सामना अग्रलेख – यंत्राचे भाषण, यंत्रांनी ऐकले!

भारतीय सिनेमा, संगीत, कथा हे राष्ट्रीय एकात्मता व भारतीय संस्कृतीचे महान प्रतीक आहेत. भारताच्या प्रत्येक गल्लीतल्या प्रेमाची कथा पडद्यावर आणायची धडपड भारतीय मनोरंजन क्षेत्राने केली आहे. मात्र या प्रेमकथांवर आता बंधने आली आहेत. त्यामुळे ‘क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर वर्ल्ड’ हे स्वप्न खरंच साकार होईल काय? आपल्याला माणसाला यंत्र बनू द्यायचे नाही असे पंतप्रधान मोदी ‘वेव्हज्’ परिषदेत म्हणाले. ते सगळे ठीक असले तरी लोकांना आपले अंधभक्त बनवून चुकीच्या गोष्टीचे समर्थन करायला लावणे हे माणसांचे यंत्र बनवण्यासारखेच आहे. माणसांचे यंत्र बनवल्यामुळेच पहलगाम हल्ल्याचे सुतक या यंत्रांना लागले नाही. मनोरंजनातील यंत्रासमोर एका यंत्राने भाषण केले. त्यामुळे दुखवटा वगैरेचा प्रश्नच येत नाही.

पंतप्रधान मोदी हे एक अजब रसायन आहे. ही महान व्यक्ती कोणत्या मातीपासून बनली आहे हा संशोधनाचा विषय ठरावा. पंतप्रधान मोदी हे गुरुवारी दिवसभर मुंबईतील सिने तारे-तारका वगैरे लोकांत होते. मनोरंजनाच्या दुनियेत त्यांनी भरपूर वेळ व्यतीत केला. शाहरुख खान, आमीर खान, सलमान खान असे हिंदी सिनेसृष्टीतले लोक पहिल्या रांगेत बसून मोदी यांचे मनोरंजनाच्या दुनियेवरील भाषण ऐकत होते. कश्मीरात 26 निरपराध्यांची हत्या झाली आहे. देश अजूनही त्या दुःखातून सावरलेला नाही. ज्यांच्या घरातला माणूस मारला गेला, त्या घरात आजही हुंदके आणि अश्रूंचे पाझरणे सुरू आहे. एकंदरीत देशावर दुःखाचे सावट आहे. परदेशातील एखादी प्रमुख व्यक्ती गेली तरी देशात दुखवटा पाळला जातो. भारतात कोणी आजी-माजी पुढारी ईहलोकी रवाना झाला तरी राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणून राष्ट्रीय शोक व्यक्त होतो व सर्व सरकारी, मनोरंजनाच्या कार्यक्रमांना फाटा दिला जातो. इथे 26 भारतीय नागरिक निर्घृणपणे मारले गेले, पण सरकारच्या चेहऱ्यावर ना शोक ना चिंता. जणू काही घडलेच नाही अशा थाटात सरकारचे प्रमुख नेताजी वावरत आहेत. आपल्या पंतप्रधानांना मनोरंजनाच्या दुनियेत वावरायला आवडते, पण राष्ट्रावर हल्ला होतो तेव्हा राज्यकर्त्यांनी काही पथ्ये पाळायला हवीत. मुंबईतील मनोरंजन उद्योगातले मोदींचे भाषण पुढे ढकलता आले असते किंवा दृकश्राव्य माध्यमांतून त्यांना संदेश देता आला असता, पण झगमगत्या तारका मंडळात मोदी स्वतः अवतरले. त्यानिमित्ताने 26 निरपराध्यांच्या हत्येचे दुःख बाजूला ठेवून भाजप व त्यांच्या महाराष्ट्रातील सरकारने मुंबई सजवून

