सामना अग्रलेख – गणराय निघाले…!

गेले अकरा दिवस भक्ती आणि श्रद्धेच्या गणेशोत्सवाने महाराष्ट्रावर गारुड केले होते. आपल्या भक्तांचा पाहुणचार घेऊन श्री गणराय आज परतीच्या प्रवासाला निघतील. ज्या भक्तिभावाने आगमन, त्याच भक्तिभावाने आणि पुढील वर्षी लवकर येण्याचे वचन घेत बाप्पांना निरोप, हेच तर गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. आज श्री गणराय आपल्या परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. पुढील वर्षी लवकर येण्याचे वचन त्यांनी दिलेच आहे, पण त्याचबरोबर जनहिताचे निर्णय घेण्याची सुबुद्धी त्यांनी जाता जाता राज्यकर्त्यांना द्यावी, इतकेच!

गेले अकरा दिवस घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात विराजमान असलेले श्री गणराय आज सर्व भाविकांचा निरोप घेतील. 27 ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाची सर्वत्र अत्यंत श्रद्धापूर्वक आणि परंपरागत पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात प्रतिष्ठापना झाली होती. वाजतगाजत, गुलालाची उधळण करीत गणरायांचे आगमन झाले होते. आज अनंत चतुर्दशीला त्याच परंपरागत पद्धतीने, उत्साहात, ढोल-ताशांच्या गजरात आणि वाजतगाजत गणरायांना निरोप दिला जाईल. गणेशोत्सवाचे अकरा दिवस म्हणजे महाराष्ट्रालाच नाही, तर जेथे जेथे मराठी माणूस, कुटुंबे आहेत तेथे तेथे एक भारावून टाकणारे मंगलमय वातावरण असते. मांगल्याच्या या उत्सवात सर्वच भाविक भक्तीमध्ये लीन होत असतात. गेल्या काही वर्षांत अन्य समाजघटकही या उत्सवात उत्साह आणि श्रद्धेने सहभागी होऊ लागली आहे. गणेशोत्सवाचे हे वैशिष्ट्यच आहे. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश काळात स्वातंत्र्यासाठी भारतीयांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. या सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रभाव आणि श्रद्धा भारतीय मनांत एवढी रुजली की स्वातंत्र्यानंतरही हा उत्सव त्याच पद्धतीने सुरू राहिला. कालानुरूप त्यात बदल नक्कीच होत गेले. त्यातील काही गोष्टींवरून

वाद आणि चर्चा

झडल्या. पर्यावरणापासून डीजेच्या खणखणाटापर्यंत अनेक मुद्द्यांवर प्रत्येक गणेशोत्सवाच्या वेळी टीका-टिपण्या होतच असतात. प्रामुख्याने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बदललेल्या स्वरूपासंदर्भात काही मंडळी वेगवेगळी मते मांडत असतात. गणेशमूर्तीच्या उंचीपासून ते ‘पीओपी’च्या मूर्तीवरील बंदीपर्यंत, शाडूच्या मूर्तीच्या आग्रहापासून पर्यावरणपूरक वगैरे गणेशमूर्तीपर्यंत बरेच मुद्दे दरवर्षी मांडले जातात. सार्वजनिक गणेशोत्सवाचे पूर्वीचे स्वरूप आता राहिलेले नाही. पूर्वीसारखे जनप्रबोधनाचे, ज्ञानदानाचे कार्यक्रम, व्याख्यानमाला वगैरे आता होत नाहीत असे या आक्षेपांचे स्वरूप असते. काही अंशी त्यात तथ्य असले तरी काळानुसार जर प्रत्येक गोष्टीत बदल झाला असेल तर गणेशोत्सवाच्या स्वरूपातही तो होणे अपेक्षित आहे. आज व्याख्यानमाला वगैरे होत नसल्या तरी वेगवेगळ्या देखाव्यांच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करण्याचे काम गणेशोत्सव मंडळे करीतच असतात. अनेक मोठी मंडळे धर्मादाय स्वरूपाची कार्ये आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या गरजूंना आर्थिक – वैद्यकीय मदतीसारखे सामाजिक उपक्रमही राबवीत असतात, हे दुर्लक्षून कसे चालेल? एक खरे की, मंडळांनीही उत्सवातील अति झगमगाट, उथळपणा याबाबत आणि उत्साहाला अतिरेकाचे गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. अलीकडील वर्षांत याही बाबतीत अनेक

सकारात्मक बदल

घडले आहेत आणि आवश्यक सुधारणा करीत गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा पिढी दर पिढी कुठलाही अडथळा न येता सुरू आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने हा उत्सव सुरू केला तो सामाजिक एकसूत्रीपणाचा हेतू आजही गणेशोत्सवात साध्य होताना दिसतो. त्याला काही ठिकाणी इव्हेंटचे, झगमगाटाचे, अनावश्यक देखाव्याचे स्वरूप नक्कीच आले आहे. परंतु या उत्सवावरील श्रद्धा, भक्ती तसूभरही कमी झालेली नाही. या वर्षीदेखील गेले अकरा दिवस भक्ती आणि श्रद्धेच्या गणेशोत्सवाने महाराष्ट्रावर गारुड केले होते. आपल्या भक्तांचा पाहुणचार घेऊन श्री गणराय आज परतीच्या प्रवासाला निघतील. गणराय हे जलतत्त्वाचे अधिपती मानले जातात. त्यामुळे त्यांचे पाण्यात विसर्जन केले जाते. ज्या भक्तिभावाने आगमन, त्याच भक्तिभावाने आणि पुढील वर्षी लवकर येण्याचे वचन घेत बाप्पांना निरोप, हेच तर गणेशोत्सवाचे वैशिष्टय़ आहे. आज श्री गणराय आपल्या परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. पुढील वर्षी लवकर येण्याचे वचन त्यांनी दिलेच आहे, पण त्याचबरोबर जनहिताचे निर्णय घेण्याची सुबुद्धी त्यांनी जाता जाता राज्यकर्त्यांना द्यावी, इतकेच!