आजचा अग्रलेख : गोव्यात बाजारबुणगे!

गोव्यात आज राजकीय नेतृत्व कोणत्याही पक्षात उरले नसून फक्त बाजारबुणगे राहिले आहेत. गोव्यात सगळेच बिघडले आहे. पर्रीकर ठणठणीत होते तेव्हा आकाशातून चांदण्यांची बरसात होत होती व सर्वकाही आलबेल होते अशातला भाग नव्हता, पण सत्ता व धाकदपटशाच्या बळावर ते रेटून नेत होते.  गोव्यात मुख्यमंत्री बदलावा अशी स्थिती आहे, पण भाजपला पर्रीकरांच्या नावाने वेळ काढून लोकसभा निवडणुकीपर्यंत ‘रेटारेटी’ करायची आहे. ‘मढ्यावरचे लोणी खाणे’ म्हणजे काय हे गोव्यातील आजचे राजकारण पाहता समजून येईल. पर्रीकरांनी खडखडीत बरे होऊन गोव्यात परतावे हाच त्यावरचा उपाय. तसे झाले तर आनंदच आहे 

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहतील, नेतृत्वबदल होणार नाही असे आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. पर्रीकर हे गोव्यात नाहीत. दिल्लीतील इस्पितळात ते कर्करोगावर उपचार घेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत गोव्याचे प्रशासन हे ढेपाळले आहे. मुख्यमंत्री व त्यांचे कॅबिनेट पक्षाची सोय म्हणून काम करीत नसते, तर राज्याचे गाडे पुढे नेण्यासाठी काम करीत असते. पर्रीकर यांच्या आजारपणामुळे व गैरहजेरीमुळे गोव्यात एकप्रकारे अनागोंदीचे राज्य सुरू झाले आहे. पर्रीकर यांना बदलायचे तर मग त्यांच्या जागी बसवायचे कुणाला? कारण मुख्यमंत्रीपदी बसवता येईल असा एकही लायकीचा माणूस गोव्याच्या भाजपात नाही. त्यामुळे आजारी व थकलेल्या पर्रीकरांच्याच पादुका मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर ठेवून सरकार चालवा असा संदेश अमित शहा यांनी दिला आहे. हा निर्णय म्हणजे गोव्याच्या जनतेवर आणि खुद्द पर्रीकर यांच्यावर अन्याय आहे. पर्रीकरांवर आता मुख्यमंत्रीपद लादणे हे निर्घृण व अमानुष राजकारण आहे. पर्रीकर यांचा स्वभाव स्वस्थ बसण्यातला नाही, त्यांना विश्रांतीची व उपचारांची गरज आहे, पण दिल्लीच्या इस्पितळातील खाटेवरूनही ते गोव्यात लक्ष ठेवतात, फायलींबाबत विचारणा करतात, नेतृत्वबदलाच्या हालचाली करणार्‍यांशी संवाद साधतात. हा ताणतणाव त्यांच्या सध्याच्या नाजूक प्रकृतीस झेपणारा नाही, पण भाजप हाय कमांडला हे समजवायचे कोणी? त्यांना पर्रीकरांच्या प्रकृतीपेक्षा

राज्य गमावण्याची भीती

आहे. भाजपच्या विजयी नकाशावरील गोवा टिकला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे. तिकडे गोव्यातील काँग्रेसच्या गोटातही हालचाली सुरू आहेत. अर्थात त्या हालचाली नसून त्यास ‘वळवळ’ म्हणता येईल. मगो पक्षाचे नेते आणि पर्रीकर मंत्रिमंडळातील सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर तसेच गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते आणि मंत्री विजय सरदेसाई यांनी ‘बेडूकउडी’ मारल्याशिवाय काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, पण सरदेसाई व ढवळीकर या दोघांनाही मुख्यमंत्री व्हायचे आहे. पर्रीकर यांना बदलले तर त्यांच्या जागी आपलाच नंबर लागेल असे या दोघांना वाटते. त्यामुळे यापैकी एकाला पर्रीकरांच्या जागी बसवले तर दुसरा लगेच तीन आमदारांसह काँग्रेसच्या तंबूत शिरेल. पर्रीकरांना संभाव्य पर्याय म्हणून श्रीपाद नाईक व विनय तेंडुलकर ही नावे भाजपात आहेत. श्रीपाद नाईक हा बहुजन समाजाचा व भाजपचा गोव्यातील मूळ चेहरा आहे, पण पर्रीकर आज त्यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत व तेंडुलकर हे काय प्रकरण आहे ते गोव्यातील बच्चा बच्चा जाणतो. पर्रीकरांशिवाय त्यांच्या मंत्रिमंडळातील नागरी विकासमंत्री फ्रान्सिस डिसुझा आणि ऊर्जामंत्री पांडुरंग मडकईकर हेदेखील आजारी आहेत. त्यांच्याही बाबतीत कुठलाच निर्णय होत नव्हता. अखेर

डिसुझा आणि मडकईकर

यांना सोमवारी मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. त्यांच्या जागी भाजपचे नीलेश काब्राल आणि मिलिंद नाईक यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. तेव्हा हे दोन मंत्री आता आजारपणाची विश्रांती घेतील, पण गोव्यात आणखी किती काळ ‘आजारी मुख्यमंत्री’ ठेवायचा याचाही निर्णय भाजप श्रेष्ठींना घ्यावाच लागणार आहे. वस्तुस्थिती ही आहे की, गोव्यात आज राजकीय नेतृत्व कोणत्याही पक्षात उरले नसून फक्त बाजारबुणगे राहिले आहेत. गोव्यात सगळेच बिघडले आहे. पाऊसपाण्यापासून उद्योग-व्यवसाय, विकास अशा सर्वच मुद्यांवर संकटे घोंगावत आहेत. सत्ताधारी पक्षाचे मंत्री व समर्थक आमदार अनैतिक व्यवहारात गुंतले आहेत. पर्रीकर ठणठणीत होते तेव्हा आकाशातून चांदण्यांची बरसात होत होती व सर्वकाही आलबेल होते अशातला भाग नव्हता, पण सत्ता व धाकदपटशाच्या बळावर ते रेटून नेत होते. त्यांचे दुखणे आता वाढले व दिल्लीत ते उपचार घेत आहेत. गोव्यात मुख्यमंत्री बदलावा अशी स्थिती आहे, पण भाजपला पर्रीकरांच्या नावाने वेळ काढून लोकसभा निवडणुकीपर्यंत ‘रेटारेटी’ करायची आहे. देवाचे व चर्चचे राज्य जिथे आहे तिथे हा राजकीय अनाचार सुरू आहे. ‘मढ्यावरचे लोणी खाणे’ म्हणजे काय हे गोव्यातील आजचे राजकारण पाहता समजून येईल. पर्रीकरांनी खडखडीत बरे होऊन गोव्यात परतावे हाच त्यावरचा उपाय. तसे झाले तर आनंदच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या