पंतप्रधानांच्या स्वागताचे फलक

लावले. त्यामुळे मुंबईकरांनी दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे जे फलक लावले होते ते या झगमगाटी फलकमाऱ्यात झाकोळले गेले. मोदी यांनी सिने तारे-तारकांपुढे जे भाषण केले त्यात त्यांनी सांगितले, ‘‘मानवाला रोबो बनवायचे नाही, तर संवेदनशील बनवायचे आहे.’’ पंतप्रधानांचा विचार चांगला आहे, पण ते किती संवेदनशील आहेत? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. 2019 मध्ये 40 जवानांची हत्या पुलवामात झाल्यावरही ती संवेदनशीलता दिसली नव्हती आणि आता पहलगाममध्ये 26 नागरिक दहशतवादी हल्ल्यात मारले गेले तेव्हाही त्यांच्यासाठी संवेदनशीलता दिसली नाही. अनेक कारणांनी पंतप्रधान मोदी हे मंचावर कॅमेऱ्यासमोर रडतात. अगदी हुकमी हुंदके देतात. त्यामुळे देश भावनिक होतो. पुलवामा आणि पहलगाम रक्तकांडानंतर पंतप्रधानांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या नाहीत. या हल्ल्यानंतर सगळ्यात आधी ते बिहारात प्रचारासाठी गेले व काल मुंबईतील मनोरंजनाच्या कार्यक्रमात पोहोचले. मुंबईत जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद सुरू आहे व त्या कार्यक्रमाच्या यशासाठी बऱ्याच दिवसांपासून सरकारने कष्ट घेतले. जगभरातून या क्षेत्रातील उद्योजक मुंबईत आले. त्यामुळे कार्यक्रम रद्द करणे शक्य नसावे, पण आपल्या घरात 26 निरपराध्यांची प्रेते पडली आहेत आणि त्यांच्या चितेवरील राखदेखील अजून धगधगते आहे. भारत जितका दुःखात आहे तितकाच संतप्त आहे हे जगभरातून आलेल्या

प्रतिनिधींना दाखवायला

हवे होते. वर्ल्ड ऑडिओ- व्हिज्युअल अॅण्ड एंटरटेन्मेंट समिट अर्थात ‘वेव्हज्’ परिषदेने महाराष्ट्राला फायदा होणार आहे. पंतप्रधानांचे भाषण त्या दृष्टीने दिशादर्शक आहे. ‘‘भारताच्या प्रत्येक गल्लीत एक कथा दडलेली आहे. आमच्या पर्वतांमध्ये संगीत आहे. येथील नद्या कायम गुणगुणत असतात. भारतात सांस्कृतिक खजिना आहे. शिक्षण, विज्ञान, संस्कृती, एकता आणि अखंडतेचा मिलाफ भारतीय परंपरेत आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी करतात, पण भारतीय पर्वतातले संगीत नष्ट करून तेथे विद्वेषाचे कर्कश गाणे कोणी सुरू केले आहे? येथील नद्या कायम गुणगुणत असतात, पण नद्यांच्या या मधुर प्रवाहात धार्मिक विद्वेषाचे विष कोण मिसळत आहे व हे विषरूपी ‘कंटेंट’ पडद्यांवर कोण आणत आहे? भारतीय सिनेमा, संगीत, कथा हे राष्ट्रीय एकात्मता व भारतीय संस्कृतीचे महान प्रतीक आहेत. मनोज कुमार यांच्यासारख्या कलाकारांनी पडद्यावर एकसंध भारताची कथा नेहमीच प्रदर्शित केली. भारताच्या प्रत्येक गल्लीतल्या प्रेमाची कथा पडद्यावर आणायची धडपड भारतीय मनोरंजन क्षेत्राने केली आहे. मात्र या प्रेमकथांवर आता बंधने आली आहेत. दृकश्राव्य माध्यमांचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ‘क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर वर्ल्ड’ हे स्वप्न खरंच साकार होईल काय? आपल्याला माणसाला यंत्र बनू द्यायचे नाही असे पंतप्रधान मोदी ‘वेव्हज्’ परिषदेत म्हणाले. ते सगळे ठीक असले तरी लोकांना आपले अंधभक्त बनवून चुकीच्या गोष्टीचे समर्थन करायला लावणे हे माणसांचे यंत्र बनवण्यासारखेच आहे. माणसांचे यंत्र बनवल्यामुळेच पहलगाम हल्ल्याचे सुतक या यंत्रांना लागले नाही. मनोरंजनातील यंत्रासमोर एका यंत्राने भाषण केले. त्यामुळे दुखवटा वगैरेचा प्रश्नच येत नाही.