सामना अग्रलेख – दमलेल्या रुपयाची कहाणी

देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनच्या दिशेने धावत असल्याचे दावे पंतप्रधान मोदी आणि त्यांचा पक्ष उठताबसता करीत असतो. मग बेरोजगारी का वाढते आहे? रुपयाचे गडगडणे का थांबलेले नाही? निर्मिती क्षेत्राचा निर्देशांक का घसरला आहे? कृषी मालाबाबत कधी आयातबंदी तर कधी निर्यातबंदी अशा कोलांटउड्या तुम्हाला का माराव्या लागत आहेत? पंतप्रधान मोदी आणि त्यांचा पक्ष विकासाच्या वेगवेगळ्या ‘कथा’ सांगतांना अजिबात थकत नसले तरी रुपया मात्र दमला आहे. सध्याची आपली अर्थव्यवस्था ही विकासाची नव्हे, तर मोदी राजवटीतील ‘दमलेल्या’ रुपयाची कहाणी आहे. रुपयाने गाठलेल्या विक्रमी निचांकाचा तोच अर्थ आहे.

आपल्या कार्यकाळात देशाने कशी प्रगतीची झेप घेतली, कोरोनासारख्या संकटावर मात करून देश विकासाची कशी नवनवीन शिखरे गाठत आहे, असे दावे पंतप्रधान मोदी नेहमीच करीत असतात. मात्र या सर्व दाव्यांना वेळोवेळी टाचणी लागत असते आणि पंतप्रधानांनी सोडलेले फुगे हवेतच फुटत असतात. आताही रुपयाने गाठलेल्या नव्या निचांकाने मोदी यांच्या विकासाच्या दाव्याची पोलखोल केली आहे. गेल्या काही वर्षांत डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरणच सुरू आहे. आता तर डॉलरमागे तो आणखी 9 पैशांनी घसरला. त्यामुळे इतिहासात प्रथमच रुपयाने 83.35 ही निचांकी पातळी गाठली आहे. मोदी सरकार म्हणते त्याप्रमाणे जर देशाचा आर्थिक विकास वेगाने होत असेल तर मग रुपयाची घसरण थांबत का नाही? रुपयाचे मूल्य वाढणे सोडून द्या, परंतु त्याची घसरगुंडी तरी थांबवा! ‘पाच ट्रिलियन इकॉनॉमी’च्या बाता करणाऱयांना रुपयाची घसरण का थांबविता आलेली नाही? नेहमीप्रमाणे त्यासाठी भांडवली बाजारातील आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे बोट दाखविले जाईल. अमेरिकेसह सर्वच देशांच्या चलनांचे कसे अवमूल्यन होत आहे याचे दाखले दिले जातील. बरे, रुपयाची घसरण बाजूला ठेवली तरी देशातील निर्मिती क्षेत्राचा निर्देशांकदेखील

निचांकी स्तरावर

पोहोचला आहे. आता त्यालाही जबाबदार विरोधी पक्ष आणि जागतिक घडामोडींना धरायचे का? एस अॅण्ड पी ग्लोबल इंडिया या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात हे ‘सत्य’ उघड झाले आहे. ऑक्टोबरमध्ये ‘पीएमआय’ निर्देशांक 55.5 एवढा नोंदविण्यात आला. जो मागील नऊ महिन्यांतील निचांक आहे. पडत्या रुपयाप्रमाणेच हा निर्देशांकदेखील घसरतच आहे. सप्टेंबरमध्ये तो 57.5 इतका होता. आता तो दोन अंकांनी खाली आला आहे. तिकडे देशातील बेरोजगारीनेही गेल्या दोन वर्षांतील उच्चांक गाठला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमी या संस्थेच्या म्हणण्यानुसार देशातील बेरोजगारीचा दर दोन वर्षांतील उच्चांकी म्हणजे 10.9 टक्के झाला आहे. एकीकडे पंतप्रधान मोदी ठिकठिकाणी रोजगार मेळावे घेतात. त्यात तरुणांना नियुक्ती पत्रे देऊन रोजगारनिर्मिती कशी वेगात सुरू आहे, अशी हवा निर्माण करतात. चालू वर्षाखेर देशातील 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगून आतापर्यंत पाच लाख तरुणांना नियुक्ती पत्रे दिल्याचे फुगे सोडतात. रोजगाराची स्थिती जर एवढी चांगली आहे तर मग बेरोजगारीचा दर दोन वर्षांतील उच्चांक गाठतोच कसा? देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनच्या दिशेने धावत असल्याचे दावे पंतप्रधान मोदी आणि त्यांचा पक्ष

उठताबसता

करीत असतो. मग बेरोजगारी का वाढते आहे? रुपयाचे गडगडणे का थांबलेले नाही? निर्मिती क्षेत्राचा निर्देशांक का घसरला आहे? तुमचे ते ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्ट अप’ वगैरे हवेत सोडलेले फुगे कुठे गायब झाले? कृषी क्षेत्राची पडझड का थांबविता आलेली नाही? कृषी मालाबाबत कधी आयातबंदी तर कधी निर्यातबंदी अशा कोलांटउडय़ा तुम्हाला का माराव्या लागत आहेत? तरी पंतप्रधान मोदी छत्तीसगडमधील एका प्रचारसभेत जेव्हा म्हणतात की, ‘जेथे काँग्रेस तेथे विकास होऊच शकत नाही,’ तेव्हा जनतेला धक्काच बसतो. अर्थात मोदी यांचा हा ‘चित भी मेरी, पट भी मेरी’ हा प्रकार नवीन नाही. काँग्रेसने जर विकास केला नसेल तर मग मागील नऊ वर्षांतील तुमच्या एकहाती सत्ताकाळात रुपयापासून रोजगार निर्मितीपर्यंत आणि औद्योगिक क्षेत्रापासून कृषी क्षेत्रापर्यंत फक्त ‘गडगडणे’च सुरू आहे. याला विकासाचा कोणता प्रकार म्हणायचा? हा विकास नसून जुमलेबाजी आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांचा पक्ष विकासाच्या वेगवेगळय़ा ‘कथा’ सांगतांना अजिबात थकत नसले तरी रुपया मात्र दमला आहे. सध्याची आपली अर्थव्यवस्था ही विकासाची नव्हे, तर मोदी राजवटीतील ‘दमलेल्या’ रुपयाची कहाणी आहे. रुपयाने गाठलेल्या विक्रमी निचांकाचा तोच अर्थ आहे.