सामना अग्रलेख – दारूबंदीचे ‘गुजरात मॉडेल’!

दारूविक्रीच्या साखळीत गुंतलेल्या सगळय़ांनाच मालामाल करणाऱया ‘नेटवर्क’मध्ये मोठे ‘अर्थकारण’ दडले आहे. त्यामुळेच गुजरातची दारूबंदी केवळ कागदापुरतीच राहिली. गुजरातच्या तथाकथित स्वच्छ प्रशासनाचे गोडवे देशवासीयांना गेली काही वर्षे नियमित ऐकवले जातात. ऊठसूट ‘गुजरात मॉडेल’चे दाखले सर्व व्यासपीठांवरून दिले जातात. मात्र, बोटादच्या विषारी दारूकांडाने दारूबंदीच्या ‘गुजरात मॉडेल’चा बुरखा पुरता फाटला आहे. नुकत्याच झालेल्या पावसात अहमदाबादसह गळय़ापर्यंत बुडालेल्या शहरांच्या छायाचित्रांनी ‘गुजरात मॉडेल’ ही संकल्पना किती भ्रामक व भंपक आहे, हे साऱया जगाला दाखवले. आता दारूबंदीतील दारूबळींमुळे ‘गुजरात मॉडेल’ची उरलीसुरली अब्रूही चव्हाटय़ावर आली आहे!

कडक दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये हे काय घडते आहे? विषारी दारू प्यायल्याने गेल्या दोन दिवसांत गुजरातमध्ये 29 जणांचा तडफडून मृत्यू झाला आहे. विषारी दारू प्राशन करणाऱया आणखी 50 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे दारूकांडाच्या या बळींचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुजरात म्हणजे आदर्श, गुजरात म्हणजे सारे काही आलबेल, गुजरात म्हणजे स्वच्छ प्रशासन अशा कंडय़ा पिकवून देशाला संभ्रमित करणाऱया ‘बनवेगिरी’चा बुरखा फाडणारी घटना म्हणून या दारूकांडाकडे बघावे लागेल. गुजरातच्या तथाकथित सुशासनाचा फुगा फोडणारी ही घटना गुजरातच्या बोटाद जिह्यातील आहे. बोटादच्या बारवळा तालुक्यातील रोजीद गावात रविवार, 24 जुलैच्या रात्री गावातील काही व्यक्तींनी दारू प्राशन केली आणि सोमवारी सकाळी सर्वांचीच तब्येत बिघडली. पोटदुखी, उलटय़ांचा त्रास व असह्य वेदनांनी तडफड सुरू झाली तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचताच आधी दोन जणांचा मृत्यू झाला, त्यापाठोपाठ काही तासांनी 10 जण उपचार सुरू असताना मृत्युमुखी पडले. मंगळवारी तर मृतांची संख्या 29 वर पोहोचली. दारू पिणाऱयांपैकी आणखी 50 जणांची वेगवेगळय़ा रुग्णालयांत मृत्यूशी झुंज सुरू आहे. एकटय़ा रोजीद गावच्याच ग्रामस्थांनी ही विषारी दारू प्राशन केली असे नाही, नजीकच्या आणखी चार गावांतील लोकही या विषारी दारूकांडाचे बळी ठरले. याचा अर्थ स्पष्ट आहे. या रोजीद गावात गावठी दारू हमखास मिळते व तेथील अड्डय़ावर

दारूची खुलेआम विक्री

होते, असा कुलौकिक पंचक्रोशीत पसरलेला असणार. त्यामुळेच आजूबाजूच्या गावचे लोकही या दारूकांडाच्या तडाख्यात सापडले. बोटाद जिह्यातील या गावात इतक्या मोठय़ा संख्येने लोक दारू पिण्यासाठी जमत असताना त्या गावच्या गावकऱयांपासून पोलीस व जिल्हा प्रशासनाला याची खबरबात कशी लागली नाही? या घटनेनंतर गुजरात पोलिसांनी दारू माफियांची धरपकड सुरू केली आहे. बोटादच्या दारूकांडातील मुख्य आरोपीसह अनेकांना अटक करण्यात आली आहे, पण या अटका-सटकांनी ते गेलेले जीव परत येणार आहेत काय? गावठी दारूत मिथेनॉल हे विषारी रसायन मिसळले जाते, त्याचा पुरवठा अहमदाबादमधून होतो, अशी कबुली दारूकांडातील मुख्य आरोपीने दिली आहे. म्हणजेच छोटय़ा गावांपासून अहमदाबादपर्यंत बेकायदा दारूनिर्मिती व विक्रीचे नेटवर्क पसरल्याचाच हा पुरावा आहे. पोलीस, उत्पादन शुल्क विभाग, प्रशासनातील अधिकारी, राजकारणी व दारू माफिया यांची हातमिळवणी इतकी भक्कम असावी की, राज्याच्या कानाकोपऱयांत दारू तस्करीचे काम सुखेनैव सुरू असावे. 1960 पासून म्हणजे गुजरात राज्याच्या स्थापनेपासूनच गुजरातमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, 62 वर्षांच्या या दारूबंदीत दारूकामाची कुठलीही गैरसोय वा ददात गुजरातला कधीच भासली नाही. महात्मा गांधी मूळ गुजरातचे आणि दारूला गांधीजींचा असलेला प्रखर विरोध यामुळे गांधींचे राज्य असलेल्या गुजरातमध्ये कायमची दारूबंदी असावी

असा उदात्त हेतू

यामागे होता. मात्र, दारू माफिया, प्रशासन आणि सरकारमधील त्यांचे राजकीय संरक्षक या साऱयांनी मिळून दारूबंदीला हरताळ फासला. कारवाईपुरते दारूचे साठे जप्त केल्याच्या, दारू तस्करांना पकडल्याच्या बातम्या गुजराती मीडियात नेहमीच झळकत असतात. दारू तस्करीचे प्रमाण वाढल्यानंतर 2017 मध्ये गुजरात सरकारने दारूबंदीचा आधीच कागदावर असलेला कायदा आणखी कठोर केला. नव्या कायद्यानुसार अवैध मार्गाने दारूविक्री करणाऱया व्यक्तीस 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली. मात्र, त्यानंतरही गुजरातमध्ये देशी-विदेशी सर्व प्रकारची दारू राजरोसपणे पुरवली जाते, विकली जाते. दारूविक्रीच्या साखळीत गुंतलेल्या सगळय़ांनाच मालामाल करणाऱया या ‘नेटवर्क’मध्ये मोठे ‘अर्थकारण’ दडले आहे. त्यामुळेच गुजरातची दारूबंदी केवळ कागदापुरतीच राहिली. गुजरातच्या तथाकथित स्वच्छ प्रशासनाचे गोडवे देशवासीयांना गेली काही वर्षे नियमित ऐकवले जातात. ऊठसूट ‘गुजरात मॉडेल’चे दाखले सर्व व्यासपीठांवरून दिले जातात. मात्र, बोटादच्या विषारी दारूकांडाने दारूबंदीच्या ‘गुजरात मॉडेल’चा बुरखा पुरता फाटला आहे. नुकत्याच झालेल्या पावसात अहमदाबादसह गळय़ापर्यंत बुडालेल्या शहरांच्या छायाचित्रांनी ‘गुजरात मॉडेल’ ही संकल्पना किती भ्रामक व भंपक आहे, हे साऱया जगाला दाखवले. आता दारूबंदीतील दारूबळींमुळे ‘गुजरात मॉडेल’ची उरलीसुरली अब्रूही चव्हाटय़ावर आली आहे!