सामना अग्रलेख – दुष्टचक्राचा फेरा

‘गुलाब’ चक्रीवादळ प्रत्यक्ष महाराष्ट्रावर धडकणार नसले तरी त्याचा परिणाम म्हणून अतिमुसळधार पावसाचा ऍलर्ट महाराष्ट्राला देण्यात आला आहे. चक्रीवादळ आणि त्यामुळे होणारी अतिवृष्टी असे हे दुष्टचक्र आहे आणि महाराष्ट्र या दुष्टचक्राच्या फेऱयात सापडला आहे. सप्टेंबर महिन्यात तर आधीच जास्तीच्या पावसाचा ‘कहर’, त्यात ‘गुलाब’ चक्रीवादळाने धाडलेल्या पावसाची ‘लहर’ अशी स्थिती आहे. त्याचा सर्वाधिक तडाखा अर्थातच बळीराजालाच बसला आहे. राज्य सरकारचे या सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष आहेच आणि या अस्मानी संकटाची सरकारला पूर्ण जाणीव आहे. मात्र निसर्गावर नियंत्रण कसे मिळवायचे, हा प्रश्न आहेच. तरीही वादळ आणि पाऊस या दुष्टचक्राच्या फेऱयातून बळीराजाला बाहेर काढावेच लागेल!

पर्जन्यराजाने या वर्षी महाराष्ट्राच्या पारडय़ात भरभरून दान टाकले आहे. बहुतेक भागांमध्ये सिंचन प्रकल्प भरून वाहू लागले आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून राज्याच्या अनेक जिह्यांमध्ये पावसाने जणू ठाणच मांडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असली तरी खरिपाच्या पिकांवर संक्रांत आली आहे. त्यात आता आणखी एका चक्रीवादळाच्या संकटाची भर पडली आहे. ‘गुलाब’ नावाचे हे चक्रीवादळ महाराष्ट्रावर धडकणार नसून पूर्व किनारपट्टीवरील आंध्र आणि ओडिशा राज्यांना तडाखा देणार आहे. मात्र त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या बहुतेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यवृष्टीचे इशारे-नगारे हवामान खात्याने वाजविले आहेत. मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक जिह्यांत ‘गुलाबी’ पावसाची सुरुवातही झाली आहे. त्यामुळे ‘‘आधीच जास्तीचा पाऊस, त्यात ‘गुलाबी’ पावसाची भर’’ अशी राज्यातील शेतकऱयांची अवस्था झाली आहे. म्हणजे ‘घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे’ अशी ही विचित्र परिस्थिती आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली म्हणून शेतकरी चिंताक्रांत होता. सप्टेंबरमध्ये पावसाने हा ‘बॅकलॉग’ तर भरून काढलाच; पण

एवढा जोर धरला

आहे की, ‘‘आता थांब आणि आहे ते पीक वाचू दे’’ अशी प्रार्थना वरुणराजाकडे करण्याची वेळ शेतकऱयावर आली आहे. चालू महिन्यातील धुवांधार पावसाने राज्याच्या सर्वच भागांतील जलाशय जवळजवळ पूर्ण भरले. उत्तर महाराष्ट्र-मराठवाडय़ासारख्या दुष्काळी भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला, परंतु ही संततधार मागील 10-15 दिवसांपासून थांबतच नसल्याने खरिपाची उभी पिके आडवी झाली आहेत. त्याआधी अनेक ठिकाणी महापूर आणि ढगफुटी झाली. त्यामुळे विदर्भ, मराठवाडय़ापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत शेतातील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले. ढगफुटीमुळे शेतजमिनीचीही नासधूस केली. विदर्भात धानपीक धोक्यात आले आहे. रोगांचा प्रादुर्भावही वाढला आहे. सोयाबीनच्या शेंगा काळय़ा पडल्या आहेत. कापसाची बोंडे सडण्याचा धोका आहे. त्याशिवाय ज्वारी, तूर, मूग, फळबागांचेही नुकसान झाले आहे. हे सगळे सुरू असताना ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे आलेल्या मुसळधार पावसाचा फटका उरल्यासुरल्या पिकांनाही बसणार का, अशी भीती आहे. मागील दोन वर्षांपासून

महाराष्ट्रावर

चक्रीवादळे, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी अशी एकामागोमाग एक संकटे कोसळत आहेत. यावर्षी मे महिन्यात ‘यास’ आणि ‘तौक्ते’ या चक्रीवादळांचे तडाखे लागोपाठ बसले. त्याआधी ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. आता ‘गुलाब’ चक्रीवादळ प्रत्यक्ष महाराष्ट्रावर धडकणार नसले तरी त्याचा परिणाम म्हणून मुसळधार, अतिमुसळधार पावसाचा ऍलर्ट संपूर्ण महाराष्ट्राला देण्यात आला आहे. म्हणजे चक्रीवादळ आणि त्यामुळे होणारी अतिवृष्टी असे हे दुष्टचक्र आहे आणि मागील दोन-तीन वर्षांपासून महाराष्ट्र या दुष्टचक्राच्या फेऱयात सापडला आहे. सप्टेंबर महिन्यात तर आधीच जास्तीच्या पावसाचा ‘कहर’, त्यात ‘गुलाब’ चक्रीवादळाने धाडलेल्या पावसाची ‘लहर’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा सर्वाधिक तडाखा अर्थातच बळीराजालाच बसला आहे. राज्य सरकारचे या सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष आहेच आणि या अस्मानी संकटाची सरकारला पूर्ण जाणीव आहे. मात्र निसर्गावर नियंत्रण कसे मिळवायचे, हा प्रश्न आहेच. तरीही वादळ आणि पाऊस या दुष्टचक्राच्या फेऱयातून बळीराजाला बाहेर काढावेच लागेल!

आपली प्रतिक्रिया द्या