
नेपाळपासून बांगलादेशापर्यंत सीमेवरील सर्व राष्ट्रे हुकूमशाहीविरोधात लढत आहेत. जनता रस्त्यावर उतरते तेव्हा राज्यकर्ते त्यांच्यावर बंदुका, तोफांचा भडीमार करतात. नेपाळात तेच घडत आहे. बांगलादेश, श्रीलंकेतही तेच झाले. नेपाळची आग लोकशाही रक्षणासाठी, भ्रष्ट शासनाच्या विरोधात आहे. काठमांडूचे रस्ते क्रांतिकारक युवकांच्या रक्ताने लाल झाले आहेत, पण त्यामुळे तेथील जनतेचे प्रश्न सुटतील काय? नेपाळात घडत आहे त्यापासून भारतीय जनतेला बरेच काही शिकण्यासारखे आहे.
भ्रष्टाचार आणि समाज माध्यमांवरील सरकारने घातलेल्या बंदीविरोधात बाजूच्या नेपाळ राष्ट्रात उडालेला भडका गंभीर आहे. हा भडका एवढा भयंकर आहे की, त्याने अखेर तेथील पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांना पदाचा राजीनामा देणे भाग पडले आहे. नेपाळमधील जनउद्रेकाचा वणवा एवढा भडकला आहे की, हिंसक जमावाने उपपंतप्रधान विष्णू प्रसाद पौडेल यांना भररस्त्यात तुडविले. अनेक मंत्र्यांची घरे पेटवून देण्यात आली. माजी पंतप्रधान झालानाथ यांचे निवासस्थानही पेटवून देण्यात आले त्यात त्यांच्या पत्नी राजलक्ष्मी यांचा मृत्यू झाला. नेपाळमध्ये तरुण वर्ग लाखोंच्या संख्येने रस्त्यांवर उतरला आहे. तो संसदेतही घुसला. पंतप्रधान ओली आणि इतर मंत्र्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांच्या गोळीबारात 20 तरुणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळ एकेकाळी जगाच्या पाठीवरील एकमेव हिंदू राष्ट्र होते. आज हे राष्ट्र चीनच्या ताब्यात आहे व नेपाळ सतत भारताविरुद्ध कुरबुरी करत असतो. पंतप्रधान ओली यांनी मागच्या आठवड्यात चीनमधील शांघाई परिषदेत हजेरी लावली. पुतीन वगैरे मोठ्या नेत्यांशी भेटी घेतल्या. ते परत आले तेव्हा जनतेच्या उद्रेकाचा भडका उडाला. हे का घडले? नेपाळ सरकारने 3 सप्टेंबरला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअॅप आणि एक्ससारख्या 26 समाज माध्यमांच्या अॅप्सवर बंदी घातली. सरकारचे म्हणणे आहे की, या कंपन्यांनी नेपाळ सरकारच्या आयटी मंत्रालयाकडे रजिस्ट्रेशन केलेले नाही. त्यामुळे नियमांनुसार कारवाई केली, पण विरोधी पक्षांचे म्हणणे वेगळे आहे. समाज माध्यमांवर सरकारविरोधी ‘हवा’ पसरू लागली. लोकांत असंतोष निर्माण झाला. तो दाबण्यासाठी नेपाळ सरकारने सरळ या समाज माध्यमांवर बंदी घातली, तेव्हा नेपाळची तरुणाई बेबंद होऊन रस्त्यावर उतरली. ‘Gen Z Revolution’ असे या आंदोलनास नाव दिले गेले व तरुणांच्या झुंडीच्या झुंडी बाहेर पडल्या. ‘भ्रष्टाचार बंद करा, सोशल मीडिया नाही’, ‘तरुण विरुद्ध भ्रष्टाचार’ असे
फलक तरुणांच्या हाती
होते. याचा अर्थ नेपाळ सरकारची हुकूमशाही, भ्रष्टाचार, मनमानी याविरुद्धचा हा आक्रोश आहे. नेपाळ हे हिमालयाच्या कुशीतले राष्ट्र आहे. नेपाळात आधी राजेशाही होती. नेपाळच्या राजाला तेथील जनता विष्णूचा अवतार मानत होती. त्या विष्णूच्या अवताराविरुद्ध लोकांनी आंदोलन केले व हटवले. कारण विष्णूच्या राज्यातही भ्रष्टाचार, भूक यांची दलदल माजली होती. तेव्हा लोकांनी कम्युनिस्टांचे राज्य आणले. तेही तसेच निघाले, पण भ्रष्ट सरकारविरुद्ध बंड करून रस्त्यावर येण्याची धमक तेथील जनतेत आहे. भारताच्या सीमेवरचे हे राष्ट्र आहे. सीमेवरील जवळ जवळ प्रत्येक राष्ट्रात बंडाळ्या माजल्या. श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तानात हेच चित्र आहे. श्रीलंका, बांगलादेशातील सरकारे लोकांनी उलथवून टाकली ती भ्रष्टाचार असह्य झाला म्हणून. जनतेच्या मनात स्वाभिमानाची ठिणगी पडली की, त्याचा वणवा पेटायला वेळ लागत नाही. मग जनता बंदुका आणि तोफगाड्यांचीही पर्वा करत नाही. नेपाळमध्ये भूक, भय, भ्रष्टाचाराचे राज्य आहे व ते रोखण्यास तेथील राजकीय व्यवस्था कुचकामी ठरली. संसदेचा लोकांसाठी काहीच फायदा नाही. अशा वेळी देशाला हुकूमशाहीच्या बेड्यांतून सोडवण्यासाठी लोक मरायला तयार होतात. नेपाळमध्ये तेच घडत आहे. हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले व हिंसाचार झाला. नेपाळ सरकारला हा उद्रेक रोखण्यासाठी शेवटी सैन्य उतरवावे लागले. नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला, पण जनतेला पंतप्रधान केपी ओली यांचा राजीनामा हवा होता. नेपाळात सातत्याने सरकारे येत आहेत आणि कोसळत आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार यांसाठी जनता त्रस्त आहे. भारतात मोठ्या प्रमाणात नेपाळची जनता रोजगार कमवीत आहे, पण नेपाळवर पूर्ण नियंत्रण आहे ते चीनचे. नेपाळची अर्थव्यवस्था चीनच्या मदतीवर अवलंबून आहे. एकेकाळी नेपाळ, भूतानसारखी राष्ट्रे भारताचे
विश्वासू मित्र
होती. नेपाळात नवे सरकार आले की, तेथील पंतप्रधान सगळ्यात आधी भारत भेटीवर येत. आज नेपाळचे पंतप्रधान आधी चीन दौऱयावर व नंतर पाकिस्तानात जातात. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे. शेकडो चिनी शिक्षक सध्या नेपाळात आहेत व नेपाळची जनता त्यांच्याकडून चिनी भाषेचे धडे घेत आहे. नेपाळचा रंग आधी भगवा होता. तो आता पूर्णपणे लालभडक झाला व भारत सरकार हा बदल रोखू शकले नाही. भारताने आमच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा घेतला आहे असा कांगावा करण्यापर्यंत नेपाळची मजल गेली ती भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर कमजोर पडल्यामुळेच. एकेकाळी नेपाळचे राज्यकर्ते सांगत, ‘‘आमच्या पाठीशी भारत आहे. भारत आमचा मोठा भाऊ आहे.’’ आज भारताची जागा चीनने घेतली आहे आणि नेपाळमध्ये असंतोषाचा वणवा पेटला असताना भारत कुंपणावर बसला आहे. नेपाळची आग ही भूक, बेरोजगारीतून पडलेली ठिणगी आहे. भारताने यापासून धडा घेतला पाहिजे. भारतातला रोजगार नष्ट झाला आहे. 80 कोटी लोकांना सरकार फुकटात देत असलेल्या पाच-दहा किलो ‘राशन’वर गुजराणा करावा लागत आहे. लोकशाहीचा मुडदा पाडून मोदी-शहा निवडणुका जिंकत आहेत. लोकशाहीचे सर्व स्तंभ कोसळताना दिसत आहेत. धर्म, जात यांचे राजकारण पराकोटीला गेले. हे सर्व विकार देशाला घातक आहेत. नेपाळपासून बांगलादेशापर्यंत सीमेवरील सर्व राष्ट्रे हुकूमशाहीविरोधात लढत आहेत. जनता रस्त्यावर उतरते तेव्हा राज्यकर्ते त्यांच्यावर बंदुका, तोफांचा भडीमार करतात. नेपाळात तेच घडत आहे. बांगलादेश, श्रीलंकेतही तेच झाले. नेपाळची आग लोकशाही रक्षणासाठी, भ्रष्ट शासनाच्या विरोधात आहे. काठमांडूचे रस्ते क्रांतिकारक युवकांच्या रक्ताने लाल झाले आहेत, पण त्यामुळे तेथील जनतेचे प्रश्न सुटतील काय? नेपाळात घडत आहे त्यापासून भारतीय जनतेला बरेच काही शिकण्यासारखे आहे.