आजचा अग्रलेख : वैरीण झाली नदी…

946

कोल्हापूरसांगलीतील महाप्रलय म्हणजे महाराष्ट्राने एक व्हावे संकटग्रस्तांसाठी पुढे जावे असा  प्रसंग आहे. सर्वस्व गमावलेल्या, नेसत्या वस्त्रानिशी जीव वाचविण्यासाठी बाहेर पडलेल्या लाखो लोकांसाठी कोटय़वधी हात पुढे येतील. तरच संकटग्रस्तांना जगवता येईल. नाहीतर सर्वस्व गमावलेल्या आपल्याच रक्तामांसाच्या लोकांवर निर्वासित म्हणून जगण्याची वेळ आपल्याच महाराष्ट्रात येईल. नदी वैरीण झाली, धरणे बेभान झाली तरी माणसाने संवेदनशील असावे हीच अपेक्षा आहे.

कशी काळनागिणी,

सखे गं, वैरीण झाली नदी

प्राणविसावा पैलतीरावरी,

अफाट वाहे मधी

अशी एक भा. रा. तांबे यांची कविता आहे. रौद्ररूप धारण केलेल्या नदीचे वर्णन भा. रा. तांबे यांनी केले. पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, कोकणातील नद्यांना आलेला पूर, त्या पुरानंतरची वाताहत पाहता राज्यातील नद्यांनी काळनागिणींचेच रूप धारण केले आहे. केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेशसह अर्धा हिंदुस्थान महापुराने गारद झाला आहे. पुराने रौद्ररूप धारण केले तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस हे भाजपच्या महाजनादेश यात्रेवर होते. मुख्यमंत्र्यांबरोबर काही मंत्री व प्रशासन सामील झाल्याची टीका झाली, पण मुख्यमंत्री पुन्हा परतले व परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थ करीत आहेत. सातारा, सांगली, कोल्हापुरातील पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे पूर ओसरू लागला, पण जनजीवन पूर्वपदावर येण्यास फार काळ लागेल. पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ खान्देशातही नद्यानाल्यांना पूर आला, घरेदारे वाहून गेली. अनेक सधन कुटुंबांवर निर्वासित होऊन जगण्याची वेळ आली आहे. कोल्हापूर, सांगली हे सधन जिल्हे म्हणून राज्यात ओळखले जातात. तिथे हाहाकार माजला. ही राष्ट्रीय आपत्ती आहे व सगळय़ांनीच एकत्र येऊन या आपत्तीशी सामना करायला हवा. या नैसर्गिक आपत्तीची तुलना पंचवीस वर्षांपूर्वीच्या मराठवाडय़ातील किल्लारी भूकंपाशी करावी लागेल. तेव्हा जमिनीतून लाव्हा उसळून वर आला, आता आकाशातून पाणी बरसले. किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते व या राष्ट्रीय आपत्तीचा सामना करताना संपूर्ण महाराष्ट्र जात, धर्म, पक्षभेद विसरून श्री. पवार यांच्या मागे उभा राहिला होता. तेव्हा माणसे जमिनीखाली गाडली गेली, आता पाण्यात वाहून गेली. शरद पवार हे अनुभवी आहेत. त्यांनी त्यांचा अनुभव सरकार व पूरग्रस्तांच्या पाठीशी उभा केला तरच ते ‘लोकनेते’ किंवा जाणते राजे. उलट ते व त्यांचा पक्ष राजकारण करीत आहेत व पूरग्रस्तांना भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरकार अपयशी ठरले आहे असा नेहमीचा आरोप विरोधक करीत आहेत. राज्यातील पूरपरिस्थितीवर मात करण्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याने मुख्यमंत्री फडणवीस व मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे नाना पटोलेंसारखे लोक करतात तेव्हा त्यांच्या

