आजचा अग्रलेख : गणराया, सांभाळ रे बाबा!

2431

370 कलम हटविण्याचा केंद्र सरकारचा धाडसी निर्णय, त्या प्रश्नावर एकाकी पडलेला पाकिस्तान अशा काही घडामोडी हिंदुस्थानसाठी चांगल्या आहेत. मात्र अर्थव्यवस्थेवर आलेले मंदीचे सावट, उद्योगव्यवसायांसमोर उभे राहिलेले अस्तित्वाचे प्रश्नचिन्ह, बँकांमध्ये आलेली घोटाळ्यांचीतेजी’, महाराष्ट्रात एकाच वेळी उभे राहिलेले ओल्या आणि कोरड्या दुष्काळाचे आव्हानसंकटे आणि आव्हानांची मालिका खूप मोठी आहे. यातून सावरण्याचे बळ सरकारसह सगळ्यांनाच द्या, असे साकडे विघ्नहर्त्याला घालण्याशिवाय सामान्य माणूस काय करू शकतो? गणराया, सांभाळ रे बाबा!

हिंदू जनमानस मुळातच सण-उत्सव आणि सांस्कृतिक परंपरांच्या बाबतीत श्रद्धाळू असते. गणेशोत्सव तर मराठी मनाच्या अपार श्रद्धेचा आणि उत्साहाचा सण. आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवातही याच पारंपरिक चैतन्याचा आणि उत्साहाचा झरा सर्वत्र दिसेल. घरगुती आणि सार्वजनिक गणरायांचे आज आगमन होईल. मुंबईसह महाराष्ट्रात आणि देश व जगात जेथे जेथे मराठी माणूस आहे तेथे तेथे पुढील 10 दिवस गणेशोत्सव साजरा होईल. गणेशोत्सव हे महाराष्ट्राच्या समाज जीवनाचे अविभाज्य अंग आहे. त्यामुळे दरवर्षी जुनी आणि नवीन संकटे, आव्हाने उभी ठाकत असली तरी श्रीगणरायांच्या आगमनात, 10 दिवस त्यांची मनोभावे पूजा, सेवा करण्यात मराठी माणूस कसलीही कसर सोडत नाही. गेल्या महिन्यात सांगली, सातारा, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांतील जनजीवन, शेती, उद्योग-व्यवसाय महापुराच्या तडाख्याने उद्ध्वस्त झाले. येथील हजारो पूरग्रस्तांच्या मदतीसाठी, पुनर्वसनासाठी सरकारशिवाय इतर लाखो हात पुढे सरसावले ही त्या विघ्नहर्त्याचीच कृपा म्हणायला हवी. कोकणवासीयांसाठी तर गणेशोत्सव म्हणजे जीव की प्राण! दरवर्षी मुंबई-ठाण्यातून कोकणात जाणाऱ्या रेल्वे, एस.टी., लक्झरी, खासगी वाहने यांची एकच गर्दी उसळत असते. कोकण रेल्वे आणि एसटी प्रशासन भरपूर

जादा गाड्या

सोडत असले तरी रेल्वे स्थानकांवर उसळणारी प्रचंड गर्दी, रेटारेटी, ट्रव्हल्सवाल्यांकडून अवाच्या सवा दराने तिकीट विक्री, मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे आणि वाहनकोंडीमुळे प्रवासाला होणारी दिरंगाई, रखडणारी कोकण रेल्वे अशी विघ्ने चाकरमान्यांच्या पाचवीला पुजलेली असतात. तरीही तो मजल-दरमजल करीत या सर्व अडथळ्यांना पार करतो आणि गणेशोत्सवासाठी कोकणातील आपल्या घरी पोहोचतो. हिंदू मन आणि श्रीगणराय यांच्यातील श्रद्धेची वीण ही अशी घट्ट आहे. त्या अपार श्रद्धेतूनच तो श्रीगणेशाला त्याच्यावर कोसळलेली संकटे, विघ्ने दूर करण्याची प्रार्थना दरवर्षी करतो. याही वर्षी करेल. महाराष्ट्रात एकीकडे ओला दुष्काळ तर दुसरीकडे कोरडा दुष्काळ असे संकट उद्भवले आहे. पावसाळा उत्तरार्धात आला तरी अनेक धरणे कोरडीच आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी आणि शेती या दोन्ही बाबतीत भविष्यकाळ भीषण असणार आहे. मंदीबाईचा फेरा महाराष्ट्रासह देशावर घोंघावू लागला आहे. उद्योग-व्यवसाय ठप्प होत आहे. आधीच भयंकर असलेली बेरोजगारी आणखी उग्र स्वरूप धारण करीत आहे. बाजारपेठांमधील व्यवहार मंदावले आहेत. अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ झटकण्यासाठी सरकारने दोन बुस्टर डोस जरूर दिले आहेत, तरीही मंदीबाईच्या फेऱ्यातून हिंदुस्थानला बाहेर काढा, असे साकडे विघ्नहर्त्या गणरायांनाच घालावे लागणार आहे. कश्मीरमधील 370 कलम हटविल्यामुळे

बिथरलेले पाकडे

महाराष्ट्रासह देशात दहशतवादी हल्ले, दंगली घडविण्याच्या प्रयत्नात आहेत असे ‘ऍलर्ट’ आमच्याच गुप्तचर संस्थांनी दिले आहेत. बँकांमधील घोटाळे कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे केमिकल कंपनीत झालेल्या भयंकर स्फोटाने 13 कामगारांचा मृत्यू झाला आणि 60-65 जण जखमी झाले आहेत. गणेशोत्सवाच्या आगमनालाच या कुटुंबांवर झालेला हा आघात भयंकर आहे. 370 कलम हटविण्याचा केंद्र सरकारचा धाडसी निर्णय, त्या प्रश्नावर जागतिक पातळीवर एकाकी पडलेला पाकिस्तान, अमेरिकेबरोबरच्या व्यापार युद्धात अडकलेला चीन अशा काही घडामोडी हिंदुस्थानसाठी नक्कीच चांगल्या आहेत. मात्र आधीच मरगळलेल्या अर्थव्यवस्थेवर आलेले मंदीचे सावट, उद्योग-व्यवसायांसमोर उभे राहिलेले अस्तित्वाचे प्रश्नचिन्ह, रोजगार निर्मिती होण्याऐवजी वाढणारी बेरोजगारी, बँकांमध्ये आलेली घोटाळ्यांची ‘तेजी’, महाराष्ट्रासमोर उभे राहिलेले ओल्या आणि कोरड्या दुष्काळाचे आव्हान या अस्मानी-सुलतानीच्या तावडीत सापडलेला बळीराजा… संकटे आणि आव्हानांची मालिका खूप मोठी आहे. यातून देश आणि महाराष्ट्राला सावरण्याचे बळ सरकारसह सगळ्यांनाच द्या, असे साकडे विघ्नहर्त्याला घालण्याशिवाय सामान्य माणूस काय करू शकतो? गणराया, सांभाळ रे बाबा!

आपली प्रतिक्रिया द्या