आजचा अग्रलेख : पांचटपणा!

डॉलरच्या तुलनेत रुपया आता शवागृहात पोहोचला आहे. त्यावर शस्त्रक्रियेची वेळ निघून गेल्याने क्रियाकर्मच करावे लागते की काय, अशी भीती वाटत आहे. रिझर्व्ह बँक स्वतः हतबल व हताश आहे. कारण रुपया घसरला तरी देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे असा अपप्रचार सुरू आहे. हे नवे अर्थशास्त्र सामान्यांच्या कल्पनेपलीकडचे आहे. आचके देणाऱ्या अर्थव्यवस्थेचे खापर कधी काँग्रेसवर फोडायचे तर कधी रघुराम राजनवर फोडायचे हा पांचटपणा झाला. तुम्ही काय केले ते सांगा! पण सरकारकडे सांगण्यासारखे काही नाही.

डॉलरच्या तुलनेत आमचा रुपया अतिचिंताजनक स्थितीत पोहोचला आहे. सोमवारी तो इतका घसरला की, नीचांकाचासुद्धा विक्रम झाला. सोमवारी संध्याकाळी तो 71.21 या खालच्या आकडय़ावर बंद झाला. तेव्हा पंतप्रधान मोदी हे देशाच्या अर्थव्यवस्थेस काँग्रेसने कसा सुरुंग लावला यावर भाषण देत होते. गेल्या चार वर्षांपासून ते स्वतः सत्तेवर आहेत याचा त्यांना विसर पडला की काय? ही अशीच पडझड सुरू राहिली तर येत्या काही दिवसांत ‘रुपया’ शंभरी पार करेल अशी भीती आम्हाला वाटत आहे. देशाच्या चलनाचे मूल्य घसरते तेव्हा देशाची पतही त्याच वेगाने घसरत असते हा दावा भाजप नेते काँग्रेस राजवटीत करीत असत. मग आज रुपया पडझडीत शंभरीच्या गाळात जात असताना देशाची पत वाढली आहे असे समजायचे काय? रुपया मृत्युपंथाला लागला असताना हिंदुस्थानची अर्थव्यवस्था जगातील सहाव्या क्रमांकाची ‘मजबूत’ झाली आहे असा दावा करणे हास्यास्पद आहे. रुपयाची पडझड रोखण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केली? कोणती पावले उचलली? तर तेथेही बोंबच आहे. हिंदुस्थानची अर्थव्यवस्था रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यामुळे घसरली

असा मृदुंग वाजवून

नीती आयोगाने सरकारची चमचेगिरीच केली. बुडीत कर्जासंदर्भात राजन यांनी घेतलेले निर्णय अर्थव्यवस्थेस मारक ठरले असे नीती आयोगाचे आता म्हणणे आहे, पण रघुराम गेले तेव्हा रुपयाचे मूल्य जे होते त्यापेक्षा ते आता जास्त वेगाने घसरले. नोटाबंदीसारख्या फालतू गोष्टींना व सरकार स्वतःवरच करीत असलेल्या हजारो कोटींच्या जाहिरातबाजींना रघुराम यांनी विरोध केला होता. ही सरळसरळ देशाच्या तिजोरीची लूट असल्याचे त्यांचे मत होते, पण खोटारडेपणा, भंपकपणा व जाहिरातबाजीस चटावलेल्या आमच्या राज्यकर्त्यांनी रघुराम यांना घालवून दिले. रघुराम यांच्या काळात रुपयाची प्रकृती बिघडली होती व ते दुरुस्ती करू पाहात होते. डॉलरच्या तुलनेत रुपया आता शवागृहात पोहोचला आहे. त्यावर शस्त्रक्रियेची वेळ निघून गेल्याने क्रियाकर्मच करावे लागते की काय, अशी भीती वाटत आहे. रिझर्व्ह बँक स्वतः हतबल व हताश आहे. कारण रुपया घसरला तरी देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे असा अपप्रचार सुरू आहे. हे नवे अर्थशास्त्र सामान्यांच्या कल्पनेपलीकडचे आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव प्रचंड वाढले आहेत. पेट्रोलही लवकरच शंभरी पार करेल. बेरोजगारांच्या झुंडी रस्त्यावर उतरून अराजक माजवतील. शेतकरी सुखी नाही, खाण्या-पिण्याचे जिन्नस महागले, स्वयंपाकाचा गॅस व सी.एन.जी. महाग झाले आहे. उत्पादन घसरले आहे व

गुंतवणूक क्षेत्रात पीछेहाट

सुरू आहे. सध्याच्या राजवटीत नवी गुंतवणूक करायला उद्योगधंदेवाले तयार नाहीत. त्यामुळे रोजगार निर्माण होणार नाहीत. हे चित्र विदारक आहे व ‘बनाना’ रिपब्लिकच्या दिशेने आपण निघालो आहोत. कोळशाचा साठा संपल्यामुळे वीजनिर्मिती मंद झाली. दिल्ली ते कोलकात्यापर्यंत कधीही अंधकार पसरेल अशी स्थिती आहे. प्रत्येक गावात वीज पोहोचली असल्याचा दावा ऊर्जामंत्र्यांनी केला, त्याचे काय झाले? स्मार्टसिटीसाठी निवडलेली शहरे आजही उद्धारकर्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. बुलेट ट्रेनचा सण कर्ज काढून साजरा होत असला तरी मुंबईतील उपनगरीय रेल्वे रोज ‘मरत’ चालली आहे. हे काही सहाव्या मजबूत अर्थव्यवस्थेचे लक्षण नाही. आचके देणाऱ्या अर्थव्यवस्थेचे खापर कधी काँग्रेसवर फोडायचे तर कधी रघुराम राजनवर फोडायचे हा पांचटपणा झाला. तुम्ही काय केले ते सांगा! पण सरकारकडे सांगण्यासारखे काही नाही. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ते तीन मूर्तीवरील नेहरूंचे स्मारक हटवणार आहेत. निवडणुका ई.व्ही.एम. पद्धतीनेच घेणार आहेत. राहुल गांधी हे नालायक आहेत व ते मांसाहार करून मानसरोवर यात्रेस गेल्याने धर्म भ्रष्ट झाल्याचा आरोप भाजपने केला; तोही फक्त घसरलेल्या रुपयाची किंमत वाढवण्यासाठीच! रुपया का घसरला, अर्थव्यवस्था का बुडाली, या मागची हीच कारणे असतील तर देशही बुडत आहे हे मान्य करायला हवे.