आजचा अग्रलेख : पंतप्रधानांचे ‘संदेश’

2150

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधान देशापुढील आव्हाने, ती दूर करण्यासाठीचे उपाय, सरकारची पुढील उद्दिष्टे, अजेंडय़ावर असलेले महत्त्वाचे प्रश्न यांचा लेखाजोखा मांडतात आणि त्यातून संदेशदेखील देतात. गुरुवारी पंतप्रधान मोदी यांनीही लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात 370 कलम, तिहेरी तलाक, पिण्याचे शुद्ध पाणी, लोकसंख्यावाढीपासून एक देश एक निवडणूकया त्यांच्या आवडत्या विषयापर्यंत अनेक बाबतीत संदेशदिले. आगामी काळात ते मार्गी लागलेले दिसतील, अशी खात्री बाळगायला हरकत नाही.

देशाचा 73 वा स्वातंत्र्य दिन देशभरात नेहमीच्या उत्साहात साजरा झाला. या वेळच्या स्वातंत्र्य दिनाला 370 कलम हटविण्याची पार्श्वभूमी असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला  संबोधताना आणखी कोणत्या राष्ट्रीय मुद्दय़ांना स्पर्श करतात याविषयी उत्सुकता होती. आगामी काळात केंद्र सरकार कोणत्या प्रश्नांना प्राधान्य देणार, कुठल्या विषयांना हात घालणार याचाही अंदाज पंतप्रधानांच्या भाषणातून येणार होता. अपेक्षेनुसार तब्बल 1 तास 20 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी अनेक प्रश्न, मुद्दे, समस्यांचा परामर्श घेतला. 370 कलम, दहशतवादाचा धोका हे महत्त्वाचे मुद्दे तर त्यात होतेच, पण लोकसंख्यावाढीवर त्यांनी केलेले भाष्यदेखील महत्त्वाचे म्हणावे लागेल. छोटे कुटुंब हे देशहिताचेच कार्य आहे आणि छोटे कुटुंब ठेवून देशातील एका वर्गाने देशहिताचा विचार केला, असे पंतप्रधान म्हणाले. छोटय़ा कुटुंबांमुळे विकासाला गती मिळते, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान योग्यच बोलले, पण देशातीलच एक मोठा वर्ग कुटुंबाचा आकार आणि लोकसंख्यावाढीचे दुष्परिणाम याबद्दल बेफिकीर आहे. येथील धर्मांध मुस्लिम तर ‘हम दो हमारे पचीस’ या मानसिकतेतून बाहेर पडायला तयार नाहीत. तेव्हा छोटे कुटुंब म्हणजे देशभक्तीच असे पंतप्रधान म्हणाले असले तरी देशातील मुस्लिम त्यापासून बोध घेणार का? ‘हम दो हमारे पचीस’च्या मानसिकतेतून कधी बाहेर पडणार?

छोटे कुटुंब

व्यक्तिगत, कौटुंबिक आणि राष्ट्रीय विकासासाठी कसे लाभदायक ठरते हा प्रकाश धर्मांध मुस्लिमांच्या डोक्यात कधी पडणार? असे प्रश्न उरतातच. आता या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधानांच्याच भाषणात दडली आहेत का हे भविष्यातच समजू शकेल, पण पंतप्रधानांनी एका महत्त्वाच्या प्रश्नावर जाहीर भाष्य केले आणि त्यातून योग्य ‘संदेश’ दिला हे महत्त्वाचे. तिहेरी तलाकबंदीचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. आपण सतीसारखी प्रथा बंद करू शकतो तर तोंडी तलाक का बंद करू शकत नाही, हा त्यांनी उपस्थित केलेला सवाल योग्यच होता. जलसिंचन आणि जलसंचय वाढविण्यासाठी ‘जलजीवन मिशन’ या नव्या योजनेची घोषणा पंतप्रधानांनी केली. सुमारे साडेतीन लाख कोटी रुपये या योजनेत गुंतविले जाणार आहेत. 2022 पर्यंत घराघरात शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविणे या योजनेचे उद्दिष्ट आहे. तिन्ही सैन्यदलांमधील योग्य समन्वयासाठी ‘चीफ ऑफ डिफेन्स’ (सीडीएस) हे पद निर्माण करण्याचे सूतोवाचही पंतप्रधानांनी केले. खरे म्हणजे हे पद नेमण्याची सूचना कारगील युद्धानंतरच करण्यात आली होती. मधल्या काळात यूपीए सरकारे आली आणि गेली. मोदी सरकारचाही पहिला कार्यकाळ संपला. आता दुसऱया कारकीर्दीत मोदी यांनी त्याची अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले. उशीर झाला असला तरी चूक दुरुस्त होत आहे हे महत्त्वाचे. 2024 मध्ये

देशाची अर्थव्यवस्था

पाच ट्रिलियन’ची करण्याच्या ध्येयाबाबतही पंतप्रधान बोलले. गेल्या काही दिवसांत जागतिक मंदीचे इशारे, देशातील वाहन उद्योगावर पसरलेले मंदीचे सावट आणि इतर बाबतीतही असलेली निराशा असे एक चित्र निश्चितपणे उभे राहिले आहे. तथापि, पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्याबाबत पंतप्रधानांनी जो दुर्दम्य विश्वास आणि आशावाद व्यक्त केला त्यावरून मंदीचे सावट सरकार निश्चितपणे दूर करील असे मानायला हरकत नाही. 370 कलमाचा उल्लेख करून ‘एक देश, एक संविधान’, जीएसटीचा संदर्भ देऊन ‘एक देश एक कायदा’ हे धोरण प्रत्यक्षात उतरले असे पंतप्रधान म्हणाले आणि तोच सूर पकडत ‘एक देश एक निवडणूक’ या धोरणाची तार पुन्हा एकदा छेडली. आता त्याचे ‘झंकार’ पुढील काही दिवस उमटत राहतील, पण पंतप्रधानांनी त्यांना द्यायचा तो ‘संदेश’ दिलाच. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधान देशापुढील आव्हाने, ती दूर करण्यासाठीचे उपाय, सरकारची पुढील उद्दिष्टे, अजेंडय़ावर असलेले महत्त्वाचे प्रश्न यांचा लेखाजोखा मांडतात आणि त्यातून ‘संदेश’देखील देतात. गुरुवारी पंतप्रधान मोदी यांनीही लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात 370 कलम, तिहेरी तलाक, पिण्याचे शुद्ध पाणी, लोकसंख्यावाढीपासून ‘एक देश एक निवडणूक’ या त्यांच्या आवडत्या विषयापर्यंत अनेक बाबतीत ‘संदेश’ दिले. आगामी काळात ते मार्गी लागलेले दिसतील, अशी खात्री बाळगायला हरकत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या