सामना अग्रलेख – पावसाचे ‘कम बॅक’  

एरवी कोकण, मुंबईला पावसाची प्रतीक्षा क्वचितच करावी लागते. आता पावसाने दमदार ‘कम बॅक’ केले आहे. फक्त हे ‘कम बॅक’ जुलैसारखे ठरू नये. जुलैची कसर वरुणराजाने ऑगस्ट महिन्यात भरून काढावी. पावसाच्या दमदार ‘कम बॅक’ने काही भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे हे खरे, पण त्याबाबत राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन डोळय़ांत तेल घालून सतर्क आणि सज्ज आहे. हा पाऊस पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सोडवेल हीच अपेक्षा आहे.

मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि कोकणमध्ये सध्या पावसाचे धुमशान सुरू आहे. कोल्हापूर आणि सांगली जिह्यालाही महापुराचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांत मुंबईसह मध्य महाराष्ट्र, गोवा, कोकण, गुजरात आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईमध्ये तर मंगळवार आणि बुधवार हे दोन्ही दिवस सलग पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अर्थात मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणचे म्हणाल तर अशा धुवांधार पावसाची आवश्यकता होतीच. कारण जुलै महिन्याच्या सुरुवातीला दिलेल्या दमदार हजेरीनंतर मुंबई-ठाण्याकडे पावसाने तसे दुर्लक्षच केले होते. गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक आदी जिल्हय़ांत धुवांधार पाऊस झाला होता. यंदादेखील हवामान खात्याने जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र मुंबई, ठाणे वगळता जून-जुलैमध्ये राज्यात पावसाची स्थिती समाधानकारक राहिली. कधी नव्हे ते मुंबईवर जुलै महिन्यातच पाणीकपातीचे ढग गोळा झाले होते. वीस टक्के पाणीकपातीचे सूतोवाच करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. मात्र ऑगस्ट सुरू होताच मंगळवारी आणि बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकणात पावसाने

धुवांधार बॅटिंग

केली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस होत आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. कारण काहीही असले तरी कोकण, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईची मुसळधार पर्जन्यवृष्टीची गरज काही प्रमाणात का होईना, पूर्ण झाली हे महत्त्वाचे. कोकणात अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड आणि इतर काही गावांत पुराचे पाणी सखल भागांत शिरले आहे. राजापूर तालुक्यातही अशीच स्थिती आहे. खेड येथे जगबुडी आणि नारिंगी या नद्यांना पूर आला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिह्यातही पावसाचा कहर सुरू आहे. कणकवली, खारेपाटण, बांदा आणि कुडाळ तसेच रत्नागिरी येथे पुराचे पाणी बाजारपेठा आणि रहिवाशी भागांमध्ये शिरले आहे. पालघर जिल्ह्यात डहाणू, जव्हार, विक्रमगड या तालुक्यांमध्येही मुसळधार पावसामुळे ‘एनडीआरएफ’ची एक टीम बोलावण्याची वेळ आली आहे. ठाणे जिल्ह्यातही अशा पावसाची गरज होतीच. मुंबईत नेहमीच्या काही ठिकाणी काही प्रमाणात पाणी साचले म्हणून नेहमीच्या बोंबल्यांनी बोंब ठोकली. त्यांना साचलेले पाणी दिसते, पण ते साचण्यासाठी मुंबईची भौगोलिक आणि इतर स्थिती कारणीभूत आहे ते दिसत नाही. महापालिका प्रशासनाचे परिस्थिती तातडीने

पूर्ववत करण्याचे प्रयत्न

दिसत नाहीत. मुंबईत अशा पावसाने सामान्य जनतेचे जीवन काही प्रमाणात विस्कळीत होते. मात्र मुंबई-ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे जलाशय जोपर्यंत ओसंडून वाहणार नाहीत तोपर्यंत मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ वगैरे महानगरांचे पाणीसंकट दूर होणार नाही हेदेखील खरे. यंदा राज्यात मान्सूनचे आगमन चांगले झाले. उर्वरित महाराष्ट्रात या वर्षी जूनपासून समाधानकारक पाऊस झाला आहे. अगदी मराठवाडय़ासारख्या वर्षानुवर्षे दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाईने होरपळलेल्या भागांतही चांगला पाऊस झाला. तेथील धरणे अद्यापि पूर्ण भरली नसली तरी खरिपाची पिके चांगली झाली आहेत. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाची स्थिती चांगली आहे. काळजी उत्पन्न झाली होती ती मुंबई, ठाणे, रायगड, पालघर अशा एरवी पावसाची चिंता नसलेल्या भागांत. पण सध्या सुरू असलेल्या पावसाने ही चिंता काही प्रमाणात तरी दूर झाली असे म्हणता येईल. एरवी कोकण, मुंबईला पावसाची प्रतीक्षा क्वचितच करावी लागते. आता पावसाने दमदार ‘कम बॅक’ केले आहे. फक्त हे ‘कम बॅक’ जुलैसारखे ठरू नये. जुलैची कसर वरुणराजाने ऑगस्ट महिन्यात भरून काढावी. पावसाच्या दमदार ‘कम बॅक’ने काही भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे हे खरे, पण त्याबाबत राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन डोळ्यांत तेल घालून सतर्क आणि सज्ज आहे. हा पाऊस पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सोडवेल हीच अपेक्षा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या