सामना अग्रलेख – देवाघरी देवदूत! रतन टाटा अमर आहेत…

जगभर आपल्या उद्योगांची यशोपताका फडकविणाऱ्या रतन टाटांनी ठरविले असते तर कित्येक दशके आधीच जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले असते. मात्र श्रीमंतीच्या या बाजारू व दिखावू दर्पाने त्यांना कधीच पछाडले नाही. रतन टाटांनी आपल्या उद्योग साम्राज्याचा विस्तार केला तो केवळ प्रामाणिकपणा, विश्वास व सचोटी या त्रिसूत्रीवर. रतन टाटा गेले म्हणजे विश्वास संपला. टाटा यांच्या जाण्याने विश्वासाचे अधिराज्यच खालसा झाले आहे. त्यामुळेच तर जात-पात व धर्माच्या साऱ्या भिंती ओलांडून कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अवघा देश शोकमग्न झाला आहे. अंतर्बाह्य निर्मळ मनाचा धनी असलेला हिंदुस्थानचा देशभक्त देवदूत देवाघरी गेला आहे. प्रेरणादायी रतन टाटा मृत्यूनंतरही अमर आहेत!

हिंदुस्थानच्या मुकुटातील सर्वात मौल्यवान रत्न निखळले आहे. होय, उद्योगपती रतन टाटा हे हिंदुस्थानच्या शिरपेचातील अनमोल म्हणावे असेच अलौकिक रत्न होते. बुधवारी रात्री रतन टाटा यांच्या निधनाची बातमी आली, गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कारही झाले; पण रतन टाटा गेले यावर विश्वास ठेवायला मन अजूनही धजावत नाही. कसे धजावेल? कारण टाटांचा दुसरा समानार्थी शब्द म्हणजे विश्वास! त्या विश्वासाचाच मृत्यू झाला हे मान्य करायचे तरी कसे? घराघरात पोहोचलेल्या टाटांनी हिंदुस्थानच्या जनतेचे अवघे विश्वच व्यापून टाकले होते. त्यामुळेच तर सारा देश आज हळहळतो आहे. ही हळहळ उगाच नाही येत. देशभक्तीच्या भावनेने भारलेल्या रतन टाटांनी आपल्या वागणुकीतून, आपल्या आचरणातून देशवासीयांची केवळ मनेच जिंकली नाहीत, तर विश्वासाचे प्रतीक असलेली ‘टाटा’ ही दोन अक्षरे तमाम हिंदुस्थानींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. ते प्रत्येक मन आज व्याकूळ झाले आहे. अन्यथा एखाद्या उद्योगपतीच्या मृत्यूनंतर कोणी दोन अश्रू तरी कशासाठी ढाळेल? हे भाग्य केवळ रतन टाटा यांच्यासारख्या सत्शील, कमालीच्या सज्जन व सदाचरणी उद्योजकालाच मिळू शकते. जेआरडी टाटांनी ज्या उद्योग समूहाचा पाया रचला त्या उद्योग साम्राज्याच्या इमारतीवर सुंदर कळस चढवितानाच अत्युच्च शिखर गाठण्याची अफाट कामगिरी रतन टाटा यांनी केली. पुन्हा उद्योग क्षेत्रातील या प्रगतीसाठी टाटांनी कधीच शॉर्टकट वापरला नाही. कधी लोचटपणे राज्यकर्त्यांची हांजी-हांजी केली नाही. त्यांचा कणा सदैव ताठ राहिला. सरकारे कोणत्याही पक्षाची असोत, त्यांच्यापुढे ते कधी सरपटताना दिसले नाहीत. नीतिमत्ता खुंटीला टांगून आपल्या उद्योगांचा विस्तार करण्याचे गलिच्छ धंदे टाटांनी आपल्या उभ्या आयुष्यात कधीच केले नाहीत. भानगडी व लबाड्या न करताही उद्योग यशस्वी करता येतात हा

