घटक पक्षांचे ‘पत्ते’ पिसत मोदींनी त्यांचे तिसरे मंत्रिमंडळ स्थापन केले खरे, परंतु घटक पक्षांना फेकलेले ‘हलके’ पत्तेच त्यांना ‘भारी’ पडणार आहेत. तिसऱ्यांदा सरकार स्थापन करताना ‘रालोआ’ हा आपल्या सरकारचा आत्मा आहे, वगैरे म्हणणाऱ्या मोदींना मंत्रिमंडळ बनविताना, खातेवाटप करताना मात्र त्याचा विसर पडला. त्यामुळे मोदी-3 सरकारमधील घटक पक्षांचे ‘आत्मे’ आताच अस्वस्थ झाले आहेत. हे अशांत ‘आत्म्यां’चे सरकार फार काळ तग धरू शकणार नाही!
घटक पक्षांच्या टेकूवर मोदी यांनी तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले. नवीन मंत्रिमंडळाचे पत्तेही पिसले. खेळात 52 पत्ते असले तरी मोदींनी त्यांच्या तिसऱ्या डावासाठी ‘72’ ‘पत्ते’ पिसले आहेत. त्यातही सर्व ‘मोठे’ पत्ते भाजपने स्वतःकडेच ठेवले आहेत आणि ‘हलके’ पत्ते मित्रपक्षांपुढे फेकले आहेत. गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, रस्ते विकास, रेल्वे अशी महत्त्वाची खाती भाजपकडेच असतील. मोदी-3 ज्या टेकूंवर उभे आहे त्यात ‘तेलुगु देशम’ आणि संयुक्त जनता दल हे दोन पक्ष महत्त्वाचे आहेत. मात्र त्यांना प्रत्येकी दोन मंत्रीपदे मिळाली आहेत. तेव्हा इतर घटक पक्षांना एखाद्दुसऱ्या मंत्रीपदावर समाधान मानावे लागले यात आश्चर्य नाही. म्हणजे ‘मोदी-3’चे मंत्रिमंडळ आकाराने मोठे असूनही त्यात घटक पक्षांची जागा लहानच आहे. 2014 मधील सरकारमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासह 46 खासदार मंत्री बनले होते. 2019 मध्ये ही संख्या वाढून 59 झाली होती. आता पंतप्रधानांसह 72 जणांचे मंत्रिमंडळ आहे. मात्र घटक पक्षांची राज्यमंत्री किंवा छोटय़ा खात्यांवर
बोळवण करून
भाजपने आपला नेहमीचा तोरा दाखवून दिलाच आहे. बोलताना घटक पक्षांवर स्तुतिसुमने उधळायची, प्रत्यक्षात त्यांच्या पारडय़ात काही टाकायची वेळ आली की, उपकार केल्यासारखे काहीतरी टाकायचे, हीच मोदी यांच्या भाजपची पद्धत झाली आहे. हेच चित्र ‘मोदी-3’च्या मंत्रिमंडळाचे आहे. मित्रपक्षांबाबत भाजपचे हे धोरण जुनेच आहे. गरज आहे तोपर्यंत गोंजारायचे, गरज संपली की फेकून द्यायचे. सरकार स्थापन करताना मोदींनी ज्या ‘रालोआ’चा राग आळवला तो ‘रालोआ’ आणि त्यातील घटक पक्ष त्यांना मंत्रिमंडळ बनविताना, खातेवाटप करताना आठवले नाहीत. पंतप्रधानांसह तब्बल 72 मंत्री ‘मोदी-3’ मध्ये आहेत. मात्र त्यात भाजपचा वाटा 61 आणि घटक पक्षांचा ‘घाटा’ 11 असा आहे. खातेवाटपातही भाजपने ‘तृप्ती’चा ढेकर दिला आहे आणि फेकलेले तुकडे खाऊन पोटावर हात फिरविण्याची वेळ घटक पक्षांवर आली आहे. मोदींना 2024 मध्ये ‘रालोआ’ची उचकी लागली खरी; परंतु मंत्रीपदे आणि खातेवाटपात
भाजपचे शेपूट वाकडेच
राहिले. यापुढील काळातही भाजपसाठी ‘अन्ना’ आणि घटक पक्षांसाठी ‘नन्ना’ हाच पाढा म्हटला जाणार हे स्पष्ट आहे. आता तर फक्त मंत्रिमंडळ आणि खातेवाटपच झाले आहे. पुढील काळात अनेक धोरणात्मक आणि महत्त्वाचे प्रश्न येतील. त्या वेळी भाजप आणि रालोआतील घटक पक्ष यांच्यातील सत्तेचा ‘मधुचंद्र’ सुरू आहे की, ‘मधू इथे आणि चंद्र तिथे’ अशी त्यांची अवस्था झाली आहे, हे समजेल. तो दिवस फार दूर नाही. कारण मोदींनी केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले असले तरी मंत्रिमंडळ आणि खातेवाटप हे या सरकारसाठी ‘प्रथम ग्रासे मक्षिकापात’च ठरले आहे. भाजप आणि घटक पक्षांचे ‘पत्ते’ पिसत मोदींनी त्यांचे तिसरे मंत्रिमंडळ स्थापन केले खरे, परंतु घटक पक्षांना फेकलेले ‘हलके’ पत्तेच त्यांना ‘भारी’ पडणार आहेत. तिसऱ्यांदा सरकार स्थापन करताना ‘रालोआ’ हा आपल्या सरकारचा आत्मा आहे, वगैरे म्हणणाऱ्या मोदींना मंत्रिमंडळ बनविताना, खातेवाटप करताना मात्र त्याचा विसर पडला. त्यामुळे मोदी-3 सरकारमधील घटक पक्षांचे ‘आत्मे’ आताच अस्वस्थ झाले आहेत. हे अशांत ‘आत्म्यां’चे सरकार फार काळ तग धरू शकणार नाही!