सामना अग्रलेख – मोदींचा काँग्रेस मार्ग

स्वदेशी आंदोलनाचा संबंध स्वातंत्र्य लढ्याशी व देशभक्तीशी होता आणि काँग्रेसने हे आंदोलन सुरू केले. प्रे. ट्रम्प यांनी ‘टॅरिफ’चा ‘बांबू’ मारताच मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात स्वदेशीची तीच काँग्रेस नीती स्वीकारली, पण काँग्रेसचे नाव न घेण्याचा नेहमीचा कद्रुपणा त्यांनी दाखवलाच. महात्मा गांधी, नेहरू वगैरेंनी स्वतःपासून ‘स्वदेशी’ सुरू केली. मोदी तसे करतील काय? मोदींचे भाषण हे गोंधळलेल्या मनाचे बुडबुडे होते. लाल किल्ल्यावर दहा वर्षे असे बुडबुडे फुटत आहेत! एकप्रकारे हे निरोपाचे भाषणच होते. जाता जाता ‘संघा’ची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न झाला, इतकेच!

पंतप्रधान मोदी यांनी 79 व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून भाषण केले. पंतप्रधान म्हणून त्यांचे हे बारावे भाषण होते. या वेळी त्यांचे मन अस्थिर व चिंताग्रस्त होते. वरवरचे अवसान आणून ते बोलत होते. तेरावे भाषण करायला आपण पुन्हा लाल किल्ल्यावर येऊ काय याबाबत त्यांच्या मनात शंका असाव्यात व ती अस्वस्थता, भय त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवत होते. स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्य दिन, लाल किल्ला या सगळ्यांशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काडीमात्र संबंध नाही. तरीही पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात संघाची जोरदार खुशामतखोरी केली ती याच भयातून. मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या महत्त्वपूर्ण भाषणात संघाचे लांगूलचालन करण्याचे कारण नव्हते. मोदी यांनी संघाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. संघ जगातील सर्वात मोठी ‘एनजीओ’ आहे, अशा शब्दांत मोदी यांनी गौरव केला. प्रश्न इतकाच आहे की, जगातील या एनजीओने भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाची निवड आतापर्यंत का रोखून ठेवली? दुसरे म्हणजे या ‘एनजीओ’ने सत्तापदावरील व्यक्तीने 75 व्या वर्षी निवृत्ती पत्करून सामाजिक कामात सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत ते कोणासाठी? देशाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार, या एनजीओने मोदी यांना 75 व्या वर्षी पंतप्रधानपदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले व त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा वापर संघाच्या चमचेगिरीसाठी केला. व्यक्तीनिर्माणापासून राष्ट्रनिर्माणापर्यंत संघाचे मोठे योगदान आहे, असे मोदी म्हणाले; पण स्वातंत्र्य लढ्याचा खरा इतिहास वेगळीच माहिती देतो. एक तर स्वातंत्र्य लढय़ात व त्यानंतरच्या राष्ट्रनिर्माणात मोदी यांचा पक्ष व संघ कोठेच दिसत नाही. स्वातंत्र्य लढ्यात लक्षावधी सामान्य नागरिक, काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी जीवनाचा अंत करून घेतला, हौतात्म्य पत्करले. त्यात

