्यातील दुष्काळाचे आव्हान वर्षभर कायमच राहणार आहे. तेव्हा सतर्क रहा, सावध रहा हा मंत्र सगळ्यांनाच लक्षात ठेवावा लागणार आहे.

मराठवाडा वगळता महाराष्ट्राचा बराच भाग पुन्हा मुसळधार पाऊस आणि महापुराच्या कचाट्यात सापडला आहे. विदर्भातही तो धुवांधार कोसळत आहे. कालपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यावर वरुणराजा रुसला होता. सध्या मात्र विदर्भावर त्याने कृपेची अक्षरशः बरसात केली आहे. नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोली आणि इतर जिल्ह्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 12 पैकी सात तालुक्यांमध्ये अतिवृष्टी सुरू आहे. प्रशासनाने शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर केली यावरून तेथील स्थिती किती गंभीर आहे याची कल्पना येते. शिवाय सुमारे 300 गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक भागांमध्ये रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. भामरागड वगैरे भागाला पडलेला पुराचा वेढा कमी होण्याची चिन्हे नाहीत. विदर्भात इतरत्रदेखील नद्यानाले, तलाव भरून वाहू लागले आहेत. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस सुरू आहे. नाशिकमध्ये तर गोदावरीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि कोकणात तर गेल्या आठवड्यापासूनच पावसाचे धुमशान सुरू आहे. मागील गुरुवारी दोन दिवसांत संपूर्ण महिन्याचा पाऊस कोसळल्याने मुंबईचे जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले होते. आताही दोन-तीन दिवसांत

पाऊस जोरदार

असला तरी मुंबईकरांच्या सुदैवाने रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला फारसा अडथळा आलेला नाही. गणपतीसाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांना मात्र अतिवृष्टी आणि त्यामुळे रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीची झालेली कोंडी असा दुहेरी तडाखा बसला आहे. रविवारी खेड रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांचा जो उद्रेक झाला तो त्यामुळेच. मात्र चाकरमान्यांचे असे हाल गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षीच होतात असे म्हणून कोकण रेल्वे प्रशासनाला हात झटकता येणार नाहीत. मांडवी एक्प्रेस खेड स्थानकात थांबली नाही, ज्या गाड्या थांबल्या त्यांच्या डब्यांचे दरवाजे आतील प्रवाशांनी उघडले नसल्यामुळे खेड येथून प्रवाशांना चढताच आले नाही. आता यासाठी डब्यांमध्ये असणाऱ्या प्रवाशांकडे बोट दाखवले जात आहे. तथापि दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर व्यवहार्य उपाय कोकण रेल्वेने शोधायला नको का? गणपतीसाठी जाणाऱ्या आणि परतणाऱ्या कोकणवासीयांना वाऱ्यावर सोडून द्यायचे आणि मग कानावर हात ठेवायचे हा प्रकार आता तरी थांबायला हवा. खेड स्थानकात उद्रेक झाल्यावर तुम्ही आणखी काही गाड्यांना तेथे थांबा देण्याचा निर्णय घेतलाच ना. हा शहाणपणा आधी का नाही सुचला? निदान यापुढे तरी या गोष्टींचा सारासार विचार करून कोकणवासीयांना त्रास होणार नाही याचे योग्य नियोजन करा. तिकडे सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मात्र प्रशासनाने

आधीच आवश्यक खबरदारी

घेतलेली दिसत आहे. या तिन्ही ठिकाणी सध्या मुसळधार वृष्टी सुरू आहे. गेल्या महिन्यात येथे महापुराने घातलेले थैमान आणि त्यामुळे उडालेला हाहाकार याच्या भयंकर आठवणी अजूनही तेथील जनतेचा थरकाप उडवतात. त्यामुळे आता पुन्हा उद्भवलेला महापुराचा धोका पाहून प्रशासन आधीच ‘सतर्क’ झाले आहे. अलमट्टी धरणातून वेळीच विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुराचा धोका असलेल्या गावांतील ग्रामस्थ आणि जनावरांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले जात आहे. सांगलीमध्ये एनडीआरएफची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रशासन यावेळी सतर्कतेचे फक्त इशारे-नगारे वाजवत बसले नाही तर स्वतःदेखील सतर्क आणि सक्रिय झाले हे महत्त्वाचे. महाराष्ट्रात सध्या मराठवाड्यासारखा भाग संततधार पावसासाठी ‘तहानलेला’ तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा ‘ओव्हरडोस’ असे चित्र दिसत आहे. एकीकडे महापुरामुळे ‘सतर्क’ राहण्याचे नगारे वाजवले जात आहेत तर दुसरीकडे तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळाचे इशारे दिले जात आहेत. वरुणराजाची अतिकृपा आणि अवकृपा अशी ही कोंडी आहे. महापूर आज ना उद्या ओसरेल, पावसाचा जोरही कमी होईल, पण मराठवाड्यातील दुष्काळाचे आव्हान वर्षभर कायमच राहणार आहे. तेव्हा सतर्क रहा, सावध रहा हा मंत्र सगळ्यांनाच लक्षात ठेवावा लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या