आठ-दहा दिवसांपूर्वी नागपुरातील एका कार्यक्रमात जे सरसंघचालक मोहन भागवत ‘विविधता मिटवून जबरदस्तीने एकात्मता आणण्याचा प्रयत्न करणे, हा पुढे जाण्याचा मार्ग नाही. विविधतेत जगताना आपण एक आहोत, हे समजून घेतले पाहिजे,’असे महनीय विचार मांडतात, तेच सरसंघचालक आता राजस्थानात संघस्वयंसेवकांसमोर भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदूंनी संघटित व्हायला हवे, असे सांगतात. देशात हिंदू बहुसंख्याक आहेत हे खरे असले तरी विविधतेत असलेली एकता हीच भारताची खरी ओळख आहे. मात्र गेल्या दहा वर्षांत हा देश जातीय आणि धार्मिक अस्थिरतेच्या कड्यावर ढकलला गेला आहे. अशा वेळी ‘होय, भारत हे हिंदू राष्ट्र आहे’असा उच्चार करण्याची गरज सरसंघचालकांना आताच का भासली? देशाला पडलेला हा प्रश्न आहे.
भारत हे हिंदू राष्ट्र आहे, असा दावा सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. राजस्थानातील एका कार्यक्रमात संघ स्वयंसेवकांना संबोधताना सरसंघचालकांनी हिंदू राष्ट्राचा उच्चार केला. त्याशिवाय हिंदू म्हणजे कोण, हिंदूंची सर्वसमावेशकता, एकोपा आदी मुद्द्यांवर भाष्य करताना हिंदू हा शब्द देशात राहणाऱया सर्वच भारतीय समाजासाठी वापरला गेला, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली. सरसंघचालकांनी सर्व भारतीय समाजाला हिंदू या शब्दाच्या पंखाखाली घेण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु भारत हे हिंदू राष्ट्र आहे, असा उघड दावा करण्याची गरज सरसंघचालकांना अचानक का भासली? हा प्रश्न उरतोच. पुन्हा हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज आहे, असेही त्यांनी का सांगितले? या दोन्ही गोष्टींचा उच्चार एकाच व्यासपीठावरून करण्याची गरज सरसंघचालकांना का भासली? ‘हिंदू हा शब्द नंतर आला असला तरी भारतीय येथे प्राचीन काळापासून राहात आहेत. हिंदू सर्वांना सामावून घेतात. भारतात राहणाऱया सर्वांसाठीच हिंदू हे संबोधन केले गेले,’ असे ‘उदारमतवादी’ विचार व्यक्त करणारे सरसंघचालक हिंदूंनी स्व-संरक्षणासाठी संघटित होण्याची गरज प्रतिपादन करतात तेव्हा त्यांना नेमके काय म्हणायचे आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू शकतो. कारण त्यांची ही दोन्ही वाक्ये
परस्परांसाठी प्रश्नार्थक
ठरतात. आधीच्या वाक्याला नंतरचे वाक्य छेद देते. ही दोन्ही वाक्ये कळत-नकळत भारतातील हिंदू आणि बिगर हिंदू या संघ परिवाराच्या परंपरागत विभागणीवर बोट ठेवतात. कारण जर ‘हिंदू’ या शब्दात सर्वच भारतीय समाज येतो तर मग ‘स्वसंरक्षणासाठी संघटित होण्याची गरज असणारा’ नेमका हिंदू समाज कुठला? कोणाला कोणापासून धोका आहे? कोणाला स्वसंरक्षणाची आणि संघटित होण्याची गरज आहे? एकीकडे व्यापक वगैरे विचार मांडायचे आणि दुसरीकडे या देशाची हिंदू आणि बिगर हिंदू अशी विभागणी करणारा आपला परंपरागत अजेंडाही रेटून न्यायचा. भाषा, प्रांत, जात या आधारावरचे मतभेद, वाद बाजूला ठेवून एकत्र या म्हणायचे, सर्वांचे हित जपणारा आणि सौहार्द्रपूर्ण वातावरण असणारा समाज असायला हवा, असे ‘आदर्शवादी’ विचार व्यक्त करायचे आणि त्याच वेळी हिंदू राष्ट्राचा उच्चार करून हिंदूंनो, स्वसुरक्षेसाठी एकत्र या, असा नाराही द्यायचा. सरसंघचालकांची ही वक्तव्ये धार्मिक विभाजनाला खातपाणी घालणारी आहेत, अशी टीका विरोधकांनी केली आहे, ती त्यामुळेच. देशात मोदी राजवट आल्यापासून देशातील जातीय आणि धार्मिक सौहार्द्रता कधी नव्हती एवढी जोरात हेलकावे खात आहे.
हिंदू विरुद्ध मुसलमान
असे वातावरण पेटते ठेवून त्यावर आपल्या राजकीय पोळय़ा भाजून घ्यायच्या, हाच अजेंडा दिल्लीपासून गल्लीपर्यंत राबविला जात आहे. मणिपूरसारखे संवेदनशील सीमावर्ती राज्य वांशिक वणव्यात वर्षभर होरपळत ठेवले जात आहे. पंतप्रधान त्यावर ना बोलत आहेत ना तेथे भेट देऊन हिंसापीडित मणिपूरवासीयांना दिलासा देत आहेत. अशा वेळी सरसंघचालकांनीच ‘भारत हे हिंदू राष्ट्र’ असा जाहीर दावा करण्यामागे नेमके कारण काय? आठ-दहा दिवसांपूर्वी नागपुरातील एका कार्यक्रमात जे सरसंघचालक मोहन भागवत ‘विविधता मिटवून जबरदस्तीने एकात्मता आणण्याचा प्रयत्न करणे, हा पुढे जाण्याचा मार्ग नाही. विविधतेत जगताना आपण एक आहोत, हे समजून घेतले पाहिजे,’ असे महनीय विचार मांडतात, तेच सरसंघचालक आता राजस्थानात संघस्वयंसेवकांसमोर भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि स्वसंरक्षणासाठी हिंदूंनी संघटित व्हायला हवे, असे सांगतात. देशात हिंदू बहुसंख्याक आहेत हे खरे असले तरी विविधतेत असलेली एकता हीच भारताची खरी ओळख आहे. मात्र गेल्या दहा वर्षांत हा देश जातीय आणि धार्मिक अस्थिरतेच्या कडय़ावर ढकलला गेला आहे. सर्वसमावेशकतेच्या धाग्यानेच ही अस्थिरता सावरली जाऊ शकते. अशा वेळी ‘होय, भारत हे हिंदू राष्ट्र आहे’ असा उच्चार करण्याची गरज सरसंघचालकांना आताच का भासली? देशाला पडलेला हा प्रश्न आहे.