समाजवादी, डाव्या विचारसरणीचे

असंख्य लोक होते. मोदी यांनी मात्र राष्ट्रनिर्माणाचे श्रेय संघ स्वयंसेवकांना देऊन लाल किल्ल्यावरून खऱया हुतात्म्यांचा व क्रांतिकारकांचा अपमान केला. हे संघाच्या नेत्यांनाही आवडले नसेल. संघाला शंभर वर्षे झाली, पण स्वातंत्र्य चळवळीतला काँग्रेस पक्ष दीडशे वर्षांचा आहे. मोदी लाल किल्ल्यावरून ‘संघ चालिसा’चे पठण व मनन करीत आहेत. कारण मोदींचे पंतप्रधानपद हे सरसंघचालक मोहन भागवतांच्या कृपेवर टिकून आहे. संघाची दया आणि भागवतांची कृपा राहावी यासाठी मोदी यांनी लाल किल्ल्यावरून आटापिटा केला. मोदी यांचे लाल किल्ल्यावरील भाषण समोर बसलेल्यांचा अंत पाहणारे होते. ते पावणेदोन तासांपेक्षा जास्त बोलत राहिले. कारण त्यांच्यासमोर टेलिप्रॉम्टर होता. जनतेने वृत्तवाहिन्यांवर किंवा टीव्हीवर इतके लांबवलेले, कंटाळवाणे भाषण ऐकले असेल काय, याबाबत शंका आहे. पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून स्वदेशीचा नारा दिला. स्वदेशीतून समृद्ध भारत वगैरे हवेचे बुडबुडे सोडले. प्रे. ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांनी अमेरिकेने लादलेल्या ‘टॅरिफ’विरुद्ध शब्दबाण सोडले. मोदी यांनी अमेरिकेने लादलेल्या आयात कराविरोधात ‘स्वदेशी’चा नारा देऊन काँग्रेस विचारसरणीचाच पुरस्कार केला. थोडक्यात, स्वदेशी आंदोलन सुरू करा, परदेशी मालावर बहिष्कार टाका. ही उपरती त्यांना ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफनंतर झाली. पंतप्रधान मोदी यांनी मागच्या दहा वर्षांत काँग्रेस विचारधारेवर हल्ला करण्याची एकही संधी सोडली नाही, पण ‘स्वदेशी आंदोलन’ ही काँग्रेस विचारधारेची देणगी आहे. ब्रिटिशांनी त्यांची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी, भारतासारख्या देशातील बाजारपेठा हस्तगत करण्यासाठी ब्रिटनमधला पक्का माल (कापड वगैरे) भारतात आणला व येथील कच्चा माल कवडीमोल किमतीला ब्रिटनला नेला. त्यामुळे येथील हातमाग, गिरण्या, कापूस उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आले. त्याविरोधात काँग्रेसचे दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांनी

‘स्वदेशी’ची चळवळ

सुरू केली. स्वदेशी माल वापरा. विशेषतः खादीचे कापड वापरण्यासाठी आग्रही भूमिका स्वदेशी आंदोलनाद्वारे काँग्रेसने उभी केली. परदेशी मालावर बहिष्कार व परदेशी मालाची होळी सुरू झाली. त्या आंदोलनात मुंबईत बाबू गेनूसारख्या काँग्रेस कार्यकर्त्यांना हौतात्म्य पत्करावे लागले. स्वदेशी आंदोलनाचा संबंध स्वातंत्र्य लढ्याशी व देशभक्तीशी होता आणि काँग्रेसने हे आंदोलन सुरू केले. प्रे. ट्रम्प यांनी ‘टॅरिफ’चा ‘बांबू’ मारताच मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात स्वदेशीची तीच काँग्रेस नीती स्वीकारली, पण काँग्रेसचे नाव न घेण्याचा नेहमीचा कद्रुपणा त्यांनी दाखवलाच. महात्मा गांधी, नेहरू वगैरेंनी स्वतःपासून ‘स्वदेशी’ सुरू केली. मोदी तसे करतील काय? स्वतः मोदी व त्यांचे सहकारी विदेशी गाड्यांच्या ताफ्यात फिरतात. स्वदेशी बनावटीच्या ‘मारुती’ गाड्यांचा वापर या सर्व लोकांनी केला पाहिजे. एक तर ‘मारुती’चा संबंध रामभक्त हनुमानाशी व हिंदुत्वाशी आहे. विदेशी गॉगल, विदेशी पेन, विदेशी चपला वगैरे स्वतः वापरायच्या व लाल किल्ल्यावरून जनतेसाठी ‘स्वदेशी’चा नारा द्यायचा. हे ढोंग आहे. रक्त आणि पाणी यापुढे एकत्र वाहणार नाही, असे सांगायचे व पाकिस्तानबरोबर क्रिकेटचे सामने खेळवायचे. कारण क्रिकेटच्या आर्थिक उलाढालीची सूत्रे भाजपकडे आहेत. पाकिस्तानशी हे नाते का ठेवता, हा प्रश्न मोदी यांनी स्वतःलाच विचारायला हवा होता. मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात अनेक घोषणा केल्या. त्यात नवे काय आहे? देशात 80 कोटी जनता 10 किलो फुकट धान्यावर गुजराणा करते. त्यांना स्वदेशी, संघस्तुती वगैरेशी ‘देणेघेणे’ नाही. मोदींचे भाषण हे गोंधळलेल्या मनाचे बुडबुडे होते. लाल किल्ल्यावर दहा वर्षे असे बुडबुडे फुटत आहेत! एकप्रकारे हे निरोपाचे भाषणच होते. जाता जाता ‘संघा’ची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न झाला, इतकेच!