सामना अग्रलेख – मिस्टर ओवेसी, आता तरी रडणे थांबवा!

10630

असदुद्दीन ओवेसी म्हणतात, अयोध्येत पंतप्रधान मोदी भावनिक झाले. मिस्टर पंतप्रधान, मीसुद्धा तितकाच भावनिक झालो आहे. कारण मी एकात्मतेवर विश्वास ठेवतो. मी भावनिक झालो, कारण त्या ठिकाणी 450 वर्षे एक मशीद उभी होती.’’ ओवेसी काय म्हणतात ते ढोंगच आहे. कारण पाच हजार वर्षांपासून तेथे एक राममंदिर होते. ते तोफा लावून पाडले गेले व तेथे मशीद उभी केली गेली! त्यामुळे नक्की कोणी भावनिक व्हायचे? जे पाप तोफांनी उभे केले ते पाप शिवसैनिकांनी हातोड्यांनी उद्ध्वस्त केले. लोकभावनेचा हा विजयच आहे! मिस्टर ओवेसी, आता रडणे वगैरे बंद करा.

अयोध्येत भव्यदिव्य राममंदिर उभारणीच्या कार्यास प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी रामदर्शन घेतले व साष्टांग असे दंडवत घातले. संकटाच्या चक्रव्यूहातून रामजन्मभूमी मुक्त झाली असे पंतप्रधान म्हणाले. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी अयोध्येतील सोहळ्याचे स्वागत केले आहे, पण काही विघ्नसंतोषी राजकारण्यांच्या पोटदुखीस अंत नाही. अर्थात यात नेहमीप्रमाणे असदुद्दीन ओवेसी हेच आघाडीवर आहेत. श्री. ओवेसी म्हणतात, ‘‘बाबर जिंदा है। जिंदा रहेगा।’’ ओवेसी यांनी ही जी बांग दिली ते त्यांचे ‘स्वगत’ आहे. या स्वगताचे देशातील मुसलमान बांधवांनी स्वागत केले नाही. सर्वोच्च न्यायालयाचा राममंदिराबाबतचा निर्णय देशातील मुसलमानांनी स्वीकारला आहे. ओवेसी म्हणतात, ‘‘बाबर जिवंत आहे.’’ आम्ही विचारतो, ‘‘कोण हा बाबर? हा बाबर तुमचा कोण लागतो?’’ बाबर या देशात दोन वेळा मेला. 450 वर्षांपूर्वी एकदा मेला. दुसऱ्य़ांदा मेला तो 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत रामभक्तांनी बाबरीचे घुमट तोडून उद्ध्वस्त केले तेव्हा. आता तर बाबरीचे नामोनिशाणही मिटले व भूमिपूजन सोहळ्यामुळे अयोध्येतील सुतकही गेले. बाबर आता हिंदुस्थानातच काय, तर जगात कोठेच जिवंत नाही. ज्या उझबेकिस्तान नामक प्रांतातून तो आला त्या देशात तरी तो किती जिवंत आहे याचे भान ओवेसींसारख्या उच्चशिक्षित मुसलमान पुढाऱ्य़ांनी ठेवले पाहिजे. बाबर हा हिंदुस्थानात घुसलेला आक्रमक होता. हिंदुस्थानातील मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर होता. त्याने आपले आत्मचरित्र लिहिले आहे. त्यात ‘हिंदू’ व ‘हिंदुस्थान’ या शब्दांचा त्याने वापर केला आहे. मोगलांच्या आक्रमणात हिंदूंचे स्वामित्व काही काळ लयास गेले, पण म्हणून त्यांचे अस्तित्वच संपले असे होत नाही. बाबराने रामजन्मभूमीचा विध्वंस केला व तेथे मशीद उभारली हे ओवेसींसारखे नेते का स्वीकारीत नाहीत? ओवेसी हे कायद्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी आणखी

