आजचा अग्रलेख : मान्सून आला, पण…

या वर्षी महाराष्ट्राची तहानआणि काळय़ा आईची पाण्याची भूकदेखील मोठी आहे. ही तहान आणि भूक शमविण्यासाठी वरुणराजाला तहानभूक विसरून महाराष्ट्रावर कृपावृष्टीकरावी लागेल. ती तो करणार का? नेहमीचा लहरीपणा विसरून संवेदनशीलपणे महाराष्ट्राची तहान भागवणार का? बळीराजाच्या ओंजळीत भरभरून पिकाचे दान टाकणार का? प्रश्न नेहमीचेच आहेत आणि त्याची उत्तरे लहरी मान्सूनकडून अपेक्षित आहेत. मान्सून आता आला आहे, पण हे सर्व प्रश्न कायमच आहेत.

महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांत अखेर मान्सूनने हजेरी लावली आहे. या सर्व भागांत गेल्या दोन दिवसांत दमदार पाऊस झाला. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार राज्याचा 93 टक्के भाग आता मान्सूनने व्यापला आहे आणि उर्वरित महाराष्ट्रातही येत्या दोन दिवसांत मान्सूनचे आगमन होईल. तीक्र दुष्काळ, पाणीटंचाई, चाराटंचाई आणि प्रचंड ऊन यामुळे त्रासलेल्या महाराष्ट्रासाठी ही नक्कीच सुखद बातमी आहे. बळीराजालादेखील दिलासा देणारीच ही गोष्ट आहे. या वर्षी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात तीक्र दुष्काळाने उग्र रूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर उशिरा का असेना, मान्सूनने 93 टक्के महाराष्ट्र व्यापणे ही दिलासा देणारी बाब आहे. पुणे जिल्हय़ाचा ग्रामीण भाग, नाशिक, जळगाव, बुलढाणा, वाशिम, जालना, अकोला, नगर, परभणी, लातूर आदी जिल्हय़ांमध्ये गेल्या दोन दिवसांत चांगला पाऊस झाला. तळकोकणातही मालवण, कणकवली, वैभववाडी परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. नगर जिल्हय़ाच्या काही भागांत तर ढगफुटीसारखी परिस्थिती उद्भवली. बुलढाणा आणि जालना जिल्हय़ात तब्बल 20 वर्षांनी काही नद्यांना पूर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता हवामान खात्याचा

पुढचा अंदाजही

खरा ठरो, म्हणजे मुंबईसह उरलेला महाराष्ट्रही मान्सून सरींनी चिंब भिजेल. अर्थात ही फक्त सुरुवात आहे. अजून मान्सूनला बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे मान्सूनच्या हजेरीचा आनंद असला तरी त्याची कृपा‘वृष्टी’ पुढील काळात अशीच कायम राहायला हवी. त्यातील सातत्य कायम राहायला हवे. मान्सून ज्या लहरीपणासाठी ओळखला जातो, त्याला यंदा तरी त्याने मुरड घातली पाहिजे. तर आणि तरच महाराष्ट्रावरील तीक्र दुष्काळ आणि पाणीटंचाईचे संकट कमी होऊ शकेल. आधीच मान्सून विलंबाने दाखल झाला आहे. त्यात ‘वायू’ चक्रीवादळाने त्याचा प्रवास आणखी लांबवला. हवामान खात्याच्या ‘आज येणार, उद्या येणार’ या अंदाजांना हुलकावणी देत अखेर गेल्या आठवडय़ात मान्सून ‘महाशय’ महाराष्ट्रात डेरेदाखल झाले. त्यातही ज्या कोकण-मुंबईत त्याचे आगमन आधी आणि दमदारपणे होते त्या कोकण – मुंबईलाच त्याने या वेळी आणखी दोन दिवसांच्या ‘वेटिंग पीरियड’वर ठेवले आहे. थोडक्यात, मान्सूनने नमनालाच महाराष्ट्रासह देशाला दीर्घ श्वास घ्यायला लावला आहे. त्यामुळे आता मान्सूनने सलामी दिली असली तरी या पावसाने फक्त

जमिनीची काहिली

थोडी शांत केली आहे. पीक पेरणी, पिकांची वाढ असे सर्वच टप्पे अद्याप बाकी आहेत. या प्रत्येक टप्प्यावर मान्सूनला ‘बरसावे’ लागेल. राज्यातील सर्वच धरणे यंदा कोरडीठाक झाली आहेत. भूगर्भातील पाण्याच्या पातळीने न भूतो अशी खोली गाठली आहे. विदर्भ-मराठवाडय़ामध्ये तर 11 मोठे प्रकल्प ‘मृतसाठय़ा’त गेले आहेत. संपूर्ण राज्यातील धरणांत केवळ सहा टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. महाराष्ट्राच्या पाण्याचा हा ‘बॅकलॉग’ मोठा आहे आणि तो भरून निघेल अशा दमदार पद्धतीने धरण क्षेत्रांत पावसाला कोसळावे लागणार आहे. या वर्षी महाराष्ट्राची ‘तहान’ आणि काळय़ा आईची पाण्याची ‘भूक’देखील मोठी आहे. ही तहान आणि भूक शमविण्यासाठी वरुणराजाला तहान-भूक विसरून महाराष्ट्रावर कृपा‘वृष्टी’ करावी लागेल. ती तो करणार का? नेहमीचा लहरीपणा विसरून संवेदनशीलपणे महाराष्ट्राची तहान भागवणार का? बळीराजाच्या ओंजळीत भरभरून पिकाचे दान टाकणार का? प्रश्न नेहमीचेच आहेत आणि त्याची उत्तरे लहरी मान्सूनकडून अपेक्षित आहेत. मान्सून आता आला आहे, पण हे सर्व प्रश्न कायमच आहेत.