अकलेबाबत साशंकता

निर्माण होते. विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे हे पुरातील पाण्यात वाहून गेलेल्यांच्या मढय़ावरील लोणी खाण्याचा निर्लज्ज प्रकार करीत आहेत. आमची माहिती अशी आहे की, सांगलीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराची मदत आधीच घेतली आहे. हेलिकॉप्टरची मदत लोकांना वाचविण्यासाठी घेण्यात आली. एनडीआरएफ व नौदलाची सत्तरहून अधिक पथके बचावकार्यात गुंतली आहेत. खाद्यसामग्री पुरवली जात आहे. सरकारच नव्हे तर अनेक संस्था, संघटना, देवस्थाने मदतीसाठी पुढे आली आहेत. महाराष्ट्रात धर्म, पंथ, जातपात अशा भेदाच्या भिंती आपग्रस्तांच्या मदतकार्याच्या आड कधीच येत नाहीत. आताही कोल्हापुरातील शिरोळी येथे मुस्लिम बांधवांनी तेथील मदरशात पूरग्रस्तांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. सोमवारी सकाळी बकरी ईदनिमित्त कोल्हापूरचा दसरा चौक आणि ठिकठिकाणी नमाज पठण झाल्यानंतर पूरग्रस्तांसाठी सामूहिक दुआ मागितला जाणार आहे. एवढेच नव्हे, यंदाच्या बकरी ईदवर असलेले महाप्रलयाचे सावट पाहता बकऱ्याची कुर्बानी रद्द करून सामूहिक वाटा पद्धतीने हा विधी करण्याचे तेथील मुस्लिम बांधवांनी ठरविले असून अन्य खर्चाला फाटा देत ती रक्कम पूरग्रस्तांच्या मदत निधीत जमा केली जाणार आहे. महाराष्ट्राला जो सामाजिक सलोख्याचा वारसा आहे त्याचेच हे उदाहरण आहे. शिवसेनेची मदत पथके कोल्हापूर-सांगलीत आहेत, पण मुंबईतूनही मदत पथके रवाना झाली. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्हय़ात तळ ठोकून आहेत आणि कोल्हापूर व सांगली जिल्हय़ांतील पूरग्रस्तांच्या मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. डॉक्टरांची पथके पूरग्रस्तांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनीदेखील पूरग्रस्तांसाठी पाच लाख टन अन्नधान्य आणि 25 हजार चादरींची व्यवस्था केली आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांनी हजारो पूरग्रस्तांची खाण्या-पिण्याची व्यवस्था केली. छत्रपती संभाजीराजे स्वतः पाण्यात उतरून बचावकार्य करीत होते. शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील स्वतः बचावकार्य करताना पुरात अडकले.

सरकारम्हणजे

फक्त मुख्यमंत्री नाहीत तर सरकारशी संबंधित प्रत्येक घटक. लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षाचा कार्यकर्ता हा त्या संकटसमयी ‘सरकार’ म्हणूनच काम करतो हे लक्षात घेतले पाहिजे. ही सेवा निःस्वार्थ पद्धतीने झाली तर सामाजिक कामाचे पुण्य पदरी पडेल. आता काही मंडळींनी असा आरोप केला आहे (त्यात राजू शेट्टीही आहेत) की, पूरग्रस्तांना जे मदतीचे वाटप होत आहे त्या सरकारी मदतीवर म्हणे भाजप आमदार व मुख्यमंत्री फडणवीस यांचे फोटो चिकटवले आहेत. हे प्रकार बरे नाहीत. गिरीश महाजन हे पूरग्रस्तांची पाहणी करताना ‘सेल्फी’ काढत होते. सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख हे पुराचे थैमान सुरू असताना पुण्यात राजकीय बैठका घेत असल्याचा चिखल विरोधकांनी उडवला आहे. बाळासाहेब थोरात यांनी तरी अशा प्रसंगी संयमाने वागावे, पण तेसुद्धा चिखलात नाचू लागले आहेत. मदतीमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप थोरातांकडून होतो तेव्हा आश्चर्य वाटते. लातूरच्या भीषण भूकंपानंतर तेथील जनतेला मदत करण्यासाठी येणारी मिशनरी मंडळी मदत दिल्यानंतर भूकंपग्रस्तांच्या गळय़ात ‘क्रॉस’ टाकीत असत. आता कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांना मदत करताना कोणी ‘राजकीय डबल क्रॉस’ करण्याचा प्रयत्न करू नये. शेवटी सरकार हे जनतेचेच असते. तेव्हा असे काही घडले तर जनतेच्या मनात रोष उत्पन्न होईल याचा विचार सगळय़ांनीच करायला हवा. लोकांची घरेदारे, शेती, व्यवसाय वाहून गेले आहेत. त्यांचे आयुष्य, भविष्य, भूतकाळ, वर्तमान सगळेच वाहून गेले. गावेच्या गावे नव्याने उभी करावी लागतील व मदतीच्या पाकिटांवर, गोणीवर राजकीय पक्षांची लेबले चिकटवून हे निर्माण कार्य होणार नाही. कोल्हापूर-सांगलीतील महाप्रलय म्हणजे महाराष्ट्राने एक व्हावे व संकटग्रस्तांसाठी पुढे जावे असा  प्रसंग आहे. सर्वस्व गमावलेल्या, नेसत्या वस्त्रानिशी जीव वाचविण्यासाठी बाहेर पडलेल्या लाखो लोकांसाठी कोटय़वधी हात पुढे येतील. तरच संकटग्रस्तांना जगवता येईल. नाहीतर सर्वस्व गमावलेल्या आपल्याच रक्तामांसाच्या लोकांवर निर्वासित म्हणून जगण्याची वेळ आपल्याच महाराष्ट्रात येईल. नदी वैरीण झाली, धरणे बेभान झाली तरी माणसाने संवेदनशील असावे हीच अपेक्षा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या