सामना अग्रलेख – कर्तव्यकठोर प्रशासक

6138

टी. एन. शेषन यांची संपूर्ण कारकीर्दच वादळी राहिली. अर्थात सर्वात मोठे वादळ त्यांनी निर्माण केले ते मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून केलेल्या निवडणूक सुधारणांच्या झंझावातामुळे. आज जो काही निवडणूक आयोगाचा दरारा आहे त्याचे श्रेय शेषन यांचेच आहे. आज ते काळाच्या पडद्याआड गेले आहेत. तथापि राजकारण्यांना धाकात ठेवणारा, प्रशासनाला धडकी भरवणारा, निवडणूक आयोगाची सत्ताधाऱ्यांच्या प्रभावातून मुक्तता करून एक सक्षम आणि स्वायत्त घटनात्मक संस्था अशी प्रतिमा निर्माण करणारा, मतदार आणि निवडणूक प्रक्रिया यांच्यात एक विश्वासाचे नाते निर्माण करणारा कर्तव्यकठोर प्रशासक म्हणून त्यांचे नाव जनतेच्या हृदयात कायम राहील.

हिंदुस्थानच्या राजकारणात गेल्या चार-पाच वर्षांपासून ‘पारदर्शक राज्यकारभार’ या शब्दाची चलती असली तरी देशातील निवडणूक प्रक्रिया खऱ्या अर्थाने ‘पारदर्शक’ केली ती माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांनी. स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेषन यांच्या रूपात देशाने एक करारी आणि कर्तव्यकठोर मुख्य निवडणूक आयुक्त पाहिला. कारण तोपर्यंत निवडणूक आयोग म्हणजे फक्त नावालाच ‘घटनात्मक यंत्रणा’ होती. बाकी सगळा मामला राज्यकर्त्यांच्या मर्जीतली व्यवस्था असाच होता. आज जसे सीबीआय, ईडी आदी यंत्रणांना सरकारी पोपट संबोधले जाते तसे आरोप त्या वेळी निवडणूक आयोगावर केले जात असत. निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार, हेराफेरी, गुंडगिरीच्या जोरावर मतदान केंद्रे ताब्यात घेण्याचे आणि बोगस मतदान करण्याचे प्रकार अनेक राज्यांत सर्रास घडत असत. मात्र निवडणूक आयोगाची ही प्रतिमा संपूर्णपणे बदलविण्याचे आणि निवडणूक आयोगाला खऱ्या अर्थाने ‘सक्षम आणि स्वायत्त’ करण्याचे ऐतिहासिक कार्य टी. एन. शेषन यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून केले. निवडणूक आयोग हादेखील लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी एक खंबीर खांब आहे याची जाणीव राजकारण्यांबरोबरच प्रशासन आणि सर्वसामान्य जनतेला झाली ती शेषन यांच्या कार्यकाळातच. मुळात शेषन यांचे एकूण

व्यक्तिमत्त्वही तसे करारीच

होते. प्रशासकीय सेवेत असताना नीतीमूल्ये जपत कायदा आणि नियमांचे कठोरपणे पालन करायचे. त्यासाठी राजकारण्यांशी संघर्ष करावा लागला तरी तो करायचा, मात्र कर्तव्यात अजिबात कसूर ठेवायची नाही अशीच शेषन यांची कार्यपद्धती राहिली. मुख्य म्हणजे, हा संघर्ष आणि त्याचे परिणाम यांची शेषन यांनी कधीही पर्वा केली नाही.  त्यांची भूमिका स्वच्छ आणि प्रामाणिक असल्याने त्यांच्या या संघर्षाला वेगळीच धार येत असे. अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यापासून देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ऐतिहासिक कामगिरी करेपर्यंतच्या प्रवासात त्यांच्या या संघर्षाचे दाखले पानोपानी मिळतात. 1962 मध्ये तामीळनाडूत घडलेली एक घटना शेषन यांच्या कर्तव्यकठोरतेची कल्पना येण्यास पुरेशी आहे. तेथील एका अधिकाऱ्याला तीन हजार रुपये लाच घेण्यापासून शेषन यांनी रोखले होते. त्या प्रकरणाचे पडसाद एवढे उमटले की, सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच या फक्त साडेसहा तासांच्या काळात शेषन यांची तब्बल सहावेळेस बदली करण्यात आली होती. एवढेच नव्हे, तर तेथील महसूलमंत्र्यांचे ऐकले नाही म्हणून त्या मंत्रीमहाशयांनी शेषन यांना एका निर्जन ठिकाणी गाडीतून उतरवून दिले होते. कर्तव्यपूर्ती आणि संघर्ष हा शेषन यांच्यासाठी हा असा नेहमीचाच भाग होता. अर्थात त्यामुळेच मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ते

निवडणूक सुधारणा आणि आचारसंहिता

वगैरेंची प्रभावी अंमलबजावणी करू शकले. अगदी दिवंगत पंतप्रधान नरसिंह राव यांच्यापासून बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यापर्यंत सगळय़ांनाच शेषन यांच्या कर्तव्यकठोर प्रशासनाचे तडाखे सहन करावे लागले. बिहारच्या निवडणुका रद्द करून मतदान केंद्र बळकावण्याचे प्रकार त्यांनी रोखले. 1992 मध्ये उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या वेळीही त्यांनी एकीकडे प्रशासकीय यंत्रणेला कर्तव्याचे तंतोतंत पालन करण्याचा दम भरला होता, तर दुसरीकडे त्या राज्यातील 50 हजार गुन्हेगारांना ‘‘एकतर जामीन घ्या किंवा पोलिसांच्या हवाली व्हा!’’ असा इशारा दिला होता. मतदार ओळखपत्र देऊन सामान्य मतदाराची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचे कामही शेषन यांनीच केले. टी. एन. शेषन यांची संपूर्ण कारकीर्दच वादळी राहिली. अर्थात सर्वात मोठे वादळ त्यांनी निर्माण केले ते मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून केलेल्या निवडणूक सुधारणांच्या झंझावातामुळे. आज जो काही निवडणूक आयोगाचा दरारा आहे त्याचे श्रेय शेषन यांचेच आहे. आज ते काळाच्या पडद्याआड गेले आहेत. तथापि राजकारण्यांना धाकात ठेवणारा, प्रशासनाला धडकी भरवणारा, निवडणूक आयोगाची  सत्ताधाऱ्यांच्या प्रभावातून मुक्तता करून एक सक्षम आणि स्वायत्त घटनात्मक संस्था अशी प्रतिमा निर्माण करणारा, मतदार आणि निवडणूक प्रक्रिया यांच्यात एक विश्वासाचे नाते निर्माण करणारा कर्तव्यकठोर प्रशासक म्हणून त्यांचे नाव जनतेच्या हृदयात कायम राहील.

आपली प्रतिक्रिया द्या