
फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील शेतकरी हताश आणि निराश आहेत, पण त्याच खात्याचे आजी-माजी मंत्री मात्र भ्रष्टाचार-गैरव्यवहाराचे आरोप होऊन आणि मंत्रीपद जाऊनही ‘आशादायी’ आहेत. ज्या-ज्या मंत्र्यांवर घोटाळ्याचे आणि गैरव्यवहाराचे आरोप झाले त्या सगळ्यांना फडणवीस सरकारची ‘साथ’ आहे. कर्जमाफीची न्याय्य अपेक्षा करणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांना मात्र हे सरकार साथ द्यायला तयार नाही. त्यामुळेच बाबासाहेब सरोदे यांच्यासारख्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना स्वतःचे जीवन संपवावे लागत आहे. फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांची घोटाळ्याची फाईल ‘नशीबवान’ आहे, पण शेतकरी कर्जमाफीची फाईल ‘कमनशिबी’ ठरली आहे!
राज्यातील फडणवीस सरकार शेतकऱ्यांचा जीव घेणारे आणि भ्रष्ट मंत्री-नेत्यांचा जीव वाचविणारे आहे हे रोजच सिद्ध होत आहे. कर्जबाजारी शेतकरी रोज मृत्यूला कवटाळत आहेत आणि भ्रष्ट मंत्री बिनधास्त फिरत आहेत. नेवासे तालुक्यातील बाबासाहेब सरोदे हा सामान्य शेतकरी ‘‘सरकारने साथ दिली नाही,’’ असे म्हणत हताशपणे मृत्यूला कवटाळतो आणि त्याच वेळी माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील घोटाळ्याच्या आरोपांची फाईलच ‘हरवल्या’चा चमत्कार घडतो. हा योगायोग राज्यातील शेतकऱ्यांच्या दुःखावर, जखमांवर मीठ चोळणारा आणि सत्ताधाऱ्यांची नियत उघडी पाडणारा आहे. फडणवीस सरकार पाशवी बहुमताने सत्तेवर आले, पण या सरकारने सर्वसामान्यांच्या ‘आशा’ फोल ठरविल्या आणि सत्तापक्षातील भ्रष्टांच्या आशा पल्लवित ठेवल्या. बाबासाहेब सरोदे यांची कर्जमाफीची आशा मावळली म्हणून त्यांनी स्वतःला गळफास लावून घेतला. सरकारने कर्जमाफीची साथ दिली असती तर सरोदे यांचा जीव वाचला असता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात याच मंडळींनी शेतकऱ्यांना
कर्जमाफीची आशा
दाखवली होती. सत्तेत आल्यावर मात्र त्या प्रत्येकाची भाषा बदलली. मुख्यमंत्री म्हणू लागले, ‘‘योग्य वेळी कर्जमाफी देऊ,’’ एक ‘उप’ ‘‘असे आश्वासन दिलेच नव्हते’’ म्हणून हात झटकून मोकळे झाले. महसूल मंत्र्यांचे आणखी तिसरेच! ‘‘कर्जमाफीसाठी सर्वेक्षण सुरू आहे,’’ असे गाजर दाखवीत त्यांनी बळीराजाला झुलवत ठेवले आहे. कशासाठी गरीब शेतकऱ्यांना आशा-निराशेच्या गर्तेत ढकलत आहात? याच गर्तेत मागील चार महिन्यांत सरोदे यांच्यासारख्या 740 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी स्वतःचे जीवन संपवून घेतले. फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील शेतकरी हताश आणि निराश आहेत, पण त्याच खात्याचे आजी-माजी मंत्री मात्र भ्रष्टाचार-गैरव्यवहाराचे आरोप होऊन आणि मंत्रीपद जाऊनही ‘आशादायी’ आहेत, बिनधास्त आहेत. माजी कृषी सचिवांनी दिलेली आपल्या घोटाळ्याची फाईलच ‘हरवत’ आहे. हे धाडस या माजी कृषीमंत्र्यांमध्ये आहे. कारण सरकारची त्यांना हर प्रकारची साथ आहे. आज मंत्रीपद गेले असले तरी पुढेमागे आपल्याला ‘लाल दिवा’ मिळणार ही खुशीची गाजरे ते त्यामुळेच खात आहेत. मंत्रीपद सोडावे लागून महिने लोटले तरी
सरकारी बंगला
सोडण्याची त्यांची तयारी नाही हा त्या ‘आशे’चाच चमत्कार! दुसऱ्या माजी कृषीमंत्र्यांनी भर विधिमंडळात ‘रमी’चा डाव मांडून सरकारची इभ्रत वेशीवर टांगली. मात्र त्यांनाही सरकारने ‘साथ’ दिली. खरे तर त्यांचे मंत्रीपदच जायचे; परंतु ‘दुसऱ्या खात्याच्या बोटावर’ त्यांचे निभावले. त्यांचा कार्यभार सांभाळणारे विद्यमान कृषीमंत्रीही ‘नशीबवान’च निघाले. या महाशयांनी ‘‘कृषी खाते म्हणजे त्रास’’ अशी खदखद जाहीरपणे बाहेर काढली. राज्याच्या अन्नदात्याचा घोर अपमान केला. मात्र सारवासारव करून ते आजही त्या मंत्रीपदावर आहेत. कारण सरकारची ‘साथ’ त्यांना आहे. बेडरूममधील पैशांच्या बॅगांचे व्हिडीओ व्हायरल होणाऱ्या मंत्र्यांनाही या सरकारची ‘साथ’ आहे. ज्या-ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे, घोटाळ्याचे आणि गैरव्यवहाराचे आरोप झाले त्या सगळ्यांना फडणवीस सरकारची ‘साथ’ आहे. कर्जमाफीची न्याय्य अपेक्षा करणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांना मात्र हे सरकार साथ द्यायला तयार नाही. त्यामुळेच बाबासाहेब सरोदे यांच्यासारख्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना स्वतःचे जीवन संपवावे लागत आहे. फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांची घोटाळ्याची फाईल ‘नशीबवान’ आहे, पण शेतकरी कर्जमाफीची फाईल ‘कमनशिबी’ ठरली आहे!