सामना अग्रलेख – अखंड भारत, अखंड भाषणे

अखंड भारतवर्ष कोणाला नकोय? ते तर प्रत्येकाला हवेच आहे. ते फक्त संघाचे स्वप्न नसून प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे. सिंधू नदीजवळचा इलाखा, ज्यास सिंध प्रांत म्हटले जाते, तो 1947 च्या फाळणीत पाकिस्तानात गेला. त्या प्रांतातील सर्व सिंधी लोक भारतात आले. फाळणीचे घाव सिंधी समाजावर जास्त झाले. त्या जखमा आजही भळभळत आहेत. हिंदुत्व आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली भाजप व संघ परिवार या जखमांवरची खपली आवर्जून काढतात, पण उपयोग काय? 11 वर्षांपासून देशाची प्रचंड सत्ता, सैन्य संघ परिवाराच्या हातात आहे. सिंध प्रांत, पाकव्याप्त कश्मीरची एक इंचही जमीन ते भारतात आणू शकलेले नाहीत. अखंड भारतावर अखंड भाषणे मात्र सुरू आहेत!

सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा अखंड हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली आहे. सिंधी बांधवांच्या उपस्थितीत एक सोहळा झाला व त्यांच्या समोर भागवतांनी आपले विचार मांडले. भारत-पाकिस्तान फाळणीत सर्वाधिक त्रास सिंधी समाजाला झाला. सिंधी लोकांनी भारतात येऊन या भूमीला मातृभूमी मानले. ते निर्वासित छावण्यांत राहिले. त्यांनी हालअपेष्टा, अत्याचार सहन केले. फाळणीच्या वेळी जो रक्तपात झाला त्यातही सर्वाधिक रक्त शीख आणि सिंधी समुदायालाच सांडावे लागले. भारतभूमीच्या निर्मितीत या समाजाने केलेले रक्तसिंचन विसरता येणार नाही. त्या असीम त्यागाचे स्मरण सरसंघचालकांनी केले व सिंधी समाजाचा गौरव केला हे महत्त्वाचे. भागवत म्हणाले, ‘‘परिस्थितीने आपल्याला पाकिस्तानातून येथे पाठवले आहे. ते घर आणि हे घर वेगळे नाही. संपूर्ण भारत एक घर आहे, परंतु कोणीतरी आपल्या घरातून एक खोली काढून ती ताब्यात घेतली आहे. मला ती परत घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत आपल्याला अखंड भारत आठवला पाहिजे.’’ भागवत यांनी सिंधी समाजाला जे मार्गदर्शन केले ते योग्य आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील खोली परत भारतात आली पाहिजे, पण ती खोली भारतात येणार कशी? हे काम पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीच करायचे आहे. मुख्य म्हणजे हे तिघेही संघाचे स्वयंसेवक आहेत. संघाचा अखंड भारताचा विचार अमलात आणण्यासाठी हे तिघे काय करणार आहेत? ‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांना अखंड भारत निर्माण करण्याची संधी मिळाली होती. त्यांनी ती

संधी वाया घालवली

आहे. ‘पहलगाम हल्ल्यात 26 भारतीयांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानात सैन्य घुसवू. लाहोर, कराचीपर्यंत घुसू व आता पाकव्याप्त कश्मीर वगैरे मिळवून मागे फिरू,’ अशा गर्जना पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केल्या, पण प्रे. ट्रम्प यांच्या आदेशामुळे भारतीय सैन्याला माघार घ्यावी लागली. पाकच्या ताब्यातील खोली भारतात आणता आली नाही यावर सरसंघचालकांनी पंतप्रधान मोदी व त्यांच्या इतर स्वयंसेवकांना जाब विचारला का? प्रे. ट्रम्प यांचे ऐकून पाकिस्तानातून माघार का घेतली, यावर काही झाडाझडती घेतली की नाही? की अखंड भारतासंदर्भात फक्त व्याख्यानेच झोडायची! भारताची एक खोली पाकिस्तानच्या ताब्यात आहेच. तसे लडाखमधील अनेक खोल्या चीनने घशात घातल्या. यावर आवाज उठवणाऱ्या सोनम वांगचुक यांना मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली. म्हणजे चीनने भारताच्या खोल्या चोरल्या त्यावर बोलायचे नाही, पण पाकिस्तानच्या ताब्यातील खोलीवर आदळआपट करत राहायचे. हा काय प्रकार आहे? सरसंघचालकांनी चीनने ताब्यात घेतलेल्या खोलीवर परखड भाष्य केले असते तर बरे झाले असते. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी मोदींनी कच खाल्ली नसती तर भारतीय सैन्य, हवाई दलाने पाकव्याप्त कश्मीरात घुसण्याची तयारी ठेवली होती. मात्र केंद्राची राजकीय इच्छाशक्ती कमी पडल्याने पुढे घोटाळा झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक बिनहत्यारी फौज आहे. मोदींचे राज्य आल्यापासून ते जागोजागी सैन्याप्रमाणे संचलन करतात व आपणच भारतीय

सैन्य असल्याचा आव

आणतात. प्रत्यक्षात भारतीय स्वातंत्र्य लढय़ात हे लोक कोठेच नव्हते व यांच्यापैकी एकही नेता स्वातंत्र्य लढ्यात तुरुंगात गेल्याची नोंद नाही. तरीही भागवतांचा दावा असा की, भारतीय सैन्यापेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्षम आणि चपळ आहे. देशाला गरज पडेल तेव्हा स्वयंसेवकांची सेना फक्त तीन दिवसांत सज्ज होऊ शकते, पण भारतीय सेनेला तयार व्हायला वेळ लागतो. म्हणजे स्वयंसेवकांची बिनहत्यारी फौज कोणत्याही भारतीय सैन्यापेक्षा शूर, युद्धखोर व अनुभवी आहे हे मान्य केले तर हिंदुत्वाचे धर्मांध विष पेरण्यापेक्षा या लोकांनी सीमेवर, समुद्रात पहारे द्यायला हवेत. त्यामुळे पुलवामा, पहलगाम, उरीसारखे भयंकर हल्ले होणार नाहीत. लेह-लडाखमध्ये या सगळ्यांनी घुसून चीनच्या ताब्यात असलेला भारतीय भूभागही सोडवण्याची हिंमत दाखवायला हवी. अखंड भारतवर्ष कोणाला नकोय? ते तर प्रत्येकाला हवेच आहे. ते फक्त संघाचे स्वप्न नसून प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे. सिंधू नदीजवळचा इलाखा, ज्यास सिंध प्रांत म्हटले जाते, तो 1947 च्या फाळणीत पाकिस्तानात गेला. त्या प्रांतातील सर्व सिंधी लोक भारतात आले. फाळणीचे घाव सिंधी समाजावर जास्त झाले. त्या जखमा आजही भळभळत आहेत. हिंदुत्व आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली भाजप व संघ परिवार या जखमांवरची खपली आवर्जून काढतात, पण उपयोग काय? 11 वर्षांपासून देशाची प्रचंड सत्ता, सैन्य संघ परिवाराच्या हातात आहे. सिंध प्रांत, पाकव्याप्त कश्मीरची एक इंचही जमीन ते भारतात आणू शकलेले नाहीत. अखंड भारतावर अखंड भाषणे मात्र सुरू आहेत!