
देशातील निवडणुका आज निरर्थक झाल्या आहेत. सरकारला हवे असलेले मतदार तीन-चार ठिकाणी मतदान करीत आहेत आणि नको असलेले जिवंत मतदार ‘मृत’ दाखवून मतदार यादीतून वगळले जात आहेत. निवडणूक आयोगच सरकारचा मित्रपक्ष बनून हे उद्योग करीत असेल तर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा प्राण वाचवायचा कोणी? बा गणराया, देशाच्या लोकशाहीवर व स्वातंत्र्यावर आलेले हे भयंकर विघ्न दूर कर, निरंकुश झालेल्या राज्यकर्त्यांच्या तावडीतून देशाला वाचव आणि सरकारच्या दहशतीखाली गुदमरलेला हा देश निर्भय कर, एवढीच प्रार्थना आज देशातील जनता विघ्नहर्त्या गणेशाला करीत आहे!
विघ्ने दूर करणारी देवता अशी मान्यता असलेल्या श्री गणरायांचे आज महाराष्ट्रातील घराघरांत धूमधडाक्यात आगमन होईल. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगाच्या पाठीवर जिथे कुठे मराठी माणूस वास्तव्यास आहे, त्या प्रत्येक घरात या लडिवाळ देवतेची परंपरागत पद्धतीने प्राणप्रतिष्ठा होईल. घरांप्रमाणेच राज्याच्या प्रत्येक शहर व गाव-खेड्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमध्ये ढोल-ताशांचा गजर व गुलालाची उधळण करीत गणेश मंडळांचे कार्यकर्ते गणरायाला विराजमान करतील. गणेशोत्सव आणि मराठी माणूस यांचे नाते अतूट आहे व इतर कुठल्याही सणांपेक्षा गणेशोत्सवासाठी मराठी कुटुंबांमध्ये अंमळ अधिकच लगबग सुरू असते. एरवी 10 दिवसांचा असणारा गणेशोत्सव यंदा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर असा 11 दिवस चालणार आहे. चैतन्य व मांगल्याचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक अपूर्व असा उत्साह संचारतो. महाराष्ट्रातील अवघे जन-मन या काळात गणरायाच्या भक्तीत लीन व तल्लीन झालेले असते. भाविकांचा हा भक्तिभाव, त्यांची श्रद्धा, पूजा-अर्चा, आरती स्तवन, प्रसादाचे मोदक असा सर्व थाट स्वीकारत गणपती बाप्पा सालाबादप्रमाणे आपले कोडकौतुक करून घेतील. गणरायाने आपल्यावरील
संकटांचे निवारण
करावे, कुटुंबाचे यश व प्रगतीच्या मार्गात अडथळे बनून येणाऱ्या विघ्नांचे हरण करावे, अशी मनोमन प्रार्थना श्री गणेशाकडे केली जाईल. मात्र त्याही पलीकडे जाऊन आज महाराष्ट्रावर आणि देशावर विघ्नांची जी अखंडित मालिका सुरू आहे, ती गणरायाने कायमची खंडित करायला हवी. हे विघ्न लहानसहान नाही. देशाच्या संविधानावर चौफेर हल्ले सुरू आहेत. देशातील तमाम घटनात्मक संस्थांवर मूठभर लोक सत्तेच्या जोरावर हुकूमत गाजवत आहेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही असे बिरूद मिरवणारा आपला देश लोकशाहीला अखेरचे आचके देताना निमूटपणे पाहत बसला आहे. दोन व्यक्तींचे सरकार कोणालाही जुमानायला तयार नाही व हिंदुस्थानसारख्या खंडप्राय व प्राचीन देशाला ते हुकूमशाहीच्या दिशेने घेऊन निघाले आहे. हे देशावर आलेले विघ्न नव्हे तर काय! सत्तेमुळे मदांध व बेभान झालेले राज्यकर्ते काय करतील याचा नेम राहिलेला नाही. देशाचे उपराष्ट्रपती अचानक एके दिवशी राजीनामा देतात. तब्येतीचे कारण सांगून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले जाते व राजीनामा दिल्यापासून ते गायब होतात किंवा केले जातात! आजवर देशात असे कधीच घडले नाही. देशाचे एक माजी निवडणूक आयुक्तदेखील असेच अदृश्य झाले. जनतेच्या मतदानाच्या पवित्र अधिकारावर मनमानी पद्धतीने दरोडे घातले जात आहेत.
व्होट चोरीच्या माध्यमातून
खोटे जनादेश मिळवून चोरीची सरकारे स्थापन केली जात आहेत. राज्यकर्ते व निवडणूक आयोग यांची अभद्र युती झाली आहे. राज्यकर्त्यांच्या व्होट चोरीला पत्रकार परिषद घेऊन संरक्षण देण्याचे काम निवडणूक आयोग करत आहे. व्होट चोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याऐवजी चोरी उघडकीस आणणाऱ्या विरोधी पक्षनेत्यास दमबाजी केली जात आहे. एकीकडे देशात लोकशाहीची दिवसाढवळ्या हत्या केली जात आहे आणि दुसरीकडे दडपशाहीच्या माध्यमातून देशात हुकूमशाहीची बीजे रोवली जात आहेत. ‘खोके’ संस्कृती व होलसेलात आमदार खरेदी करून सरकारे पाडली जात आहेत. देशातील निवडणुका आज निरर्थक झाल्या आहेत. सरकारला हवे असलेले मतदार तीन-चार ठिकाणी मतदान करीत आहेत आणि नको असलेले जिवंत मतदार ‘मृत’ दाखवून मतदार यादीतून वगळले जात आहेत. निवडणूक आयोगच सरकारचा मित्रपक्ष बनून हे उद्योग करीत असेल तर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा प्राण वाचवायचा कोणी? बा गणराया, देशाच्या लोकशाहीवर व स्वातंत्र्यावर आलेले हे भयंकर विघ्न दूर कर, निरंकुश झालेल्या राज्यकर्त्यांच्या तावडीतून देशाला वाचव आणि सरकारच्या दहशतीखाली गुदमरलेला हा देश निर्भय कर, एवढीच प्रार्थना आज देशातील जनता विघ्नहर्त्या गणेशाला करीत आहे!