आदर्श वस्तुपाठ

रतन टाटा यांनी देशासमोर ठेवला. सचोटीचा उद्योजक हीच त्यांची सर्वोच्च ओळख होती. या सचोटीमुळेच एक अत्यंत प्रामाणिक उद्योग समूह म्हणून आपल्या समग्र औद्योगिक साम्राज्याची ओळख ते जगात निर्माण करू शकले. रतन टाटा यांनी आपल्या उद्योग साम्राज्याचा विस्तार कुठल्या कुठे नेऊन ठेवला. टाटा मोटर्स, एअर इंडिया, ताज हॉटेल्स, ताज विवांता, टाटा कॅपिटल, क्रोमा, टाटा एआयजी, टायटन, तनिष्क, टाटा आयप्लस, फास्ट्रक, स्टारबक्स, टाटा कॉफी, बिग बास्केट, टाटा टी, टाटा सॉल्ट असे एक ना अनेक ब्रॅण्ड लोकप्रिय करण्यात रतन टाटा यांचा वाटा सिंहाचा राहिला. आज टाटा हा देशातील सर्वात मोठा व्यवसाय व उद्योग समूह आहे. मीठ, चहापासून ते विमानापर्यंत, ट्रक व बसपासून कारपर्यंत, दागिन्यांपासून कपड्यांपर्यंत, किचनमधील मसाल्यांपासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत आणि मनगटावरच्या घड्याळापासून ते आयटी कंपन्यांपर्यंत सारीच क्षेत्रे व्यापून टाकणारे टाटा देशातील प्रत्येक घरात पोहोचले. हिंदुस्थानातच नव्हे, तर जगभरात टाटांनी आपल्या ब्रॅण्डचा दबदबा निर्माण केला. जगभरातील नऊ लाख लोकांना हिंदुस्थानातील टाटा उद्योग समूह रोजगार पुरवितो, ही केवढी भूषणावह गोष्ट आहे! माहिती तंत्रज्ञानाचे क्षेत्र भविष्यात क्रांती घडविणार हे दूरदर्शी रतन टाटांनी वेळीच हेरले व टीसीएस अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही आयटी कंपनी त्यांनी स्थापन केली. आज हीच टीसीएस कंपनी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी आयटी कंपनी म्हणून ओळखली जाते. एकट्या टीसीएस कंपनीतच आज सहा लाखांहून अधिक अभियंते, कर्मचारी काम करतात. लाखो लोकांचे घर-संसार चालविणारी व्यक्ती रतन टाटांऐवजी अन्य कुणी असती तर गर्वाने छाती फुगवून सतत उपकाराची भाषा करत राहिली असती. मात्र

विनम्र

टाटांना ही ‘ग’ची बाधा कधीच झाली नाही. मागच्या वर्षी तर टाटा उद्योग समूहाने एका आर्थिक वर्षात 10 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवून कमाईच्या बाबतीत मोठाच विक्रम नोंदवला. उद्योगपतीला केवळ नफा आणि तोटा हे दोनच शब्द ठाऊक असतात. मात्र केवळ नफेखोरी करणे हे टाटांचे उद्दिष्ट कधीच नव्हते. आपल्या 86 वर्षांच्या आयुष्यात हा देशभक्त उद्योजक स्वातंत्र्यलढ्यातील योगदानापासून सामाजिक कार्यापर्यंत सदैव अग्रेसर राहिला. या हाताचे त्या हाताला कळू न देणारे सत्पात्री दान ते करीत असत. देशातील जनतेशी ममत्वाचे व आपुलकीचे नाते बाळगणाऱ्या टाटांनी कोरोनाच्या संकट काळात हजारो कोटींच्या देणग्या दिल्या. टाटा मेमोरियलसारखे देशातील सर्वात मोठे कर्करोगावरील विशेष रुग्णालय त्यांनी मुंबईत उभारले. देशातील एकूण कर्करुग्णांपैकी 10 टक्के रुग्ण आज एकट्या टाटा रुग्णालयात उपचार घेतात. रतन टाटा हे उद्योजक म्हणून, माणूस म्हणून तर श्रेष्ठ होतेच, पण कॅन्सरसारख्या असाध्य आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी ते साक्षात देवदूत होते. तो देवदूतच आता देवाघरी गेला आहे. जगभर आपल्या उद्योगांची यशोपताका फडकविणाऱ्या रतन टाटांनी ठरविले असते तर कित्येक दशके आधीच जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले असते. मात्र श्रीमंतीच्या या बाजारू व दिखावू दर्पाने त्यांना कधीच पछाडले नाही. देशातील साधनसंपत्तीवरही ते कधी अधाशीपणे तुटून पडले नाहीत. रतन टाटांनी आपल्या उद्योग साम्राज्याचा विस्तार केला तो केवळ प्रामाणिकपणा, विश्वास व सचोटी या त्रिसूत्रीवर. रतन टाटा गेले म्हणजे विश्वास संपला. टाटा यांच्या जाण्याने विश्वासाचे अधिराज्यच खालसा झाले आहे. त्यामुळेच तर जात-पात व धर्माच्या साऱ्या भिंती ओलांडून कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अवघा देश शोकमग्न झाला आहे. अंतर्बाह्य निर्मळ मनाचा धनी असलेला हिंदुस्थानचा देशभक्त देवदूत देवाघरी गेला आहे. प्रेरणादायी रतन टाटा मृत्यूनंतरही अमर आहेत!