सामना अग्रलेख – ‘टीम इंडिया’ची उचकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण युद्धामुळे देशावर संकट आले आहे आणि या संकटकाळी राज्यांनी केंद्रासोबत टीम इंडियाया संघभावनेने काम करावे असे आवाहन मोदींनी संसदेत केले. आज तुम्हाला त्याची आठवण झाली, परंतु इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि जगात टीम इंडियाम्हणून मोदी सरकार कुठे आहे? देशात इंधन टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. शेतीपासून उद्योगांपर्यंत तडाखे बसू लागले आहेत. मोदी आणि भक्त भारताला विश्वगुरूवगैरे म्हणत असले तरी इराण युद्धात अमेरिकेने पाकिस्तानला शांतिदूतबनवून आणि प्रे. ट्रम्प यांनी मोदींची एका फोन कॉलवर बोळवण करून विश्वगुरूंचा बुरखा फाडला आहे. मोदींना आता टीम इंडियाची उचकी लागली खरी, पण अनेक दशकांच्या प्रयत्नांनंतर बसलेली टीम इंडियाची घडी तुमच्याच अमृतकाळात विस्कटली, त्याचे काय?

मेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील लांबत चाललेले युद्ध व त्यामुळे भारतात निर्माण झालेली स्थिती यावर पंतप्रधान मोदी अखेर बोलले. लोकसभा आणि राज्यसभेत मंगळवारी मोदींनी युद्ध तसेच त्याचे भारतावर होणारे परिणाम यावर विस्ताराने भाष्य केले. नेहमीप्रमाणे या कठीण परिस्थितीवर आपले सरकार कसे यशस्वी मात करण्याचा प्रयत्न करीत आहे, याचेही पाढे वाचले. युद्ध सुरू होऊन जवळजवळ महिना होत आला आहे. मात्र त्यावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त व्हायला 25-26 दिवस जावे लागले. अर्थात, देशाशी संबंधित महत्त्वाच्या आणि संवेदनशील प्रश्नांवर, घडामोडींवर मोदींनी सोयिस्कर मौन बाळगणे ही काही नवीन गोष्ट नाही. मागील दहा-अकरा वर्षांत त्याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे. मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपासून मणिपूरमधील भयंकर हिंसाचार-अत्याचारांपर्यंत मोदींचे प्रदीर्घ मौन आणि नंतर मोजक्या शब्दांत त्यावर बोलून विषय आटोपता घेणे या गोष्टी जनतेने अनुभवल्या आहेत. त्यामुळे इराण युद्धाबाबत

देश म्हणून भूमिका

मांडणे असो किंवा इराणवरील हल्ले आणि त्याबाबतची भूमिका असो, त्यावर मोदी 25-26 दिवस झाल्यावर बोलले, यात आश्चर्य ते काय! संसदेत बोलताना मोदींनी युद्धाच्या संभाव्य दीर्घ परिणामांबाबत चिंता व्यक्त केली. हे दीर्घ परिणाम म्हणजे भारतासाठी मोठी परीक्षा आहे आणि सर्व राज्य सरकारे तसेच केंद्र सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नांनीच देश त्याला यशस्वी तोंड देऊ शकतो, असे ते म्हणाले. मोदींना अशा संकटसमयी निदान बोलण्यापुरता विरोधी पक्ष आणि राज्य सरकारांची आठवण आली हे बरेच झाले! कारण एरवी त्यांचा आणि त्यांच्या सरकारचा कारभार ‘मोदी है तो मुमकीन है’ अशा एककल्ली पद्धतीनेच सुरू असतो. विरोधी पक्ष त्यांना आठवतो तो फोडाफोडी करून राजकीय लाभ घेण्यासाठी आणि विरोधी नेते त्यांना आठवतात ते केंद्रीय तपास यंत्रणांच्या मनमानी कारवायांसाठी. मंगळवारी मात्र मोदींना विरोधी पक्ष आणि राज्य सरकारांच्या सहकार्याची, मदतीची उपरती झाली. आता उशिरा का होईना ती झाली म्हणून मोदींचे आभार मानायचे की युद्धनिर्मित परिस्थितीचे? कारण ही परिस्थिती

उद्भवली नसती तर

ना मोदींना संसदेची आठवण झाली असती, ना सभागृहात बोलण्याची गरज भासली असती, ना राज्य सरकारांच्या सहकार्याची तसदी त्यांनी घेतली असती. मात्र इराण युद्धामुळे देशावर संकट आले आहे आणि या संकटकाळी राज्यांनी केंद्रासोबत ‘टीम इंडिया’ या संघभावनेने काम करावे असे आवाहन मोदींनी संसदेत केले. ते सर्व ठीक आहे, पण उद्या युद्ध संपल्यावर मोदींना या ‘टीम इंडिया’चा विसर पडणार नाही ना? आज तुम्हाला त्याची आठवण झाली, परंतु इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि जगात ‘टीम इंडिया’ म्हणून मोदी सरकार कुठे आहे? देशात इंधन टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. पेट्रोल पंपांवर रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे. शेतीपासून उद्योगांपर्यंत तडाखे बसू लागले आहेत. मोदी आणि भक्त भारताला ‘विश्वगुरू’ वगैरे म्हणत असले तरी इराण युद्धात अमेरिकेने पाकिस्तानला ‘शांतिदूत’ बनवून आणि प्रे. ट्रम्प यांनी मोदींची एका फोन कॉलवर बोळवण करून ‘विश्वगुरूं’चा बुरखा फाडला आहे. मोदींना आता ‘टीम इंडिया’ची उचकी लागली खरी, पण अनेक दशकांच्या प्रयत्नांनंतर बसलेली ‘टीम इंडिया’ची घडी तुमच्याच ‘अमृतकाळा’त विस्कटली, त्याचे काय?