एका मुद्द्यावर बांग

दिली आहे. ते म्हणतात, ‘‘हिंदुस्थान एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.  त्यामुळे राममंदिराच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहून मोदींनी संवैधानिक शपथ मोडली आहे. आजचा दिवस म्हणजे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेची हार असून हिंदुत्वाचा विजय आहे!’’ ओवेसी यांच्या बोलण्यात तथ्य नाही. ते वातावरणात गरमी आणू पाहत आहेत, पण आता ते शक्य नाही. मुळात स्वतः ओवेसी तरी खरे निधर्मी आहेत काय याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे. अयोध्येतील भूमिपूजन हा हिंदुत्वाचा विजय असल्याचे शल्य ओवेसी यांनी बोलून दाखवले. आम्ही सांगतो, हा न्याय व सत्य यांचा विजय आहे. कायदेशीर मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून तो मिळवला आहे. हिंदुस्थानात बहुसंख्य हिंदूंच्या भावनांचा आदर करणे ही लोकशाहीच आहे. त्या भावनांचा आदर करून राममंदिर उभे करणे यात निधर्मीवादाचा पराभव असल्याचे ओवेसी यांना वाटते. पाकिस्तानातील काही नेत्यांनादेखील तसेच वाटते. शेख अहमद हे पाकिस्तानचे एक मंत्री आहेत. त्यांच्या व आपल्या ओवेसी मियांच्या बोलण्यातील समान सूत्र समजून घेतले पाहिजे. शेख अहमद अयोध्येतील भूमिपूजनानंतर आपला संताप व्यक्त करताना बोलतात, ‘‘हिंदुस्थानात हे काय चालले आहे? हिंदुस्थान हा आता ‘सेक्युलर’ देश राहिलेला नाही, तर तो आता ‘रामनगर’ बनला आहे. हिंदुस्थान आता श्रीरामाचे हिंदुत्व असलेल्या विचारांचा देश बनला आहे!’’ पाकिस्तानला यात नाक खुपसण्याचे कारण नाही. मुळात पाकड्यांचे राज्य निधर्मी नसून ‘इस्लामी रिपब्लिक’ आहे. आधी त्यांनी ते निधर्मी असल्याचे जाहीर करून तसा संवैधानिक बदल करावा. पाकिस्तानातील हिंदूंची मंदिरे, गुरुद्वारे, चर्च यावर सतत हल्ले होत आहेत. हिंदूंना तेथे दुय्यम दर्जाची वागणूक मिळत आहे. हिंदू मुलींना पळवून त्यांची

जबरदस्तीने धर्मांतरे

घडवली जात आहेत. तेव्हा हिंदुस्थानातील निधर्मीपणावर पाकड्यांनी तोंड उचकटण्याची गरज नाही. ओवेसी म्हणतात, मोदी यांनी अयोध्येत केलेले मंदिराचे भूमिपूजन असंवैधानिक आहे. श्रीमान ओवेसी, कोणत्या संविधानाच्या गोष्टी आपण करीत आहात? देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराबाबत निर्णय दिला. म्हणजे संविधानाचा आदर ठेवूनच अयोध्येत पंतप्रधानांनी भूमिपूजन केले आहे. हिंदुत्व हे सगळ्यात जास्त निधर्मी आहे. कारण ते देशाचे संविधान व न्यायालयाचा आदर करते. हिंदू धर्माचे स्वतःचे वेगळे ‘शरीयत’ नाही व इतर धर्मीयांना तो ‘काफर’ समजत नाही. राममंदिर हे त्याच संविधानाचे राष्ट्रीय प्रतीक आहे. दिवंगत पंतप्रधान नरसिंह राव यांनी 1992 च्या एप्रिलमध्ये निधर्मीपणाविषयी विचार मांडले होते. ते म्हणाले होते की, ‘एखादा पक्ष निधर्मी आहे हे कसे ठरवायचे? तसेच निधर्मी पक्ष आणि निधर्मी नसलेले पक्ष यांच्यातील भेद दाखविणारे निकष कसे ठरवायचे?’ राव म्हणाले ते बरोबरच आहे. जामा मशिदीत इमामांसमोर बसून राजकीय फायद्या-तोट्याची बोलणी करणारे निधर्मी व अयोध्येत राममंदिराची उभारणी करणारे निधर्मी नाहीत असे मानणे हेच निधर्मीपणाचे ढोंग आहे. हे ढोंग 6 डिसेंबर 1992 ला कायमचे गाडले गेले. असदुद्दीन ओवेसी म्हणतात, ‘‘अयोध्येत पंतप्रधान मोदी भावनिक झाले. मिस्टर पंतप्रधान, मीसुद्धा तितकाच भावनिक झालो आहे. कारण मी एकात्मतेवर विश्वास ठेवतो. मी भावनिक झालो, कारण त्या ठिकाणी 450 वर्षे एक मशीद उभी होती.’’ ओवेसी काय म्हणतात ते ढोंगच आहे. कारण पाच हजार वर्षांपासून तेथे एक राममंदिर होते. ते तोफा लावून पाडले गेले व तेथे मशीद उभी केली गेली! त्यामुळे नक्की कोणी भावनिक व्हायचे? जे पाप तोफांनी उभे केले ते पाप शिवसैनिकांनी हातोड्यांनी उद्ध्वस्त केले. लोकभावनेचा हा विजयच आहे! मिस्टर ओवेसी, आता रडणे वगैरे बंद करा.

आपली प्रतिक्रिया द्या